जुन्या यंत्रणेमुळे वीजपुरवठ्याची समस्या ः वीजमंत्री

0
62

राज्यातील वीज वाहिन्यांसाठीची संपूर्ण यंत्रणा ही जुनी झालेली असून त्यामुळेच राज्याला खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षांचा विचार करून नवी वीज उपकेंद्र उभारणे, भूमीगत वीजवाहिन्या घालणे, एरियल बंचिंग वाहिन्या घालणे, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ‘रिंग’ पद्धतीचा वापर करणे, जुन्या वीज उपकेंद्रांत सुधारणा घडवून आणणे, ठिकठिकाणी नवे ट्रान्सफॉर्मर बसवणे, खराब झालेले जुने खांब बदलून त्याजागी नवे वीज खांब घालणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून त्यासाठी वीज खात्याला १७०० कोटी रु. चा निधी मिळणार असल्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. वीज खात्याने १७०० कोटी रु. चा अंदाज खर्च तयार करून केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंग यांच्याकडे सुपूर्द केलेला असून त्यांनी या खर्चाला तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे मडकईकर यांनी यावेळी सांगितले.

वीज खात्याला मिळणार असलेला १७०० कोटी रु.चा निधी राज्यातील विजेसाठीची साधनसुविधा अद्ययावत बनवण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे मडकईकर यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या राज्यात वीजेसाठीची जी साधनसुविधा आहे ती २५ वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे वीज यंत्रणेत वारंवार बिघाड होत असतो. परिणामी वीज असतानाही त्याचे वितरण करता येत नाही अशी परिस्थिती बर्‍याच वेळा उद्भवत असल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांना रिंग सिस्टमद्वारे जोडण्याची गरज आहे. काही उपकेंद्रांना त्याद्वारे यापूर्वीच जोडण्यात आलेले आहे. उर्वरित उपकेंद्रांनाही रिंग सिस्टमद्वारे एकमेकांशी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

काही ठिकाणी नवी वीज उपकेंद्रे उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पणजी पाटो प्लाझा, करासवाडा, पर्वरी ते साळगाव, साळ, शिवोली, कळंगुट, वेर्णा आदी ठिकाणी नवी वीज उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत.

कुंकळ्ळीतील आंदोलन
मागे घेण्याचे आवाहन
कुंकळ्ळी मतदारसंघात वीज खात्याने आवश्यक ती विकासकामे हाती न घेतल्याचा आरोप करून कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांनी कुंकळ्ळीतील नागरिकांसह २ जून रोजी (आज) जो रास्ता रोको आयोजित केलेला आहे तो मागे घ्यावा, असे आवाहन वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काल पत्रकार परिषेदत केले. कुंकळ्ळी मतदारसंघातील अडून पडलेली कामे लवकरच मार्गी लागणार असून कोट्यवधी रुपयांची ही कामे पूर्ण झाल्यानंतर खंडित वीज पुरवठ्याची समस्या सुटणार असल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले. कुंकळ्ळीतील विजेसंबंधीच्या विकासकामांसाठी ७.७५ कोटी रु. चा अंदाज खर्च खात्याने तयार केला आहे. या कामांची निविदा लवकरच काढण्यात येईल.