जेरमी लालरिनुंगा

0
190

लालनेथलुंगा यांचा १५ वर्षीय मुलगा जेरमी लालरिनुंगा याने काही दिवसांपूर्वीच विक्रम करताना भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले. युथ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने पहिलेवहिले सुवर्णपदक भारताला मिळवून दिले. वैयक्तित सर्वोत्तम कामगिरी करताना त्याने तब्बल २७४ किलो वजन उचलले. सीनियर विभागातील राष्ट्रीय विक्रमापेक्षा केवळ एका किलोने हे वजन कमी होते. त्यामुळे त्याच्या प्रचंड कामगिरीची प्रचिती येते. परिस्थितीमुळे व जबाबदारीमुळे लालनेथलुंगा यांना सीनियर स्तरावर जाता आले नव्हते. परंतु, आपण पाहिलेले स्वप्न मुलाच्या माध्यमातून साकार करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
नव्वदाच्या दशकात भारतीय बॉक्सिंग वर्तुळात लालनेथलुंगा ही चिरपरिचयाचे नाव होते. मिझोरामसारख्या अविकसित राज्यातून संघर्षपूर्ण वातावरणाशी सामना करून ज्युनियर स्तरावरील सहा वेळचा चॅम्पियन म्हणून त्यांची कीर्ती होती. कमी वयात झालेले लग्न व पोटापाण्यासाठी नोकरी नसल्याने बॉक्सिंग क्षितिजावर उगवत असलेला हा तारा अल्पावधीत लोप पावला. जबाबदारी वाढल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात दैनंदिन कामगार म्हणून काम पत्करले. राजधानी ऐझवालमधील सरकारी इमारतींच्या दुरुस्तीचे काम ते सध्या करतात. यापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही त्यांनी केले आहे.
लालनेथलुंगा स्वतः बॉक्सर होते. परंतु, त्यांनी मुलाला आपला खेळ निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. सुरुवातीला जेरमीचा वडिलांप्रमाणेच बॉक्सिंगकडे कल होता. वयाची ८ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने वडिलांच्या अकादमीत बॉक्सिंगचे धडेदेखील गिरवले. परंतु, आर्थिक तंगीमुळे वडिलांना अकादमी बंद करावी लागली व येथेच जेरमीच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. २०११ साली ८ वर्षांच्या कोवळ्या वयात जेरमीने वेटलिफ्टिंग म्हणजेच भारोत्तोलनाची निवड केली. ऐझवाल येथील मालसावमा यांच्याकडे त्याने खेळाचे तंत्र शिकून घेतले तेसुद्धा पाण्याचे पाईप्स व अंदाजे पाच मीटर लांब बांबूच्या काठ्यांच्या सहाय्याने. आठ महिने कठोर मेहनत घेतल्यानंतर जेरमीची पुणे येथील आर्मी क्रीडा संस्थेत प्रशिक्षणासाठी निवड झाली. यामुळे त्याला घर सोडावे लागले. या संस्थेत प्रशिक्षक झारझोकिमा यांनी जेरमीसारख्या हिर्‍याला पैलू पाडण्याचे काम केले. पटणा येथे २०१६ साली उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत स्नॅच प्रकारात ९० व क्लीन अँड जर्कमध्ये १०८ किलो वजन उचलून त्याने सुवर्णपदकासह आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. त्याच वर्षी त्याने जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत २३५ किलोंसह रौप्य पदकाची कमाई केली. यंदा तर त्याने कमालच करताना वर्षाच्या सुरुवातीला उझबेकिस्तानमध्ये झालेल्या आशियाई युथ व ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत २५० किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. युथ ऑलिम्पिक स्पर्धांसाठी घेण्यात आलेल्या चाचणीवेळी २७३ किलो वजन सहजरीत्या उचलून दोन युथ व एक राष्ट्रीय विक्रम त्याने आपल्या नावावर नोंदविला. पुणे येथे जाण्यासाठी जेरमीने घर सोडले त्यावेळी त्याला घरच्या आठवणीने व्याकुळ केले होते. परंतु, केंद्रामध्ये मिझोराममधील दोन सहकारी भेटताच त्याला रुळण्यासाठी अधिक वेळ लागला नव्हता. त्याचे वजनही अवघे २८ किलो होते. ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे त्याचे या क्षेत्रातील ‘वजन’ मात्र नक्कीच वाढले असेल. जेरमी सध्या पटियाला येथे विजय शर्मा यांच्याकडे खेळाचे प्रगत ज्ञान आत्मसात करत आहे. खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता व सरकारने पुरस्कृत टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेतील महत्त्वाचा खेळाडू म्हणून जेरमीकडे पाहण्यात येत आहे. लॉस एंजलिस येथे २०२४ साली होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याला ‘तयार’ करण्याचे काम प्रगतीपथावर असून याचे फळ नक्की मिळणार असल्याचे दिसत आहे.