झुंडशाहीचे बळी

0
211

देशात गेल्या वर्षभरात सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांमुळे नऊ राज्यांमध्ये २७ जणांची हिंसक जमावाकडून हत्या झाल्याची सुन्न करणारी आकडेवारी समोर आली आहे. अगदी पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रापासून मागासलेल्या झारखंडपर्यंत आणि संस्कृतीप्रेमी दाक्षिणात्य राज्यांपासून ईशान्येतील आसाम, त्रिपुरापर्यंत हे प्रकार घडले आहेत. एखाद्या अफवेची खातरजमा करण्याची वाट न पाहता आणि मागचा पुढचा विचार न करता झुंडीच्या झुंडी एखाद्याच्या जिवावर उठायला पुढे सरसावतात हे चित्र खरोखरच धक्कादायक आहे. समोरच्याला जिवानिशी मारण्याएवढी ही हिंस्त्रता या जमावामध्ये येते कुठून? या सगळ्या हत्यांचे खापर आज सोशल मीडियावर फोडले जात असले, तरी सोशल मीडिया हे केवळ एक साधन आहे. ते अर्थातच दुधारी आहे. ते कोणी, कसे वापरायचे याला काही बंधन नाही. त्यामुळे व्यक्ती व्यक्तीच्या मानसिकतेनुसार, वृत्तीनुसार या दुधारी साधनाचा बरा – वाईट वापर होतो. छापील शब्द खरा मानण्याची समाजाची परंपरेने चालून आलेली प्रवृत्ती आहे. आता व्हिडिओमध्ये तर प्रत्यक्ष समोर दृश्य दिसते, त्यामुळे ते खरेच असले पाहिजे या मानसिकतेतून अशा अफवांना समाज बळी पडत आहे. आपल्या देशात अडाणी, अर्धशिक्षित, अल्पशिक्षितांची कमी नाही. परंतु जमावाच्या या झुंडींमध्ये केवळ हीच मंडळी असतात असे समजण्याचे काही कारण नाही. स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी आणि शिक्षित असलेली मंडळीही या जमावामध्ये सामील असते. स्वतःच्या मनात दुसर्‍या कोणत्या तरी कारणामुळे, परिस्थितीमुळे खदखदणारा राग अशा वेळी बाहेर पडतो आणि मग समोरच्या व्यक्तीविषयी दयामाया बाळगली जात नाही. ज्या क्रूर प्रकारे आजवर ह्या विविध राज्यांमध्ये जमावाकडून हत्या झाल्या, त्या पाहिल्या, तर धक्का बसल्यावाचून राहात नाही. बेभानपणे एखाद्यावर तुटून पडणार्‍या अशा झुंडी पूर्वी मुंबईसारख्या महानगरामध्ये पाहायला मिळायच्या. समोर काही गैर घडते आहे असे दिसले की परिणामांची तमा न बाळगता त्याच्यावर तुटून पडायचे ही जमावाची मानसिकता असे. आपण न्याय देतो आहोत असा जमावाचा त्यामागे भाव असे. आजही आपण समोरच्याला मारहाण करतो आहोत म्हणजे न्यायाच्या बाजूने उभे आहोत, समोरची व्यक्ती मुले पळवणार्‍या टोळीतील आहे, चोर आहे, दरोडेखोर आहे, असे समजूनच ही मारहाण आणि त्यातून ह्या सार्‍या निर्घृण हत्या झालेल्या आहेत. परंतु ज्याला आपण सत्य समजतो ते सत्य नसून कोणी तरी विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने मुद्दामहून पसरवलेली अफवा असू शकते हे भान अशा वेळी का हरवते हा खरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपल्या देशात सामाजिक खदखद प्रचंड आहे. तिचा वेळोवेळी व्यवस्थित लाभ उठवण्याचा प्रयत्न जसे राजकीय पक्ष करतात, समाजकंटक करतात, तशाच राष्ट्रविरोधी शक्तीही करीत असतात. त्यामुळे सोशल मीडियावरून पसरवल्या जाणार्‍या अशा अफवांमागे एखादी राष्ट्रविरोधी शक्तीही सक्रिय नसेल असे सांगता येत नाही. विशेषतः ईशान्य भारतातील व्यक्तींविरुद्ध गेल्या काही वर्षांत पसरवल्या गेलेल्या अफवा आणि त्यातून घडलेल्या हल्ल्यांच्या घटना पाहिल्या तर हे सारे कोणी तरी सूत्रबद्ध रीतीने करीत नसावे ना अशी शंका घ्यायला वाव राहतो. सध्या गोहत्यांबाबतही हेच चालले आहे. एकाएकी लोकांना गाईगुरांचे प्रेम कसे काय निर्माण झाले आहे? यामागे निव्वळ धार्मिक तणाव निर्माण करून त्याचा राजकीय लाभ उठविण्याची गणिते असतात आणि समाज त्याला बळी पडत असतो. प्रस्तुत विषयामध्ये राज्ये वेगवेगळी असली तरी अफवा एकाच प्रकारच्या असल्याचे दिसेल. मुले पळवणारी टोळी गावात आली आहे, तिच्यापासून सांभाळा असे इशारे देत व्हॉटस् ऍपवरून पसरवल्या गेलेल्या कोणाच्या तरी व्हिडिओची शहानिशा न करता त्याच्यावर झुंडी तुटून पडल्या आणि त्यातून ही हत्याकांडे घडली. पोलीस यंत्रणा त्या रोखण्यात बव्हंशी असफल ठरल्या. नुकतीच महाराष्ट्रात धुळ्यात पाच जणांची साडे तीन हजाराच्या जमावाकडून निर्घृण हत्या झाली. हा रानटीपणा नव्हे तर दुसरे काय आहे? अत्यंत घृणास्पद असे हे गुन्हे आहेत आणि त्याबाबत गंभीर पावले उचलण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. व्हॉटस् ऍपवरून पसरणार्‍या अफवांबाबत सरकार सरतेशेवटी जागले आहे. सरकारने संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे आणि त्यावर आपण या समस्येवर उतारा शोधत असल्याचे संबंधित कंपनीने कळवले आहे. आपल्याला येणार्‍या संदेशांची खातरजमा न करता अंधविश्वासाने ते पुढे पाठवण्याचे प्रत्येकाने थांबवले तर या अफवा पसरणे टळेल आणि निरपराधांचा जीव वाचेल. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे सामाजिक झुंडशाहीला राजकीय नेत्यांकडून स्वार्थासाठी जे आजकाल सर्रास उत्तेजन दिले जात असते, त्याला पायबंद बसला पाहिजे. या देशामध्ये कायद्याचे राज्य आहे आणि कायदा गैरगोष्टींना आळा घालण्यास सक्षम आहे हा विश्वास जागण्याची आवश्यकता आहे आणि तशी जरबही निर्माण झाली पाहिजे. तसे झाले तरच कायदा हातात घेण्यास झुंडी धजावणार नाहीत.