जीवघेण्या वेदना मूतखड्याच्या

0
208

 

– डॉ. मनाली म. पवार ( गणेशपुरी-म्हापसा)

पचनक्रियेतील बिघाडामुळे आहारात येणार्‍या कॅल्शियम फॉस्फेटसारख्या घटकांचे पचन नीट होत नाही आणि ते मूत्रपिंडात एकवटतात. कॅल्शियम फॉस्फेटचे सूक्ष्म कण मूत्रमार्गातून शरीराबाहेर फेकले जातात. जे कण मूत्राद्वारे बाहेर जात नाहीत, ते एकत्रित येऊन त्यापासून खडे बनण्यास सुरुवात होते.

मूत्राशयातील खडे हा सध्या सर्रास आढळणारा आजार आपल्याला आपल्या अवतीभवती पहावयास मिळतो. मूतखडा हा वृक्क, गविनी, बस्ती तथा पुढील मार्ग यांपैकी कोठेही व्यक्त होऊ शकतो. हा आजार सुद्धा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांना सतावीत आहे. आयुर्वेदामध्ये या मूतखड्यांना मूत्राश्मरी असे म्हणतात. मूत्राश्मरीचे स्वरूप लहान आकाराच्या दगडाप्रमाणे असल्यानेच त्यांना अश्मरी असे म्हणतात. यामध्ये मूत्रपिंडा(किडनी)च्या आत छोटे छोटे खड्यासारखे पदार्थ तयार होतात. एकाच वेळी एकापेक्षा अधिक खडेही तयार होऊ शकतात. अशाप्रकारचे बारीक खडे औषधोपचाराद्वारे विरघळवून मूत्राद्वारे बाहेर काढले जातात. परंतु विशिष्ट आकारापेक्षा मोठे खडे असल्यास (४-५ मिमि आकाराचे) मूत्रमार्गात अवरोध निर्माण करून असह्य वेदना जाणवतात. हा आजार मध्यवयीन लोकांमध्ये जास्त आढळतो. तसेच स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये चौपटीने अधिक प्रमाणात आढळतो. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना मूत्रपिंडातील खड्यांचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
मूतखड्याची कारणे ः
मूत्रामध्ये द्रवता कमी होणे व घनता वाढणे हे अश्मरीचे प्रधान कारण आहे. सूक्ष्म पचनामध्ये विकृति आल्याने मूत्रामध्ये युरीक ऍसिड किंवा फॉस्फेटसारख्या पदार्थांची प्रचूरता येते व त्यांचे कण हळुहळू एकत्र होऊ लागतात व परिणामस्वरूप मूतखड्याची उत्पत्ती होते.
आयुर्वेदाप्रमाणे संशोधनाची गरज असूनही शोधनोपचार न करणे व नित्य अपथ्य करणे अशी मूतखड्याची प्रमुख कारणे आहेत. तसेच सामान्यतः मूतखड्याच्या विकारांमध्ये कफदुष्टी अवश्यमेव असल्याने कफकारक आहारविहार असल्यास मूतखड्याचा त्रास अवश्य होतो. त्याचबरोबर दिवसा झोपणे, समशन, अघ्यशन, शीत-स्निग्ध-गुरू- मधुर अशा पदार्थांचे अतिसेवन करणे, पाणी किंवा द्रवाहार कमी घेणे या कारणांनी वायू बस्तिगत शुक्र, मूत्र, पित्त व कफ यांची दुष्टी करून त्यांच्या ठिकाणी शुष्कता उत्पन्न करतो, त्यावेळी क्रमशः हळुहळू अश्मरीची उत्पत्ती होते. तसेच मूत्रवेगाचे धारण करणे आणि बस्तिमध्ये मूत्राची अधिक काल संचिती होणे यामुळे मूतखडे उत्पन्न होतात.
* पचनक्रियेतील बिघाडामुळे आहारात येणार्‍या कॅल्शियम फॉस्फेटसारख्या घटकांचे पचन नीट होत नाही आणि ते मूत्रपिंडात एकवटतात. कॅल्शियम फॉस्फेटचे सूक्ष्म कण मूत्रमार्गातून शरीराबाहेर फेकले जातात. जे कण मूत्राद्वारे बाहेर जात नाहीत, ते एकत्रित येऊन त्यापासून खडे बनण्यास सुरुवात होते. हा खडा मोठा होऊन मूत्रमार्गात जातो आणि या मार्गात अवरोध निर्माण करतो. त्यावेळी तीव्र वेदना होऊन रुग्ण तडफडू लागतो.
* प्रदीर्घकाळ पचनशक्ती चांगली नसल्यास आणि मूत्रविकार दीर्घकाळ चालू असल्यास मूत्रपिंडातील न पचलेले घटक एकत्र येतात आणि खड्याचे रूप धारण करतात.
मूतखड्याचे प्रकार व लक्षणे ः
कॅल्शियमचा खडा हा मूतखड्याचा सर्वसामान्य प्रकार आहे. हा आजार महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त आढळतो. क्रिस्टिनूरिया असणार्‍या व्यक्तींमध्ये क्रिस्टाइन प्रकारचा मूतखडा आढळतो व महिलांमध्ये मुख्यत्वेकरून मूत्रपिंडातील संसर्गामुळे स्ट्रव्हॉइड किडनीस्टोन होतो.
आयुर्वेदात दोषांचे बलाबलत्वेवरून वातज, पित्तज, कफज व शुक्रज असे चार प्रकार सांगितले आहेत.
लक्षणे ः
* पाठीच्या किंवा पोटाच्या खालील भागात अचानक तीव्र वेदना होतात. या वेदना वाढून गुप्तांगापर्यंत पोचतात. काही वेळा काही मिनिटांसाठी तर काही वेळा तासन्‌तास वेदना होतात. अधुनमधून वेदना थांबतात. वेदनांबरोबर जिवाची घालमेल होते.
* उलटी येणे, ताप येणे, अंग थरथरणे, घाम येणे अशीही लक्षणे दिसतात.
* याशिवाय मूत्राची धार विशीर्ण होणे म्हणजेच एकाऐवजी अनेक धारा येऊ लागणे, एकाच वेळी अधिक लघवी होणे किंवा थेंब थेंब मूत्रप्रवृत्ती होणे, रात्रीची जास्त लघवी होणे, मूत्रातून रक्त पडणे, असे त्रास जाणवतात.
* लघवीचा रंग बदलतो. मूत्रप्रवृत्ती अस्वच्छ होते.
* किडनीस्टोन झालेली व्यक्ती पाठीकडून पोटाच्या दिशेने जाणार्‍या तीव्र वेदनांची तक्रार नेहमी करते.
* प्रकारानुरूप वातज मूतखड्यामध्ये अत्यंत वेदना असतात. या वेदनांमुळे रोगी सारखा कण्हतो, दातओठ खातो, कंपायमान होतो. रोगी मूत्रेंद्रिय वारंवार हातात पकडतो. रुग्णाला वारंवार संडासला जावेसे वाटते. अपानवायुचे गुदावाटे अधिक निःसरण होते, पण मूत्रप्रवृत्ती मात्र वारंवार, थेंब थेंब होत राहते.
* पित्तज मूतखड्यांमध्ये बस्तिप्रदेशी दाह, उष्णता व तीव्र पीडा असते.
मूतखड्यापासून बचाव कसा कराल?
– पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. दररोज दोन ते अडीच लीटर मूत्र तयार होईल अशा बेताने पाणी प्यावे. मूतखड्याने हैराण झालेल्या व्यक्तींनी दररोज पाच ते सहा लीटर पाणी प्यावे. अधिक प्रमाणात मूत्र तयार झाल्याने त्याबरोबर छोटे छोटे स्टोन वाहून जातात.
– लघवी कधीही अडवून धरू नये.
– दोन तासापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी बसून राहू नये.
– ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी चुना कधीही खाऊ नये.
– कुळथाचे सूप दररोज प्यावे.
– सफरचंदाचा रस घेतल्याने मूतखडा बनण्याच्या प्रक्रियेला आळा बसतो.
– गाजर व बटाट्याचा रसही मूतखड्यामध्ये फलदायी ठरतो.
– ऊसाचा रस, तांदळाची पेज मूत्रप्रवृत्ती वाढून बस्तिशुद्धीसाठी उत्तम आहे.
– शहाळ्याचे पाणी प्यावे.
– ताकात यवक्षार टाकून घेतल्यासही लघवी मोकळी होते.
– नारंगीचा रस घेतल्याने मूतखड्याचा त्रास कमी होतो.
– हरभरा, काकडी, मुळा, आवळा, अननस, जव, मूगदाळ, टरबुजाच्या-खरबुजाच्या बिया आदी पदार्थ खावेत. हरभर्‍याच्या सेवनाबरोबर दिवसातून ६ ते ७ ग्लास पाणी पिणे.
– आहारात प्रथिने, नायट्रोजन, सोडियम यांचे प्रमाण कमीत कमी करावे.
– ‘क’-जीवनसत्वयुक्त पदार्थ अधिक खाऊ नयेत.
– शीतपेयांचा मोह टाळावा.
– तीळ, काजू, चिक्कू यात ऑक्झलेट मोठ्या प्रमाणात असल्याने वर्ज्य करावे.
– वांगे, फ्लॉवरमध्ये युरीक ऍसिड व प्युरीन असल्याने तेही घातकच आहे.
– मद्यपान, मांसाहार टाळावा. त्यातही माशांमध्ये तिसर्‍या, खेकड्यांसारखे कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले मासे टाळावे.
– पालक, टोमॅटो, वांगे, सोयाबीन, शेंगदाणे, तांदूळ, उडीद, सुकामेवा, चॉकलेट यांसारखे पदार्थ पूर्णतः वर्ज्य करावेत व मूतखडा पडून गेल्यावरही पथ्य सांभाळले नाही तर मूतखडे परत तयार होऊ शकतात.
– मूतखड्यामुळे लघवी अडून राहिल्यास ओटीपोटावर एरंडेल तेल लावून पळसाच्या फुलांचा शेक द्यावा किंवा नुसत्या गरम पाण्याचा शेक द्यावा.
– मूतखड्याचा त्रास असल्यास केळी मोठ्या प्रमाणात खावीत. केळामध्ये बी-६ जीवनसत्व असते व ते ऑक्झलेट ख्रिस्टल्स तयार होऊ देत नाहीत. नारळपाण्यात नैसर्गिक पोटॅशियम असल्याने ते प्यायल्याने स्टोन होत नाहीत.
– कारले मूतखड्यावर रामबाण औषध आहे. स्टोन बनू न देणारे मॅग्नेशियम आणि फॉस्फरस कारल्यात असतात.
– जिरे मधासोबत घेतल्यास खडे विरघळून लघवीवाटे पडून जातात.
– तुळशीच्या बिया, साखर व दूध घेतल्यास अडकलेले स्टोनसुद्धा सुटे होऊन पडून जातात.
– सकाळी रिकाम्या पोटी कांद्याचा रस घेतल्यानेही खडे पडतात.
– दूध आणि बदामाच्या नियमित सेवनाने स्टोनचा धोका कमी होतो.
आयुर्वेदीक औषधोपचार ः
मूतखडा मोठा असल्यास प्रथम भेदन करावा. भेदनाने जेव्हा बारीक तुकडे होतात तेव्हा औषधे देऊन मूतखडे बाहेर काढून टाकावे. सर्वसाधारणपणे क्षार, क्षीर, इत्यादींचा क्वाथ प्यायल्याने मूतखडा चांगल्या तर्‍हेने पडतो.
औषधी कल्पांपैकी चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ, पुनर्नवादि काढा, वरुणादि काढा, पुनर्नवासव, उशिरासव हे महत्त्वाचे कल्प आहेत.
– मूतखडा पडून गेल्यानंतर त्याचा पुनरुद्भव टाळण्यासाठी वरुणादि काढा ४-४ चमचे दिवसातून २ वेळा पाण्याबरोबर काही दिवस घेत राहणे आवश्यक आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून मूतखड्याचे भेदन व पतन करावे व तसे न झाल्यास शस्त्रकर्माचा अवलंब करून मूतखड्याचे निर्हरण करावे.
पथ्यापथ्य – मूतखडा पडल्यानंतरही…
मूतखडा पडून गेल्यानंतरही त्याचा पुनरुद्भव होऊ नये म्हणून बरेच दिवस पथ्य सांभाळणे गरजेचे असते…
* अधिक प्रमाणात क्षार असलेले पदार्थ टाळले पाहिजेत.
* अळूची भाजी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारखे पदार्थ पूर्ण वर्ज्य करावेत.
* मूत्रप्रवृत्तीचे व मूत्राचेही प्रमाण अधिक रहावे याची काळजी घेतली पाहिजे. या दृष्टीने भरपूर पाणी पिणे, नारळाचे पाणी किंवा तत्सम द्रव पदार्थ अधिक प्रमाणात घेणे आवश्यक ठरते.
* संतुलित आहार-विहाराचे सेवन करून मूत्रसंस्थानाची काळजी घ्यावी.