जोफ्रा आर्चरला संधी नाही

0
115

>> इंग्लंडच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा

इंग्लंड क्रिकेट मंडळाने काल बुधवारी विश्‍वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला. या संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला स्थान देण्यात आलेले नाही. परंतु, पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणारा एकदिवसीय तसेच पाकिस्तानविरुद्धचा एकमेव टी-ट्वेंटी सामना व पाच एकदिवसीय सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या सामन्यांतील कामगिरीच्या आधारे त्याची तसेच ख्रिस जॉर्डन याची ऐनवेळी वर्ल्डकप संघात वर्णी लागू शकते.

जॉर्डनने मागील महिन्यात कॅरेबियन भूमीवर टी-ट्वेंटीमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. २०१६ नंतर मात्र त्याने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून लियाम डॉसनऐवजी ज्यो डेनली याला पसंती देण्यात आली आहे. आर्चर व जॉर्डनने मिळालेल्या संधीचे सोने केल्यास डेनलीसह लियाम प्लंकेट व टॉम करन यांच्या जागेला धोका निर्माण होऊ शकतो. डबलिन येथे ३ मे रोजी आयर्लंडविरुद्धच्या एकमेव वनडे सामन्यासाठी मोईन अली, जॉनी बॅअरस्टोव, जोस बटलर व बेन स्टोक्स या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. गुडघा दुखीतून सावरत असलेल्या ख्रिस वोक्स याला देखील या सामन्यात खेळविण्यात येणार नाही. सॅम बिलिंग्स व जेम्स व्हिन्स यांचा आयर्लंडविरुद्धच्या वनडेसाठी तसेच पाकिस्तानविरुद्धच्या टी-ट्वेंटीसाठी निवडण्यात आले असून पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांना स्थान मिळालेले नाही.

इंग्लंड वर्ल्डकप संघ ः ऑईन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बॅअरस्टोव, जोस बटलर, टॉम करन, ज्यो डेनली, आलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, ज्यो रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स व मार्क वूड.