जीवनाचे मार्गदर्शक ः प्राचार्य द. भ. वाघ

0
115
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

कृतिशील पावले टाकणे हा तर प्राचार्य द. भ. वाघसरांचा स्थायी भाव… त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे, असामान्य बुद्धिमत्तेमुळे आणि प्रशासकीय कुशलतेमुळे गोमंतकाच्या जनमानसात त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली.

प्राचार्य द. भ. वाघसरांसंबंधी यापूर्वी अनेकदा अनेक कारणांमुळे लिहिणे झाले आहे. तरी त्यांच्या आठवणी पुनः पुन्हा जागवाव्याशा वाटतात. एक तर माझ्या भावजीवनात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. ते माझे श्रद्धास्थान. माझ्याप्रमाणेच अनेकांचे ते त्यांच्या अध्ययनकालात आधारस्तंभ आणि मार्गदर्शक ठरले. गोव्याच्या शैक्षणिक जगतात अद्ययावतपणा आणि गतिमानता आणणार्‍या प्रवर्तकांपैकी ते एक आहेत. चौगुले महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्राचे शैक्षणिक नेतृत्व करीत असताना सर्वंकष विकासाची आकांक्षा त्यांनी बाळगली. द्रष्टेपणा दाखविला. मुक्तीनंतर गोव्यातील वास्को, फोंडा या शहरांत जी महाविद्यालये निघाली त्यांच्या विकासाकडेही त्यांनी नेहमीच ममत्वाने पाहिले. मंगेशी येथील ‘वागळे हायस्कूल’ची उभारणी निगुतीने कशी करता येईल याचा त्यांनी ध्यास घेतला. होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांकडे नेहमीच कनवाळूपणाने पाहिले. हे सारे त्यांनी केले ते अबोल वृत्तीने… आत्मविश्‍वासाने, सकारात्मक अनुभूतीने.

कृतिशील पावले टाकणे हा तर प्राचार्य द. भ. वाघसरांचा स्थायी भाव… त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे, असामान्य बुद्धिमत्तेमुळे आणि प्रशासकीय कुशलतेमुळे गोमंतकाच्या जनमानसात त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. ते कुठेही जा, त्यांचे सर्वत्र आदराने आणि प्रेमाने स्वागत होई. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ओढून-ताणून आणलेली समाजमनस्कता नव्हती. तो त्यांच्या व्यक्तित्त्वातील सहजभाव होता. हस्तिदंती मनोर्‍यात चिंतनमग्न राहण्यापेक्षा जनसंवाद त्यांना प्रिय असे. त्यांच्या कृतिप्रवण प्रकृतीला तो प्रेरक ठरे. गोमंतकाच्या सामाजिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात गंगोत्रीसारखा प्रेरणास्रोत निर्माण करण्याचे श्रेय त्यांना आहे. ते गणिताचे नामांकित प्राध्यापक होते; पण शैक्षणिक नेतृत्व करीत असताना त्यांनी ज्ञानशाखा आणि विज्ञानशाखा यात द्वैत मानले नाही. ते ज्या काळात कार्यरत होते त्या काळात तंत्रज्ञानयुगाची चाहूल लागली होती. आजच्यासारखा सम्यक अंगांनी त्याचा विकास झाला नव्हता. गोव्याच्या त्यांच्या दोन्ही शिक्षणसंस्थांमधील कार्यकालात त्यांनी सदैव आत्मभान आणि समाजभान बाळगले. गणितातील नव्या प्रवाहांविषयी आणि अंतःप्रवाहांविषयी त्यांना आस्था वाटणे स्वाभाविक; पण त्याचबरोबर मराठी साहित्यातील वृत्तिप्रवृत्तींचा परिचय करून घेण्यात त्यांना रस होता. मराठीतील निवडक प्रस्तावनांचे पुस्तक निघाले, तेव्हा ते त्याविषयी समरसून बोलले- ‘एका पिढीचे आत्मकथन’ हा वा. रा. ढवळे यांचा गौरवग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यातील पूर्वकालीन आणि समकालीन साहित्यिकांची आत्मकथने त्यांनी आत्मीयतेने वाचली. त्यांतील डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये, प्रा. वा. ल. कुलकर्णी, प्रा. रा. भि. जोशी, प्रा. अनंत काणेकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर व वि. स. खांडेकर यांच्याशी त्यांचे अनेक दृष्टींनी निकटचे धागे जुळलेले… कविता हा वाङ्‌मयप्रकार त्यांना आवडायचा…

प्राचार्य द. भ. वाघ यांच्या क्रमाक्रमाने वाढत गेलेल्या तेजस्वी अध्यापनकालाकडे मी जेव्हा कुतूहलपूर्वक पाहतो तेव्हा त्यांचा अध्ययनकाल कसा असेल याचे कल्पनाचित्र रंगवतो. प्राचार्य वाघसर मूळचे कारवारचे… मुंबईत स्थायिक झालेले… त्यांचे शालेय शिक्षण ‘किंग जॉर्ज हायस्कूल’मध्ये (आताचे ‘छत्रपती शिवाजी हायस्कूल) झाले. ते हुशार विद्यार्थी होते. मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेत त्यांनी अत्युत्तम यश मिळविले. त्यांचे उच्च शिक्षण धारवाड येथील ‘कर्नाटक कॉलेज’मध्ये झाले. मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेज या नामांकित महाविद्यालयात १९३९ ते १९४५ मध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. एक वर्ष त्यांनी पुण्याच्या सुप्रसिद्ध ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालया’त अध्यापन केले. तेथून ते मुंबईच्या ‘विल्सन महाविद्यालया’त १९४६ मध्ये रुजू झाले. प्रारंभी प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या त्यांनी धुरा वाहिली. गणित हा त्यांचा ध्यास आणि श्‍वास होता. येथे अध्यापन करीत असताना १९४९ साली भारत सरकारने डेहराडून येथील सैनिकी विद्यालयात मुलांना गणित शिकविण्यासाठी त्यांना निमंत्रित केले होते. आर्थिकदृष्ट्या हे पद फायदेशीर असूनही तेथील शैक्षणिक दर्जा न मानवल्यामुळे ते पुन्हा ‘विल्सन महाविद्यालया’त आले. गणिताचे ‘नामवंत प्राध्यापक’ म्हणून त्यांची कीर्ती सुदूर प्रदेशात पसरली. या कालावधीत त्यांनी ‘कॅल्क्युलस’, ‘ट्रिग्नोमॅट्री’, ‘अल्जेब्रा’ ही पाठ्यपुस्तके लिहिली. जून १९६२ पर्यंत ते या महाविद्यालयात होते.

गोवामुक्तीनंतर लगोलग जून १९६२ मध्ये ‘श्रीमती पार्वतीबाई चौगुले एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन’तर्फे नवीन कॉलेज सुरू झाले. श्री. विश्‍वासराव चौगुले यांनी त्यांना प्राचार्यपद स्वीकारण्यासाठी पाचारण केले. प्रा. द. भ. वाघसरांनी नवीन जबाबदारी स्वीकारली. निष्णात प्राध्यापकांची निवड केली. १९६२ ते १९६९च्या पहिल्या सत्रापर्यंत त्यांनी उत्तम रीतीने ही धुरा वाहिली. सर्वांगीण उन्नतीचा ध्यास घेतला. उपक्रमशीलता प्रकट केली. क्रीडा, वक्तृत्व, साहित्य आणि नाट्यकला यांना प्रोत्साहन दिले गेले. त्यामुळे गोमंतकाच्या शैक्षणिक नकाशात नमुनेदार कॉलेज म्हणून या संस्थेची नाममुद्रा निर्माण झाली. या कार्यात त्यांना तत्कालीन प्राध्यापकवर्गाची उत्तम साथसंगत मिळाली. परिसरातील शिक्षणप्रेमी व्यक्तींचा नैतिक पाठिंबा मिळाला. १९६९च्या दुसर्‍या सत्रापासून मुंबई विद्यापीठाच्या पणजीतील पदव्युत्तर केंद्राचे संचालक म्हणून ते रुजू झाले. अनुभवसंपन्नता, प्रशासनकौशल्य, भरपूर ऊर्जा आणि नवनिर्माणाची जिद्द या गुणांच्या बळावर या केंद्रातील ज्ञानशाखांचा त्यांनी विकास घडवून आणला. साधनसामग्री वाढविली. अनुभवसंपन्न प्राध्यापक मिळवून दिले. पदव्युत्तर शिक्षणाची सोयसुविधा या केंद्राने विनासायास प्राप्त करून दिली. दुपारी ३.०० वाजल्यापासून व्याख्याने होत असत. त्यामुळे अनेकांना त्याचा लाभ घेता आला. १९७७ पर्यंत प्राचार्य वाघसरांनी हे पद सांभाळले. १९८५मध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘गोवा विद्यापीठा’ची ती दृढ कोनशिला ठरली.

या कालावधीत प्राचार्य वाघसरांनी आपले कर्तृत्व या क्षेत्रात उमटविले, त्याचा नामनिर्देश करणे अगत्याचे वाटते. मुंबई विद्यापीठाच्या अनेक समित्यांमध्ये तसेच गणिताच्या अभ्यासमंडळात राहून अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनाकार्यात त्यांनी मैलिक हातभार लावला. नव्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात प्राध्यापकवर्गाचे प्रबोधन व्हावे म्हणून वेळोवेळी कृतिसत्रे आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. गोवा एस.एस.सी. बोर्ड आणि हायर सेकंडरी बोर्ड यांच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. ‘गोवा एज्युकेशन बिल’च्या मसुदा समितीत त्यांनी कार्य केले. ‘युनिव्हर्सिटी बिल’ मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या या शैक्षणिक वाटचालीत दृढतेने साथसंगत केली ती ताईंनी!
गिर्यारोहणाचा त्यांना छंद होता. मुंबईत असताना टप्प्याटप्प्याने चार वेळा ते हिमालयावर जाऊन आले. त्यांपैकी एका वेळी तर ते २३,८०० फुटांपर्यंत जाऊन आले होते. त्यानंतर ‘गिर्यारोहण’ या विषयावर मुंबई आकाशवाणीवर त्यांची व्याख्यानमाला झाली. १९८० साली ‘रामन् इफेक्ट’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘रामन इफेक्ट’वर त्यांनी व्याख्याने दिली. त्यासंदर्भात लेखनही केले.

‘बॉंबे मॅथेमॅटिकल कलोक्वियम्’ हे गणितविषयाला वाहिलेले त्रैमासिक सुरू झाले. त्याच्या संपादनात प्राचार्य वाघसरांनी मौलिक वाटा उचलला. ‘शिक्षक विकास प्रतिष्ठान’साठी त्यांनी ८५,००० रुपयांची देणगी दिली. आयुष्याच्या उत्तरायणात प्रकृतिअस्वास्थ्याने त्यांना छळले. तरी त्यांचा ध्यास होता तो गोव्याच्या शिक्षणासंबंधीचा. अध्यापकाने अध्ययनशील असावे आणि नव्या पिढीला नवी क्षितिजे गाठण्यासाठी दिशा दाखवावी याकडे त्यांचा सतत कटाक्ष होता.

१९६५ मध्ये चौगुले महाविद्यालयात मी विद्यार्थी म्हणून आलो. नुकताच खेडेगावातून आलो होतो. कुणी ना ओळखीचा ना पाळखीचा! अशा वेळी ज. भि. राऊतगुरुजींसारखी, प्रा. श्री. शं. फडके यांच्यासारखी भली माणसे आयुष्यात आली. त्यांनी माझी कैफियत प्राचार्य वाघसरांच्या कानांवर घातली. त्यांनी मला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात तीन वर्षे पूर्णवेळ नोकरी दिली. प्राचार्य वाघसर माझ्या आयुष्यात आधारस्तंभ आणि मार्गदर्शक म्हणून आले नसते तर…?? त्यांनी मला बोलावून घेऊन नोकरी तर दिलीच; शिवाय विषय कुठले निवडायचे, दिवसभराच्या वेळापत्रकात तास कसे बसवायचे याची काळजी घेतली. त्यांच्या आणि महाविद्यालयाच्या समृद्ध ग्रंथालयाच्या मी कायमचा ऋणात राहीन. दीड वर्ष मला जी. ए. कार्लेकर आणि दीड वर्ष व्ही. आर. नावेलकर या उदारहृदयी ग्रंथपालांनी ज्या परीने माझ्यावर पाखर घातली, त्या आठवणी जपण्यातच मला धन्यता वाटेल. या ग्रंथालयाने मला अभ्यासाचा वस्तुपाठ दिला.