ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त

0
875

– अनिल पै, मडगाव

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंबपद्धती होती. एकाच कुटुंबात तीन ते चार पिढ्यांतील माणसे गुण्यागोविंदाने नांदत होती. घरात सुसंस्कारित वातावरण असे. छोट्या मुलांवर आजोबा – आजीकडून सुसंस्कार रुजविले जात असत. सर्वांना घरचे जेवण मिळत असे. आध्यात्मिक वातावरणात ज्येष्ठ मंडळी रात्रीच्या वेळी रामायण – महाभारतातील, शिवाजी महाराजांच्या कथा सांगून त्यांच्या मनावर भारतीय संस्कार बिंबवित असत. त्यातून संघटितपणे, प्रेमाने राहायची शिकवण मिळत असे.
कुटुंबांचा विस्तार झाला, कामधंदा, नोकरीच्या निमित्ताने तरुणांना अन्यत्र जावे लागल्याने एकत्र कुटुंबपद्धतीला तडा गेला. आता क्वचितच अशी कुटुंबे पाहायला मिळतात. नोकरीधंद्यानिमित्त मुलाबाळांना शहरांत, परराज्यांत जावे लागल्याने मोठमोठी राजवाड्यासारखी घरे मोडकळीला आली आहेत. काही घरांत वयोवृद्ध माणसे तेवढी पाहायला मिळतात.
आज एक ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. खासगी व सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रम होतात, परंतु निर्जीव फुलझाडांप्रमाणे त्यांचे स्वरूप असते. मायाममतेचा ओलावा त्यात नसतो.
विदेशांत स्थायीक झालेल्या मुलांना आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यास फुरसत नसते. अशीच घडलेली एक सत्य घटना. कर्ता सवरता मुलगा पत्नी व बाळासह परदेशात. इकडे वयोवृद्ध आई तेवढी घरी. काळजी घेणारे कोणी नाही. एक दिवस आई आजारी पडली. शेजार्‍यांनी तात्काळ इस्पितळात नेऊन उपचार सुरू केले व मुलाला विदेशात कळवले. बर्‍याच वेळाने त्याने फोन घेतला आणि सांगितले की मला आता बोलायला फुरसत नाही. महत्त्वाची बैठक चालली आहे. संध्याकाळी फोन करा. संध्याकाळी फोन करून आई आजारी असल्याचे सांगितले, तर तो म्हणाला की या दिवसांत कामाचा बोजा खूप आहे. मी औषधोपचारासाठी पैसे पाठवतो व फोन ठेवला. एक दिवस ती देवाघरी गेली. आता काय करावे असा प्रश्न शेजार्‍यांना पडला. त्यांनी ही दुःखद वार्ता तिच्या मुलाला कळवली. काय दुर्दैव! त्याला काहीच वाटले नाही. तो म्हणाला, अंत्यसंस्कार करा. मला या दिवसांत जेवायलाही फुरसत नाही. आणखी एका महिन्याने पोहोचतो. अशी अनेक उदाहरणे देशात असतील.
ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणारी, त्यांच्याशी मायेने बोलणारी व काळजी घेणारी माणसे फार कमी असतात. आता फ्लॅट संस्कृती आल्याने शेजार्‍याला कोणी ओळखत नाही.
२०११ च्या शिरगणतीनुसार देशात ७६ दशलक्ष लोक साठ वर्षे व त्यावरील वयाचे आहेत, तर ८० व त्यावरील वयाचे सहा दशलक्ष लोक आहेत. २०५० साली ही ६० वर्षे वयोमानातील लोकसंख्या ३२४ दशलक्ष बनेल, तर ऐंशी व त्याहून अधिक वयाची लोकसंख्या ४८ दशलक्ष असेल.
गोव्यात समाजकल्याण खाते ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. हजारो ज्येष्ठ नागरिक त्यांचा लाभ घेतात. ८८.५० हजार ज्येष्ठांना आर्थिक लाभ मिळतो. ११,६७१ जणांना ओळखपत्रे दिली गेली आहेत, तर ७६ हजारपेक्षा अधिकजणांना दरमहा दोन हजार रुपयांचे निवृत्तीवेतन व औषधपाण्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये मिळतात. या ज्येष्ठ नागरिकांना कदंब बसप्रवासात, रेल्वे व विमान प्रवासात सवलत मिळते.
पंचवीस वर्षांपूर्वी मडगावचे श्री. मवानी, डॉ. नरसिंह वेलिंगकर, गिरी पै रायकर, शाणभाग, मधुकर मोर्डेकर आदींनी भारतीय ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना करून केंद्र व गोवा सरकारकडे मदतीची मागणी केली. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे म्हणून खास योजना करण्याची मागणी केली. आता त्याचा फायदा मिळतो आहे.
कित्येक घरांतील कमावते पुत्र वृद्धापकाळात आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. नोकरीनिमित्त विदेशात राहावे लागल्याने त्यांची काळजी घेणारे कोणी नसते. कित्येक जण घरीच राहतात. त्यांचे नातेवाईक वा शेजारी त्यांची काळजी घेतात. पण काही स्वार्थी नातलग त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांची मालमत्ता आपल्या नावे करून घेतात. कित्येक कुटुंबांत ज्येष्ठांचा पुत्र व सुनेकडून छळ होतो. वेळच्या वेळी जेवणही दिले जात नाही. आजारपणात काळजी घेतली जात नाही. मद्यपान करणारे पुत्र मारबडव करतात.
एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे बालवयात जे संस्कार होत होते, ते आता होत नाहीत. त्यामुळे तरूण पिढी बिघडत चालली आहे. कित्येक जण व्यसनाधीन झाले आहेत. मुलांकडे लक्ष देणारे कोणी घरी नसते.
आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भारतीय संस्कृतीत ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ ही शिकवण देण्याची गरज भासते. ज्येष्ठांना धनाची, पैशाची आवश्यकता नसते. त्यांना हवे असते प्रेम आणि आपुलकी. माणुसकीची भावना लुप्त होत चालली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत आहे. प्रेमाने चौकशी करणारे कोणी जवळ नसते. उतारवयात सुख व समाधान नसते. ते मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी घरोघरी भारतीय संस्कृतीची शिकवण देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.