जोकोविच अंतिम फेरीत

0
114

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने प्रदर्शनीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ही स्पर्धा ‘ऍड्रिया टूर’ स्पर्धेचा दुसरा टप्पा आहे. बेलग्रेड (सर्बिया) येथे झालेला स्पर्धेचा पहिला टप्पा ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिम याने जिंकला होता.
जोकोविचने राऊंड रॉबिन फेरीतील पहिल्या लढतीत सर्बियाच्याच पेडा क्रिस्टिन याचा ४-३, ४-१ असा पराभव केला. यानंतर त्याने जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांत असलेल्या बोर्ना कोरिक याला ४-१, ४-३ असे पराजित केले. हा सामना पाहण्यासाठी विसनिक टेनिस संकुलात हजारो प्रेक्षक उपस्थित होते. मातीच्या कोर्टवर होत असलेल्या या स्पर्धेच्या दुसर्‍या गटात रशियाचा आंद्रे रुबलेव अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर आहे.

त्याने २०१४च्या युएस ओपन विजेत्या मरिन चिलिच याचा व सर्बियाच्या डेनिलो पेट्रोविच याचा पराभव केला आहे. अंतिम साखळी लढतीत त्याचा सामना आलेक्झांडर झ्वेरेव याच्याशी होणार आहे. झ्वेरेव याने चिलिच याचा ४-३, ०-४, ४-३ असा पराभव करत आपले आव्हान राखले आहे. आपल्या शेवटच्या राऊंड रॉबिन लढतीत जोकोविचचा सामना क्रोएशियाच्या डिनो सेरदारोसिच याच्याशी होणार आहे. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याने पहिल्या फेरीत कोरिक याच्याकडून ४-१, ४-१ असा पराभव झाल्यानंतर आजारपणाचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली होती. यामुळे डिनोला संधी मिळाली होती.