जून अखेरपर्यंत पर्रीकर परतणार

0
97

गेल्या मार्च महिन्यापासून आजारी असल्याने अमेरिकेत उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रींकर हे जून महिन्याच्या अखेरपर्यंत उपचार पूर्ण करून गोव्यात परतणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले. पर्रीकर यांच्या गैरहजेरीत सरकारचा कारभार हाकण्यासाठी त्रिसदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समिती नेमण्यात आली असून या समितीत वरिष्ठ सदस्य असलेल्या ढवळीकर यांनी पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत काल माध्यमांना वरील माहिती दिली.

पर्रीकर यांच्यावर अजूनही उपचार चालू असल्याने जून अखेरपर्यंत त्यांना अमेरिकेत थांबावे लागणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ निश्‍चितपणे पूर्ण करेल, असा विश्‍वासही ढवळीकर यांनी यावेळी व्यक्त केला. पर्रीकर यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी नेमलेल्या समितीचे भाजपचे फ्रन्सिस डिसोझा व गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे अन्य सदस्य आहेत.

मुख्यमंत्रीपदाबाबतचे
ते विधान घेतले मागे
त्रिसदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास मानसिकदृष्ट्या तयार असल्याचे सोमवारी केलेले विधान मागे घेतले आहे. सद्यस्थितीत मुख्यमंत्रीपदाविषयी बोलणे उचित नसल्याचे काल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आपण पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर दिले होते. आपण स्वत:हून सदर विषय उपस्थित केला नव्हता. जनतेला आपले कार्य आवडत असल्यास ते एक दिवस आपल्याला मुख्यमंत्री करतील असे आपण म्हटले होते, असे मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर म्हणाले.