जीवरक्षकांनी वर्षभरात वाचविले ५९२ देशीविदेशी पर्यटकांचे प्राण

0
91

जानेवारी २०१६ पासून जानेवारी २०१७ जून म्हणजेच गेल्या दीड वर्षांत गोवाभरातील विविध किनार्‍यांवरून समुद्रात पोहण्यासाठी गेले असता बुडणार्‍या ५९२ पर्यटकांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी वाचवल्याची माहिती दृष्टी लाईफसेव्हिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या सूत्रांनी काल दिली.
२०१६ साली जीवरक्षकांनी एकूण ४१३ पर्यटकांना बुडताना वाचवले. त्यापैकी ३१८ पर्यटक हे देशी होते. तर उर्वरित पर्यटक हे विदेशी होते. २०१७ साली जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात जीवरक्षकांनी १७९ पर्यटकांचे समुद्रात बुडताना जीव वाचवले. त्यात १३३ देशी पर्यटकांचा तर ४६ विदेशी पर्यटकांचा समावेश होता.
राज्यातील समुद्र किनार्‍यांवर जर हे जीवरक्षक नसते तर वरील दीड वर्षाच्या काळात ५९२ पर्यटकांना गोव्यातील समुद्रात आपले जीव गमवावे लागले असते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. किनार्‍यांवर जेव्हा जीवरक्षक नव्हते त्या काळात दरवर्षी अंदाजे २५० ते ३०० पर्यटकांना राज्यातील समुद्रात आपले जीव गमवावे लागत असत.
उत्तर गोव्यातील कांदोळी, कळंगुट, बागा, हणजुण, वागातोर, हरमल, सिकेरी, मोरजी, आश्‍वे व केरी तर दक्षिण गोव्यातील झालोर, काब-द-राम, गालजीबाग, आरोशी, माजोर्डा, बाणावली, वार्का, पाळोळे, बेताळभाटी, मोबोर, बोगमाळो, कोलवा, होळांत व पाटणे (काणकोण) येथील समुद्रातून या बुडणार्‍या पर्यटकांना वाचवण्यात आले.
सर्वसामान्यपणे दृष्टीने प्रत्येक किनार्‍यावर १४ जीवरक्षकांची नियुक्ती केलेली आहे. दुधसागर धबधबा व मये तलाव येथेही प्रत्येकी २ जीवरक्षकांची सोय करण्यात आलेली आहे. बागा, कळंगुट व कोलवा या प्रसिद्ध किनार्‍यांवर दृष्टीने सर्वसामान्यपणे २२ जीवरक्षकांची नियुक्ती केलेली आहे.
बुडणार्‍या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी ३५ ठिकाणी टॉवर्स उभारण्यात आलेले आहेत. तेथे जीवरक्षकांची सोय तर आहेच. शिवाय बचाव कार्यासाठी लागणार्‍या बोटी, प्रथमोपचाराचे किट्‌स, रेस्न्यू बोर्डस्, ट्युब्स, हॅन्ड हेल्ड रेडिओ सेट्‌स, बेग वाल्व मास्क् आदींचा समावेश आहे. त्याशिवाय समुद्रात उतरलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी किनारपट्टीवरून नियमितपणे जीवरक्षकांच्या बोटींच्या फेर्‍या चालूच असतात. त्याशिवाय पर्यटकांना धोक्याच्या सूचनाही देण्यात येत असतात. पाणी रेषेपासून समुद्रात १० मीटरच्या पुढे न जाण्याची सूचना पर्यटकांना देण्या येत असते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आपल्या लहान मुलांवरही खास लक्ष ठेवण्याची सूचना पर्यटकांना करण्यात येत असते.
काही वेळा पर्यटक घालून दिलेल्या अटींचे पालक करीत नाहीत आणि मग बुडू लागतात. अशा वेळी जीवरक्षकांना धाव घेऊन त्यांचे जीव वाचवावे लागतात, असे सूत्रांनी स्पष्ट केले