ज्योतीची भगभग

0
100

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीतील भाजपच्या प्रचारसभेमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानावर अखेर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत निवेदन करावे लागले. विरोधकांचे त्यावर समाधान झालेले जरी नसले, तरी हा विषय संबंधित महिला मंत्र्याच्या माफीनाम्यावर आणि पंतप्रधानांच्या संसदेतील निवेदनात त्या आक्षेपार्ह विधानाशी त्यांनी स्पष्टपणे फारकत घेतल्यानंतर थांबायला हरकत नसावी. हा विषय आणखी ताणून संसदेचे कामकाज सतत बंद पाडणे हे योग्य म्हणता येणार नाही. गेले तीन दिवस संसदेत कामकाज ठप्प पाडले जात आहे हा बेजबाबदारपणा आहे. साध्वी निरंजन ज्योती यांनी सभेतील आपल्या आवेशपूर्ण भाषणामध्ये ‘‘आपको चुनना है की रामजादोंकी सरकार बनेगी या ***जादोंकी’’ असे उद्गार काढले होते, त्यावरून हे सारे महाभारत घडले आहे. देशद्रोही, फुटिरतावादी यांच्यासंदर्भात आपण तसे वक्तव्य केले होते अशी सारवासारव निरंजन ज्योती यांनी जरी केलेली असली, तरी संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची व कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करण्याची शपथ घेतलेल्या एखाद्या मंत्र्याने अशा प्रकारची द्वेषपूर्ण भाषा बोलणे हे निश्‍चितच आक्षेपार्ह आहे. धर्माच्या नावावर माथी भडकावून त्याचा राजकीय फायदा उठवण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेले आहेत. भाजपालाही हे एव्हाना उमगलेले आहे आणि म्हणून रामजन्मभूमी आंदोलन बासनात गुंडाळून पक्षाने विकास आणि प्रगतीच्या संकल्पांसह पुढचे मार्गक्रमण सुरू केलेले आहे. उत्तर प्रदेशमधील गेल्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ आदी कडव्या नेत्यांनी ‘लव्ह जिहाद’ चा विषय पेटवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नाणे तेथे चालू शकले नाही. याउलट इतर राज्यांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून घवघवीत यश मिळाले. देशाच्या आर्थिक प्रगतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केलेले असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याने काही भलतेसलते बोलून त्यांच्या मार्गात असे अडथळे आणले तर त्यातून सरकारची आणि पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलीन होईल आणि आज जे अल्पसंख्यक भाजपाच्या छायेत आलेले आहेत, त्यांच्यामध्ये पुन्हा एकवार या पक्षाबाबत व नेत्यांबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि त्याचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागतील. मोदी आणि त्यांचे चेले अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप एका निश्‍चित वाटेने आज वाटचाल करतो आहे आणि ही वाट पक्षाला नवनवी क्षितिजे पादाक्रांत करण्याची संधी मिळवून देणार आहे. काश्मीरसारख्या ठिकाणी जेथे भाजपचे नावही घ्यायला लोक धजत नव्हते, तेथे येत्या विधानसभा निवडणुकीत आपली छाप उमटवण्याची तयारी पक्षाने आज केलेली आहे आणि अल्पसंख्यकही तेथे पक्षाचे झेंडे मिरवताना दिसत आहेत. केवळ निवडणुकांपुरतेच नव्हे, तर एकूणच या पक्षाची व सरकारची सकारात्मक प्रतिमा जगापुढे निर्माण होणे आजच्या घडीस आवश्यक आहे, कारण जगभरातून गुंतवणुकीचा ओघ देश अपेक्षितो आहे. या सरकारच्या मंत्र्यांवरील जबाबदारी तर अधिक आहे. मोदींना वाचीवीर साथीदार नको आहेत, तर काम करणारे लोक हवे आहेत, कारण जनतेला दिलेला ‘अच्छे दिन’ चा वायदा पूर्ण करायचा आहे. हे अच्छे दिन भाषणांतून येणार नाहीत. त्यासाठी रात्रीचे दिवस करावे लागणार आहेत. मनोहर पर्रीकरांसारख्यांना दिल्लीत खास बोलावून घेतले गेले आहे, ते त्यांच्या कार्यक्षमतेसाठी. स्वतःला साध्वी म्हणवणार्‍या निरंजन ज्योतींनी हे समजून घ्यायला हवे. जनतेची माथी भडकवण्यापेक्षा तिच्या ह्रदयात शिरण्याची ही वेळ आहे. त्या उत्तम वक्त्या आहेत हे खरे. पण बुंदेलखंडाची ही मुलुखमैदान तोफ आता दिल्लीच्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये येऊन दाखल झालेली आहे. या मंदिराचे काही कायदेकानून आहेत, काही परंपरा आहेत. आचारविचारांची शुचिता, संविधानावरील निष्ठा, देशाच्या विविधतेतून एकतेच्या, सर्वधर्मसमभावाच्या मूळ चौकटीवर श्रद्धा या सार्‍या गोष्टी असल्याखेरीज संसदेच्या त्या पवित्र मंदिरात पाय ठेवणे गैर आहे. साध्वी निरंजनज्योती पहिल्यांदाच खासदार बनल्या असल्या आणि केंद्रातील मंत्रिपदाची लॉटरी या पहिल्याच फेरीत त्यांना लागलेली असली, तरी त्यांनी ही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवावा नाही तर मंत्रिपदावरून पायउतार व्हावे.