ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, संगीततज्ज्ञ माधव पंडित यांचे निधन

0
99

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, हाडाचे शिक्षक, लेखक, समीक्षक, संगीतज्ज्ञ, गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाचे माजी कार्याध्यक्ष श्री. माधव पंडित यांचे काल सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. काल संध्याकाळी मडगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी हेमलता, पुत्र कृषी खात्याचे विभागीय अधिकारी गुरूदत्त व गौतम, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गोवा मुक्तीलढ्यात भाग घेतल्याबद्दल चार वर्षे कारावास सोसावा लागलेल्या पंडित यांनी संगीत, कला, समाजसेवा, हिंदी प्रसार अशा अनेक क्षेत्रांत काम केले. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, स्वातंत्र्यसैनिक म्हणून ताम्रपट असे अनेक सन्मान त्यांना लाभले होते. गोव्याच्या सामाजिक क्षेत्रात ते तहहयात सक्रिय होते.