जीनो क्रीडा पुरस्कार प्रदान

0
133

>> गोवा क्रीडापटूंची खाण बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य हव

गोव्याचे सरकार क्रीडा क्षेत्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असून मुख्यमंत्र्यांचेही त्यासाठी पूर्ण सहकार्य मिळत आहे. भविष्यात नॅशनल गेम्स व अन्य मोठ्या स्पर्धा भरविण्यासाठी आमची तयारी चालू आहे. आज गोवा ही कलाकारांची खाण म्हणून ओळखली जात आहे. परंतु भविष्यात हाच गोवा क्रीडापटूंची खाण बनविण्यासाठी आम्हाला तुमचे सर्वांचे सहकार्य हवे, असे आवाहन गोवा क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे (एसजेएजी) दरवर्षी देण्यात येणार्‍या ‘जीनो क्रीडा पुरस्कार ‘२०१६ -१७’ वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी केले. भविष्यात उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कारही देण्याचा सरकारचा विचार असल्याचे क्रीडामंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हॉटेल मांडवीत झालेल्या या सोहळ्याला क्रीडामंत्र्यांसमवेत केंद्रीय आयुषमंत्री तथा गोवा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक, जीनो फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप साळगावकर, क्रीडा संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, एसजेएजीचे अध्यक्ष निरज प्रभू, सचिव महेश गावकर यांची उपस्थिती होती.

सर्वोत्कृष्ट पुरुष क्रीडापटू – अनुराग म्हामल (गोव्याचा पहिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर), सर्वोत्कृष्ट महिला क्रीडापटू – अनुरा प्रभुदेसाई (बॅडमिंटन), सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – हेरंब परब (क्रिकेट), सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक – मायमोल रॉकी (भारतीय महिला संघ फुटबॉल प्रशिक्षक), सर्वोत्कृष्ट संघ – गोवा जलतरण संघ, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय (पुरुष) – सेंट झेवियर्स महाविद्यालय, म्हापसा, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय (महिला) – रोझरी महाविद्यालय, नावेली यांना मान्यवरांहस्ते यंदाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

जीनो पुरस्कारांव्यतिरिक्त नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या उपविजेत्या महिला संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या अष्टपैलू शिखा पांडे आणि फिझिओथेरापिस्ट ट्रॅसी फर्नांडिस यांचाही गौरव करण्यात आला. तसेच राज्यातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याबद्दल जीनो फार्मास्युटिकल्सचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक दिलीप साळगावकर यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याच बरोबर वरिष्ठ क्रीडा पत्रकार मंगेश बोरकर (गोवा दूत) आणि छायापत्रकार गणादीप शेल्डेकर (नवहिन्द टाइम्स) यांचाही गोवा क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
खा. श्रीपाद नाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जोवितो लोपीस यांनी केले. स्वागत नीरज प्रभू यांनी तर आभार महेश गावकर यांनी मानले.