जीवरक्षकांचे आंदोलन २ पासून अधिक तीव्र करणार ः केरकर

0
135

>> प्रत्येक मतदारसंघात आंदोलनाचा इशारा

राज्यात गेली दोन महिन्यापासून संपावर असलेल्या जीवरक्षकांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यास सरकारी यंत्रणा चालढकल करीत असल्याने संपावरील जीवरक्षकांचे आंदोलन येत्या २ डिसेंबर २०१९ पासून तीव्र केले जाणार आहे, असा इशारा गोवा जीवरक्षक कामगार संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.

जीवरक्षकांच्या आंदोलनाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सरकारी यंत्रणा जबाबदार राहणार आहे. समुद्रात बुडून मृत्यू पावणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असताना सरकारी यंत्रणा बेफिकीर आहे. दृष्टी कंपनीच्या हाताखाली संपावरील जीवरक्षक कामावर रुजू होणार नाही. दृष्टी कंपनीकडून जीवरक्षकांना वेळेवर पगार व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, असा आरोप केरकर यांनी केला.

राज्य सरकारने दृष्टी कंपनीच्या कंत्राटाला मुदतवाढ देऊ नये. समुद्रकिनार्‍यावर जीवरक्षक म्हणून काम करणार्‍या जीवरक्षकांना गोवा पर्यटन विकास महामंडळाखाली सामावून घेण्याची मागणी कायम आहे, असेही केरकर यांनी सांगितले.

२ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात आंदोलन केले जाणार आहे. पेडणे, साखळी, फोंडा व इतर मतदारसंघात आंदोलन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जीवरक्षकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी अनेक निवेदन सादर करण्यात आली. पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. परंतु, दृष्टी कंपनीच्या सोयीसाठी जीवरक्षकांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याकडे लक्ष दिले जात नाही, असा दावा केरकर यांनी केला.

सरकारकडून दृष्टी कंपनीला वार्षिक १४४ कोटी रुपये जीवरक्षक सेवेसाठी दिले जात आहेत. मागील १० वर्षापासून अनेक युवक या दृष्टी कंपनीमार्फत जीवरक्षक म्हणून कार्यरत आहे. परंतु, त्यांना वेळेवर पगार व योग्य सुविधा दिल्या जात नाहीत. या कंपनीकडून जीवरक्षकांची सतावणूक केली जात आहे. जीवरक्षकांनी आत्तापर्यंत तीन वेळा आंदोलन केले. सरकारी यंत्रणा आणि दृष्टी कंपनीकडून जीवरक्षक प्रश्‍नी गोमंतकीयांची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी केरकर यांनी केला.