जोरदार पावसाने राज्याला झोडपले

0
124

राज्याला जोरदार पावसाने काल झोडपून काढले. राजधानी पणजीसह सर्वच भागात जोरदार पाऊस पडला. पणजी शहरातील अनेक रस्ते पहिल्या पावसात पाण्याखाली गेले. मागील चोवीस तासांत ३.५५ इंच पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे सर्वाधिक ६ इंच आणि दाबोळी येथे ४.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत २३.५७ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त आहे.

राज्यभरात सोमवारी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली. राजधानी पणजी शहरातील प्रमुख भागातील १८ जून रस्ता, मिरामार, कांपाल, मळा, पाटो व इतर ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने एकच धावपळ सुरू झाली. मंगळवारी सकाळी मांडवी नदीला ओहोटी होती. तरीही पावसाचे पाणी साचले होते. दक्षिण गोव्यातील मुरगाव येथे ५.९२ इंच, दाबोळी ४.७७ इंच, मडगाव ४.०९ इंच, काणकोण २.७७ इंच, केपे २.६३ इंच पावसाची नोंद झाली. तर, उत्तर गोव्यातील पेडणे येथे ४.४२ इंच, म्हापसा २.४ इंच, पणजी २.३७ इंच, ओल्ड गोवा ३.७० इंच, साखळी २.१४ इंच तर वाळपईत १.९७ इंच पावसाची नोंद झाली.