जीसीईटीचा निकाल जाहिर

0
73

राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतलेल्या गोवा समान प्रवेश परीक्षा २०१८ चा (जीसीईटी) निकाल काल जाहिर करण्यात आला असून भौतीकशास्त्र विषयात सहन शैलेश कामत (६८ गुण), रसायनशास्त्र विषयात अभय रवींद्र कुडचडकर (७० गुण) आणि गणित विषयात अर्श महेश कोरगावकर (७१ गुण) यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

शिक्षण सचिव दौलतराव हवालदार यांनी जीसीईटीचा निकाल जाहिर केला. यावेळी जीसीईटी २०१८ चे चेअरमन डॉ. व्ही. एन. शेट, तंत्रशिक्षण संचालक विवेक कामत, आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. एस. मेजर, तंत्र शिक्षण खात्याचे उपसंचालक प्रदीप कुसनूर यांची उपस्थिती होती. या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी आणि फार्मसी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. गेल्या ८ व ९ मे रोजी जीसीईटी परीक्षा पंधरा केंद्रांतून घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ४१६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांसाठी ही परीक्षा झाली. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या गुरुवार १७ ते २५ मे दरम्यान विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जातील.