झिम्माड पाऊस…

0
511

– पौर्णिमा केरकर

या गावांचे अनोखे लावण्य पावसाळी रानवाटांनी रानफुलांनी सजलेले पाहण्यासाठी एखादी तरी पावसाळी रात्र तीव्रतेने मनाला खुणावत असते. सूर्लाच्या विस्तीर्ण खडकाळ पठारावर चालत जायचे तर सोबतीला मुसळधार पाऊस हवाच! वाटावाटाना बिलगलेले धुके, गवतावरील हिरव्या लाटा, टपटपणारे पानावरचे थेंब ही दृश्ये अनुभवताना पावसाळी करवंदांचा आस्वादही तेवढाच आठवतो.

मृगाचा पाऊस सुरू झाला की आकाशात काळ्याभोर ढगांची दाटी होऊ लागते. भरून आलेले नभ आता कोसळतील की काही वेळाने… याचा सारखा मनात अंदाज सुरू असतो. एरवी भरून आल्यानंतर तो कोसळणारच याची पक्की खात्री असूनही काही गोष्टी मान्य करायला मनसुद्धा तयार नसते, तरीही त्याचे कोसळणे कधी कधी लांबतेच. हिरवा काळोख लपेटून घेतलेली झाडे पानाफांद्यातून निथळत स्तब्ध उभी राहिलेली असताना त्याचं झिरझिरणं… बरसणं आणि त्यानंतर झिम्माड होत कोसळणं सुरू होतं. अगदी भर दुपारीही काळोखाला सोबतीला घेऊन येणार्‍या या पावसाचं अप्रूप दरवर्षी नव्याने अनुभवावे तेवढे कमीच आहे. अलीकडे हा पाऊस तनामनाला अधिक उत्कट करतो आणि आतुर होत मन ही त्याची वाट पाहात राहते. पाऊस म्हटला की पहिल्याप्रथम आठवतो तो चोर्लाघाट – हरित जंगलाने व्यापलेला सह्याद्री पर्वतरांगांचा नयनरम्य असा परिसर घनघोर कोसळणार्‍या पावसात अनेकविध विभ्रमांनी विनटलेला दिसतो. दाट धुक्याचा तलम पदर मिरविणारी एका बाजूची खोल दरी तर दुसर्‍या बाजूला डोंगरावरून कोसळणारे अनेकविध दुग्धतुषारांचा खळाळणारा प्रवाह चैतन्याच्या उत्कट आविष्कारासाठीच सज्ज झालेला हा परिसर तनामनाला श्रांत करत जातो. अवसर मिळूनसुद्धा माणसांत सहजपणाने परिवर्तन होत असतेच असं नाही, परंतु निसर्ग मात्र स्वतःला परिवर्तनशील बनवत असतो.
पावसाळ्यात सार्‍या सृष्टीचेच चित्र पालटलेले असते. अशा वेळी चोर्ला घाटातील गर्द जंगलातली केलेली तिन्हीसांजेची-दाट काळोखातली, चांदण्यारात्रीची भटकंती आठवते आणि पावसाची रूपेही विविधांगाने मनासमोर फेर धरतात. आकाशाच्या तुकड्या तुकड्यात सामावलेले रंग भरून आलेल्या ढगामुळेच धरणीवर अवतरतात आणि सुरू होते चैतन्याची सनद. पहिला पाऊस विसरता येत नाही, तो चिरंतन असतो.. त्याच्यानंतरचा पाऊस शिळा किंवा जुनाही होत नसतो. उलट सृजनत्वाला नव्याने जन्म देत राहतो. घन भरून आले असता – मन रोमांचित होते आणि पावले भिजलेल्या झाडांचा शोध घेत घेत रोमांचित रानांचा पावसाळी प्रवास अनुभवण्यासाठी आतुरतात. कर्नाटकातील सडा, मान, मांगेली, पारोडा, चिगुले, बेटणे, चिखले, तळावडे-कणकुंबी व त्यांच्यात स्वतःची भौगोलिक – नैसर्गिक रचना सामावून घेतलेला सत्तरीतील सूर्ला गाव. या गावांचे अनोखे लावण्य पावसाळी रानवाटांनी रानफुलांनी सजलेले पाहण्यासाठी एखादी तरी पावसाळी रात्र तीव्रतेने मनाला खुणावत असते. सूर्लाच्या विस्तीर्ण खडकाळ पठारावर चालत जायचे तर सोबतीला मुसळधार पाऊस हवाच! वाटावाटाना बिलगलेले धुके, गवतावरील हिरव्या लाटा, टपटपणारे पानावरचे थेंब ही दृश्ये अनुभवताना पावसाळी करवंदाचा आस्वादही तेवढाच आठवतो. पठारावर अगदी टोकाला उभे राहताक्षणी खुणावतो तो खोल दरीच्याही पल्याड असलेला लाडकेचा वझर. डोळ्याचे पातेही न लववता त्याचे दर्शन घेतले तरच तो चिरस्मरणीय ठरतो अन्यथा धुक्याच्या पदरात तो कधी अंतर्धान पावतो, कधी परत समूर्त होतो हे पाहणार्‍याला जणू काही हुलकावणी देतच राहतो. रानभाज्या, रानफळे यांचे वैभव मिरवीत सूर्लचा पठार पावसाचा अनाहत नाद दाही दिशात भरून ठेवतो.
पावसाच्या तिन्हीसांजातील काव्याचा शोध घ्यायचा असेल तर तळवडेचा पाऊस स्पर्श करून घ्यायलाच हवा. तिथल्या घरांना पासोडीची ऊब हवीच. आतील परसो, चुलीतला धगधगता जाळ… कौलातून निघणारा धूर पावसात मिसळताना त्याला समरस झालेला खरपूस भाजलेल्या भाकरीचा सुगंध भरून घेणार्‍याची भूक चाळवल्याशिवाय राहणारच नाही. इथल्या कष्टकरी जीवाचा पाऊस हा हृदयाजवळचा मित्र – तसा पाऊस सखा सर्वच कष्टकरी जीवांचा आहे. पण या गावाशी त्याचं असलेलं नातं हे त्यांच्या कष्टांशी – संघर्ष समस्यांशी, वेदनेशी समांतर जाणारे आहे. कौलारू घरात ठिबकणारी पाऊस ओळ मातीत मिसळलेली पडवीतील पाऊसओल – रंध्रारंध्रात गारवा निर्माण करते. बाहेरच्या गार वार्‍यांपासून संरक्षण देणारी ‘पासोडी’ घनघोर पावसात स्वतःला तुडुंब भिजवून घेते. इथल्या लोकमनाला पाऊस येतो म्हणून गपगुमान गोधडीत झोपून राहावं असे नाही ठरवता येणार की शांत राहून डोळे मिटून पावसाचे संगीतही ऐकण्यासाठीचा वेळ नसणार. अस्तित्वाच्या कळण्याहूनही पलीकडे पोहोचणारा असा हा पाऊस मनातळात तुडुंब भरून राहतो. चिगुळ्यातील पावसाला अध्यात्माचा धीरगंभीरपणा स्पर्शून गेलेला आहे. चिगुळेला जाताना माऊली मंदिराचे दर्शन घेऊनच पुढे जावे लागते. म्हातारीचा आशीर्वाद सोबतीला घेऊन चिगुळेच्या माऊली मंदिराची पार्श्‍वभूमी लाभलेल्या नयनरम्य परिसरातील पाऊस म्हणजे मिनी-माथेरानच म्हणावे लागेल. धुक्याने भरलेली खोल दरी, निळा- हिरवा- पांढरा- धुरकट रंगाच्या अनेक छटा – फेसाळणारे पांढरे शुभ्र – झरे वझरे – गार – ऊबदार वार्‍याचे अनोखे लावण्य. खरं तर या गावालाच साधेपणातील सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. छोटी छोटी कौलारू घरं… त्याला शोभेल असं मातीचं तेवढंच नेटकं शोभीवंत अंगण, बांबूचे केलेले कूंपण, कडेकुशीला लावलेला भाजीपाला, फुलझाडे… उन्हाळ्यात शेणमातीने सारवलेली ही अंगणे, पावसाळ्यात ठिकठिकाणी उखडूनही किती देखणी दिसायची… अजुनही दिसतात. असा एका नजाकतीने पावसाचा दिमाख अनुभवायचा तर चिगुळेच्या पावसात झिम्माड भिजून घ्यायलाच हवे. झाडांच्या – पानफुलांच्या… रंगारंगाने भरलेल्या दरीच्या, दाट धुक्यातून दिसणार्‍या झाडांची, घरांच्या आठवणींना घट्ट बिलगूनच या सौंदर्यासक्त पावसाचा मनात नसतानाही निरोप घ्यावा लागतो.
माणसांच्या सोबतीने पावसाळ्यात जनावरांचेही स्वतःचे एक आगळेवेगळे विश्‍व असते हे मान, सडा या गावातील पावसाने वेळोवेळी दाखवलेले आहे. गर्द जंगलवस्तीत वसलेली ही गावे पावसाळी चांदण्यात मुद्दामहून अनुभवावीत. ‘मलाबार ग्लायडिंग फ्रॉग’ विहरणारे बेडूक पाहण्याच्या निमित्ताने मंतरलेली एक पावसाळी संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. पायवाटेच्या शेजारीच असलेली पाण्यानं भरलेली छोटी छोटी डबकी – त्याच्या सभोवताली असलेल्या झाडावर पांढुरकी फेसाळ घरटी आणि त्यात चकाकणारे डोळे घेऊन सहजपणे न दिसणारे हिरव्या रंगाचे टवटवीत बेडूक पाहिले मात्र तेव्हा इथल्या पावसाचे पानांपानांतून निथळणारे मुक्त मनमोर थेंब पारदर्शी होत गेले. इथल्या पावसाला जंगलाचा एक वास आहे. या चांदण्या पावसाळी रात्रीत अस्वलांचा अधिवास अनुभवास आला. किरकिरणारे रातकिडे, कृमी कीटक यांचे रानभर झालेले संगीत, स्वतःच्या विश्‍वास हरवलेली मोठमोठी झाडे जशी दिसली तसेच पाऊलवाटेवर कोसळणार्‍या पावसामुळे अनावर झालेल्या सरी अंगांगावर झेलून मन कृतार्थ ही जाहले. या वाटाना चांदण्यांचा स्पर्श होता – पावसात मिसळून गेलेली त्याची रुपेरी छटा छोट्या छोट्या काळ्या पाषाणावर चित्र कोरायची, दूर कोठेतरी एखाद्या झाडावर तर तिचे वेगळेच रूप सामोरे यायचे. जंगलाचा, जनावरांचा, रातकिड्यांचा एक वास या चांदण्या रात्रीच्या पावसाला वेढूनच राहिलेला असतो. इथे मला पाडगावकरांच्या काव्यओळी आठवतात…
काळोख्या माळावर एकाकी झाड जसे
थरथरत्या फांद्यानी चंद्रकोर जपत असे
चांदण्यात दूरची झाडे स्पष्टपणे दिसतातच असे नाही. पण अशा अलवार पावसात या झाडांनासुद्धा समजून घ्यायचं असतं- सौंदर्यासक्त मनानं ऐकायचं असतं. डोळ्यांत साठवायचे असतात त्याचे वेगवेगळे विभ्रम… किर्रर्र जंगलवाटांवरची पावसाची सोबत हृदयात धडकी भरवते… जगण्यातली लय जराशी अस्थिर होते… सौंदर्याला कुठंतरी बाधा पोहोचते की काय असेच वाटत राहते. पण त्याचवेळी त्याचे संयमित जाणतेपण कष्टकरी जीवांना मनांना आश्‍वासक आधार देते.
झिम्माड, धुव्वांधार, घनघोर, मुसळधार… अशी पावसाची विविध रूपे मनातळात साठविण्यासाठी हिरव्याओल्या तृणपात्यांचा स्पर्श नसानसांत भिनवायला हवा. नव्याने उमलून आलेल्या अंकुरावरील दवबिंदूचे टपोरे थेंब हलक्या हातांनी गोंजारायला हवेत. मनपिसाट, मनमोराचा पिसारा फुलवून पावसात नाचून बघायला हवे. उन्हाळ्याच्या खाणाखुणा मिटवून डोंगरदर्‍यातून खळाळणार्‍या संचिताचे तूषार शरीरावर झेलायला हवेत. दरवर्षी येणारा पाऊस नव्याने अनुभवता यायला हवा. आपल्या सजीव मनाची अस्सल भावना जेव्हा पावसाच्या पारदर्शी कोसळण्यात मिसळते तेव्हा आकाशही भव्य वाटू लागते!