टप्प्याटप्प्याने भूमिगत वीजवाहिन्या ः काब्राल

0
73
असोल्डा शेळवणमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांच्या पायाभरणीप्रसंगी वीजमंत्री नीलेश काब्राल, फॅलिक्स फर्नांडिस, एन. रेड्डी, पियेदाद दिनीजस, सुनिता नाईक.(छाया ः मंदार नाईक)

सांगे (न. प्र.)
राज्यात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सामान्य लोकांवर भार न घालता टप्प्याटप्प्याने केले जाईल. हे काम संयुक्त पद्धतीने किंवा पीपीपी मॉडेलद्वारे केले जाईल असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. पंटेमळ – कुडचडे येथील ३३/११ केव्ही वीज उपस्थानकावरील ११ केव्ही असोल्डा – शेळवण फीडर कार्यान्वित केल्यानंतर तसेच भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामाच्या पायाभरणीवेळी वीजमंत्री बोलत होते. यावेळी कुडचडे काकोडाचे नगराध्यक्ष फॅलिक्स फर्नांडिस, मुख्य वीज अभियंते एन. रेड्डी तसेच उपनगराध्यक्ष श्रीमती पियेदाद दिनीज, असोल्डा शेळवणच्या सरपंच श्रीमती सुनिता नाईक, शेल्डेचे सरपंच प्रमोद गांवस देसाई, जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती हेजल फर्नांडिस तसेच पंचायत सदस्य आणि वीज खात्याचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. काब्राल यांनी लोकांना अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन दिले आणि वीज खात्यातील सुमारे ७००० कर्मचार्‍यांना वीज यंत्रणा सुधारण्याच्या कामाला जुंपले असून कामाची जबाबदारी वरिष्ठ अधिकार्‍यांपासून सर्वांची राहील असे सांगितले. पुढे बोलताना श्री. काब्राल म्हणाले की, पीपीपी मॉडेलमुळे वीजपुरवठ्याचा दर्जा आणि एकंदरित यंत्रणा सुधारण्यास मदत होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वीज दरांमध्ये १०-२० टक्के वाढ स्वीकारण्याची लोकांनी तयारी ठेवावी असेही ते म्हणाले. वचन दिल्याप्रमाणे खात्याच्या कामासंबंधीची श्वेतपत्रिका ४५ दिवसांच्या आत प्रसिद्ध करण्यात येईल. खात्याचे कामकाज व प्रशासन सुधारण्यासाठीचे नियोजन, त्रुटी व विविध प्रकल्पांची अंमलबजावणी यांचा त्यात समावेश असेल असे श्री. काब्राल म्हणाले. विविध खात्यांतर्फे सध्या केली जाणारी विद्युत कामे वीज खात्यातर्फेच करण्यात यावीत यावर वीजमंत्र्यांनी भर दिला. खात्याकडे योग्य ती तज्ज्ञ यंत्रणा असल्याने पुढील ४-५ महिन्यांत सर्व खाती/ एजन्सी यांना विद्युत कामे खात्यातर्फेच करून घ्यावी लागतील, असे त्यांनी नमूद केले.
सर्व लाईन स्टाफचे काम तपासण्याची गरज आहे असे सांगून श्री. काब्राल यांनी सध्या कार्यालयात काम करणार्‍या सर्व लाईन हेल्पर्स व मीटर रिडर्स यांनी त्यांना नियुक्त केलेलेच काम करावे असा सल्ला दिला. वेळेनुसार कंत्राटी पद्धत बंद करण्यात येईल आणि पात्र कंत्राटी कर्मचार्यांसना खात्यात घेतले जाईल असे ते म्हणाले. भूमिगत वीजवाहिन्यांमुळे शहरातील मुख्य भागातील ग्राहकांना सुरळीत व दर्जात्मक वीजपुरवठा होईल आणि ११ केव्ही असोल्डा – शेळवण फीडर कार्यान्वित झाल्यामुळे बाणसाई फीडरवरील ताण कमी होईल व दोन्ही भागाला योग्य वीजपुरवठा होईल. या कामासाठी अंदाजे २९.५० कोटी रू. खर्च येईल असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष श्री. फर्नांडिस आणि मुख्य वीज अभियंते श्री. रेड्डी यांचीही भाषणे झाली. कार्यकारी अभियंते श्री. देवदसन यांनी स्वागत केले तर साहायक अभियंते अनिल गावकर यांनी आभार मानले.