जीएसटी : १७८ वस्तू स्वस्त होणार

0
123

>> रेस्टॉरंट जीएसटी ५ टक्के; खवय्यांना दिलासा

जीएसटीवरील परिषदेमध्ये सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत १७८ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून कमी करत १८ टक्के केला आहे. त्यामुळे आता २८ टक्के कर केवळ ५० चैनीच्या आणि अनावश्यक अशा वस्तूंवरच असणार आहे. याशिवाय पाच टक्के कर असलेल्या सहा वस्तूंवरील जीएसटी हटवण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काल संध्याकाळी वरील घोषणा केली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी उपस्थित होते.

परिषदेत हॉटेलमधील जीएसटीत घसघशीत कपात करण्यात आली आहे. यापूर्वी एसी हॉटेलवर १८ टक्के तर नॉन एसी हॉटेलवर १२ टक्के कर जीएसटी होता. आता हे प्रमाण थेट पाच टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे खवय्यांना मोठा दिलास मिळाला आहे. तारांकित हॉटेलांमधील रेस्टॉंरंटमध्ये मात्र जीएसटी १८% कायम ठेवण्यात आला आहे.

कालच्या निर्णयानंतर ज्युइंगम, चॉकलेट्‌स, आफ्टर शेव्ह, डिओड्रंट, वॉशिंग पावडर, डिटर्जंट, मार्बल, सॅनेटरी नॅपकिन, सूटकेस, वॉलपेपर, लेखन साहित्य, घड्याळे, खेळणी आदी स्वस्त होणार आहेत. तर रंग, सिमेंट, वॉशिंग मशीन, फ्रिज, तंबाखू, सिगारेट आदींसह चैनीच्या वस्तू स्वस्त होणार नाहीत. जीएसटीच्या दरावरून देशभरातील व्यापारी आणि प्रामुख्याने सत्ता नसलेल्या राज्यांमधून विरोधामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे.