झुवारी पूल सुरक्षित

0
234
????????????????????????????????????

>> साबांखामंत्री सुदिन ढवळीकरांचे स्पष्टीकरण

>> कॉंग्रेसकडून जनतेची दिशाभूल

जुन्या झुवारी पुलाला कोणताही धोका नसून या पुलाची पुढील तीन वर्षांच्या सुरक्षेची हमी आपण देत असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी चुकीची व पुलासंबंधीची निराधार माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

झुवारी पूल मोडकळीस आलेला आहे व तो कधीही कोसळू शकतो अशी चुकीच माहिती देऊन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्यांच्यासारख्या प्राध्यापकांना हे शोभत नसल्याचे ढवळीकर म्हणाले. या पुलाचे वेळोवेळी दुरुस्ती काम करण्यात आलेले असून अजून ते चालूच आहे. आणि त्याचमुळे ३५ वर्षांनंतरही झुवारी पूल अजूनही टिकून आहे. तसेच आणखी पुढील ३ वर्षेही हा पूल टिकून राहील याची हमी आपण देत असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
१९८३ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. ९७-९८ साली पुलाची पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली. २००३ साली पुन्हा प्लास्टरचा वापर करून दुरुस्ती झाली. २००६ साली हा पूल किती वजन पेलू शकतो त्याची चाचणी घेण्यात आली. २०११ साली या पुलाला तडे गेले असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करण्यात आली. नंतर जायकाच्या अधिकार्‍यांनी पुलाची पाहणी केली. २०१७ साली एक्सपान्शन जॉईंट्‌स बदलण्यात आले. नंतर स्पेशल रिपेट प्रोटेक्शन कोटिंग करण्यात आल्याचे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

आयआयटी अभियंत्यांकडून तपासणी
सरकारने सध्या या पुलावरून १६.५ टन वजनाच्या प्रवासी बसेसना परवानगी दिलेली आहे. तर पुलावरून धावणार्‍या वाहनांसाठी ताशी ३० कि. मी. एवढ्या वेगाची मर्यादा घालण्यात आली असल्याचे ते म्हणाले. सध्या या पुलावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मुंबई आयआयटीचे दोघे अभियंते रवी सिन्हा व गोयल यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. ते वेळोवेळी येऊन या पुलाची तपासणी करीत असतात असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. चोडणकर यांना या तांत्रिक बाबींची व पुलाची कशी देखभाल केली जाते त्याची माहिती नाही. आणि म्हणूनच त्यांनी बिनबुडाचे आरोप केले असल्याचे ढवळीकर म्हणाले.