जे. डे हत्याकांडप्रकरणी छोटा राजनला जन्मठेप

0
191

>> विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल

विशेष मोक्का न्यायालयाने बहुचर्चित जे. डे हत्याकांडप्रकरणी अंडरवर्ल्ड गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. छोटा राजनसह या हत्याकांडातील इतर नऊ दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष मोक्का न्यायालयाने काल हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोदिया अशी जन्मठेप ठोठावण्यात आलेल्या इतर ८ दोषींची नावे आहेत. जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या एकूण ९ पैकी ८ दोषींना प्रत्येकी २६ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यातून दीपक सिसोदियाला मात्र वगळण्यात आले आहे. या हत्याकांडप्रकरणी पॉल्सन जोसेफ आणि पत्रकार जिग्ना वोरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

जे. डे यांची त्यांच्या पवई येथील निवासस्थानाजवळ ११ जून २०११ रोजी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास करून डे यांची हत्या छोटा राजनच्या इशार्‍यावरून घडल्याचे स्पष्ट केले. जे. डे हे एका इंग्रजी सायंदैनिकाचे संपादक होते. तर जिग्ना वोरा ह्या एका इंग्रजी दैनिकात वरिष्ठ पदावर होती. पत्रकारितेतील स्पर्धेतून जिग्नाने जे. डे यांना संपवण्यासाठी छोटा राजनला चिथावले, असा आरोप करण्यात आला होता, मात्र हा आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही, त्यामुळे न्यायालयाने जिग्नाची निर्दोष मुक्तता केली. पॉल्सन जोसेफ यांचीही न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

शिक्षा सुनावली जात होती तेव्हा छोटा राजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित होता. या खटल्यात एकूण १३ जणांवर आरोप करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे.