ज्ञानेंद्रियांच्या स्वास्थ्याचे महत्त्व

0
163

– डॉ. मनाली म. पवार(गणेशपुरी-म्हापसा)

ध्वनी प्रदूषण हे श्रोत्रेंद्रियांचा अति योग, मिथ्या योग, धूळ-धुरळा-धूर हे स्पर्शेंद्रियांना तर फास्ट फूड हे रसनेंद्रियांना हानिकारक आहे. या गोष्टींचा हानीकारक परिणाम केवळ त्या त्या इंद्रियांपुरताच मर्यादित राहात नाही. तर त्याचे दुष्परिणाम सर्व शरीरावर व मनावरदेखील होतात. त्यामुळेच इंद्रियांच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

जीवनाचा उद्देश सुखप्राप्ती व सुखोपभोग हा आहे. ‘स्व’ म्हणजे आपण स्वतः. आपले अस्तित्व हेच मूलतः सुखमय आहे. त्यामध्ये ‘स्थ’ म्हणजे स्थित असलो म्हणजे आपोआपच सुखी असतो. आपले अस्तित्व हे शरीर व मनाशी संबंधित आहे. शरीर व मन हे त्यांची त्यांची कार्ये सुविहितपणे करण्याला अनुकूल असे असेल म्हणजेच ‘स्व-स्थ’ असेल तर आपणही आपोआपच स्वस्थ असतो. म्हणून पर्यायाने आपले स्वास्थ्य म्हणजेच आपल्या शरीर-मनाचे स्वास्थ्य होय. हे स्वास्थ्य असणे म्हणजेच त्यांच्या क्रिया व्यापारात कोणतेही वैषम्य नसणे व साम्य किंवा समत्व असणे. शरीर हे दोष, धातू, मल यांनी घटित आहे. यांच्या सर्व क्रियाव्यापारांना अग्नीय बल अत्यावश्यक आहे. यांच्या सुयोग्य क्रिया-व्यापारांमुळे इंद्रियादि प्रसन्नता व इंद्रियप्रसन्नतेमुळेच मनाची प्रसन्नता टिकणार व या सर्व गोष्टींमध्ये प्रसन्नता असल्यानंतर या प्रसन्नतेचा-सुखाचा भोग आत्म्याला मिळणार व आत्मा म्हणजेच आपण – त्यामुळे सुखी व प्रसन्न राहणार. म्हणून शरीरातील दोष, धातू, मल, अग्नी यांचे साम्य व त्यामुळे इंद्रिये, मन व आत्मा यांच्या ठिकाणी प्रसन्नता असणे हेच ‘स्व-स्थ’ व्यक्तीचे यथायोग्य लक्षण होय.
सर्वसामान्य व्यक्तीला स्वतःची स्वतः ओळखता येण्यासारखी लक्षणे …
१) योग्य वेळी उत्तम चरचरीत भूक लागून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे.
२) मल-मूत्र-अपान यांचे योग्य निःसारण विनात्रास होणे
३) योग्य वेळी शांत, गाढ झोप पूर्ण होऊन उचित वेळी जाग येणे व त्यानंतर टवटवीत वाटणे.
४) या सर्व क्रिया प्राकृत स्थितीत घडत राहिल्याने शरीरघटकांचे योग्य पोषण होऊन शरीरबल वाढणे, सुस्ती न राहता उत्साह व हलकेपणा वाटणे. ५) मनामध्ये रज-तम दोषांमुळे उद्भवणारे दुर्विकार न येता मन प्रसन्न असणे. यालाच आरोग्य, स्वस्थ असे म्हणतात.
प्रज्ञापराध व असात्म्य – इंद्रियार्थ संयोग हे दोन प्रधान रोगहेतू (कारणे) आहेत. रोगांचे मूळ कारणच त्या त्या इंद्रियांचा सम-वैषम्य भाव इंद्रियांना कितीही सुखोपभोग दिले तरी त्यांची तृप्ती कधीच होत नाही. उलट इंद्रियभोगाची लालसा बळावतच जाते. त्याने इंद्रियांचा अतियोग होऊन स्वास्थ्य बिघडते. अतिकठोरपणे इंद्रियनिग्रह केला तरीही मानसिक क्षोभ निर्माण होतो व इंद्रियांचा हीन योग होतो. म्हणून इंद्रियांच्या अति स्वाधीनही होऊ नये किंवा इंद्रियांचे अति दमन करून त्यांना क्लेशही देऊ नये. मनाच्या नियंत्रणात इंद्रिये ठेवून उचित तेवढेच इंद्रियभोग घ्यावेत. जसे मनामध्ये वासना तीव्र असताना बळजबरीने पाळलेले ब्रह्मचर्य आणि अतिमैथुन या दोनही गोष्टी बाधकच ठरतात.
ज्ञानेंद्रियांची काळजी –
– चक्षुरिंद्रियाची काळजी घेण्यासाठी उदय-अस्त व माध्यान्हीचा सूर्य, ग्रहण, हलणार्‍या वस्तू पाहू नयेत.
– अतिसूक्ष्म, प्रखर, तेजस्वी गोष्ट सतत पाहू नयेत.
– रूपग्रहण कार्यासाठी तेज महाभूतप्रधान चक्षुरेंद्रियाची योजना मानवी शरीरात आहे. म्हणूनच या इंद्रियांची काळजी घेताना शीत-मधुर अशा द्रव्यांचा वापर करावा.
– सतत कॉम्प्युटर किंवा एकाग्र दृष्टीने काम करणार्‍या प्रत्येकाला चक्षुरिंद्रियांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी डोळ्यांना मध्ये मध्ये विश्रांती देणे, विशिष्ट कालावधीनंतर डोळे मिटून शांत बसणे, डोळ्यांचे व्यायाम करणे हे चक्षुरेंद्रियाच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे.
– औषधी प्रयोगांमध्ये नेत्रतर्पण हा विधी करावा.
– दिनचर्येमध्ये चक्षुरेंद्रियाच्या स्वास्थ्यासाठी डोळ्यात दररोज औषधी गुणयुक्त आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे काढलेले काजळ वापरावे. डोळ्यातील ख-मल काढून डोळे स्वच्छ ठेवावेत.
* श्रोत्रेंद्रियांची निर्मिती आकाश महाभूतापासून झाल्यामुळे शब्दग्रहणाचे कार्य होते.
* श्रोत्र हे वाताचे स्थान यामुळे स्वास्थ्यासाठी तिळतेल व बाधिर्यासाठी बिल्वतेलाने कर्णपूरण अतिउत्तम.
* श्रोत्रेंद्रियाच्या स्वास्थ्यासाठी कर्णकर्कश आवाज, अति मोठ्याने लावलेल्या लाऊड स्पीकरचा आवाज ऐकू नये.
* तसेच इतरांच्या चहाड्या, इतरांविषयी वाईट ऐकू नये.
* थंड वार्‍यापासून तसेच इतरांचे वाईट ऐकण्यापासून श्रोत्रेंद्रियांचा बचाव करण्याकरता कान झाकून घ्यावेत.
* दिनचर्येमध्ये कानाच्या स्वास्थ्यासाठी तेलाने कर्णपूरण किंवा किमान तेलाने कानांमध्ये लेपन तरी करावयास सांगितले आहे.
सर्व शरीराला व्याप्त करणारे इंद्रिय म्हणजे स्पर्शनेंद्रिय –
– हे स्पर्शनेंद्रिय अन्य चार इंद्रियांना (श्रोत्र, चक्षु, रसना, घ्राण) देखील व्यापून आहे. स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा ही सर्वेंद्रियव्यापी आहे.
– या इंद्रियाची निर्मिती वायु महाभूत आधिक्याने होत असल्याने ‘स्पर्श’ या अर्थाचे ज्ञान मनास करून दिले जाते.
– स्पर्शनेंद्रियामार्फत संबंधित अवयवास सुख-दुःखाची अनुभूती व त्यामुळे तो अवयव संरक्षणाचे दृष्टीने मदत करतो. उदा. तोंडामध्ये भाताबरोबर आलेल्या खड्याची जाणीव, गविन्यामधील मूत्राश्मरीची जाणीव, डोळ्यामध्ये गेलेल्या धुलीकणाची जाणीव इ. सर्व गोष्टी स्पर्शनेंद्रियामुळेच शक्य आहे.
– स्पर्शनेंद्रियाचे अधिष्ठान त्वचा असल्याने दिनचर्येमध्ये त्वचेच्या संरक्षणासाठी स्नेहन, उद्वर्तन, स्वेदन, सुगंधी द्रव्यांनी लेपन असे उपक्रम सांगितले आहे.
– त्वचेच्या आरोग्यासाठी व मनाच्या प्रसन्नतेसाठी चंदनादी सुगंधी द्रव्ये धारण करावीत. स्वच्छ, चांगला, सभ्य व नम्र वेश धारण करावा.
* रसग्रहण करणारे, जलमहाभूतप्रधान ज्ञानेंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय (जिभ) –
– रसनेंद्रियाच्या स्वास्थ्यासाठी षड्‌रसांचा अतियोग करणारा आहार टाळावा.
– असात्म्य आहाराइतकेच महत्त्व असात्म्य वाणीला इंद्रियाचे स्वास्थ्य बिघडवण्याला आहे. त्यामुळे रसनेंद्रियाच्या स्वास्थ्यासाठी सत्य बोलावे, मोठ्याने ओरडू नये, दुसर्‍यांच्या चहाड्या करू नये, दुसर्‍यांना अपशब्द देऊ नये. आपले बोलणेही नम्र ठेवावे.
– दिनचर्येमध्ये रसनेंद्रियाच्या स्वास्थ्यासाठी गण्डूष, कवलग्रहण व धूमपान हे उपक्रम सांगितले आहे.
* घ्राणेंद्रिय हे गंधज्ञान करून देणारे, पृथ्वी महाभूत प्रधान असे इंद्रिय आहे-
* सुगंध, दुर्गंध यांचे ज्ञान या ज्ञानेंद्रियामार्फत होते.
* दिनचर्येमध्ये स्वास्थ्यरक्षणार्थ दैनंदिन करावयाचे प्रतिमर्श नस्य (२ थेंब) नासाद्वारे केले जाते.
* नाक हे शिर(मूर्ध)द्वार असल्याने स्वास्थ्यरक्षणाकरता २ थेंब तुपाचे/तेलाचे नाकामध्ये रोज घालावे. किंवा किमान तेलाने नाकामध्ये आतील त्वचेचे लेपन करावे.
स्वास्थ्य रक्षणामध्ये या पाचही ज्ञानेंद्रियांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपण घेतलेल्या आहारापासून म्हणजेच आहाररसांपासून इंद्रिय द्रव्याची उत्पत्ती होते. म्हणून इंद्रियांची सौष्ठव कार्यक्षमता राखण्यासाठी इंद्रियद्रव्यांची नित्य होणारी झीज आहारामधून मिळणार्‍या इंद्रियद्रव्यांनी भरून निघावी लागते. म्हणूनच आपला आहार हा सात्त्विक हवा. तसेच इंद्रियांच्या अधिष्ठानांची काळजीही नस्य, कर्णपूरण, अंजन, अभ्यंग आदी दिनचर्येतील उपायांनी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे इंद्रियांचा हीन, मिथ्या किंवा अतियोग टाळणे. शरीर, इंद्रियाधिष्ठाने यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे यांमुळे इंद्रियांचे कार्य प्राकृत राहून त्यांची प्रसन्नता टिकून राहते.
ज्ञानेंद्रियांची काळजी-महत्त्व –
‘असात्म्य – इंद्रियार्थ संयोग’ हे व्याधि निर्मितीचे एक महत्त्वाचे कारण आहे हे पूर्वी सांगितलेच आहे. सध्याच्या काळात अति-मिथ्या योगाची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. उदा. ध्वनी प्रदूषण हे श्रोत्रेंद्रियांचा अति योग, मिथ्या योग, धूळ-धुरळा-धूर हे स्पर्शेंद्रियांना तर फास्ट फूड हे रसनेंद्रियांना हानिकारक आहे. या गोष्टींचा हानीकारक परिणाम केवळ त्या त्या इंद्रियांपुरताच मर्यादित राहात नाही. तर त्याचे दुष्परिणाम सर्व शरीरावर व मनावरदेखील होतात. त्यामुळेच इंद्रियांच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.