जीएसटी मंडळाची उद्या गोव्यात बैठक

0
130

>> महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

जीएसटी मंडळाची ३७ वी सभा उद्या शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी गोव्यात घेण्यात येणार आहे. या जीएसटी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, विविध राज्यांचे अर्थमंत्री किंवा जीएसटी मंडळाचे सदस्य आणि सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत जीएसटी नोंदणी आधार कार्डाशी जोडण्याच्या प्रस्ताव चर्चेला येणार आहे. तसेच प्रस्तावित जीएसटी ई इनव्हाईसवर चर्चा केली जाणार आहे. आगामी २०२० पासून ई जीएसटीसाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. जीएसटी नवीन रिटर्न सादर करण्यासाठी नव्याने तारखा निश्‍चित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वीटभट्टीसाठीच्या साहित्याच्या जीएसटी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. वीटभट्टीसाठीच्या साहित्यासाठी ५ टक्के जीएसटी आकारला जात आहे. यातील रेती, खडी या साहित्याच्या जीएसटी दरात वाढ केल्यास या साहित्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी हॉटेलच्या जीएसटी दरात कपात करण्याची मागणी केली जात आहे. पंचतारांकित हॉटेलसाठी २८ टक्के जीएसटी आकारली जात आहे. यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झालेला आहे. विदेशी पर्यटकांची संख्येत ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे तारांकित हॉटेलच्या जीएसटीवर दरावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता जीएसटीचे सदस्य तथा मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केली आहे.

जीएसटी मंडळाची सभा ही गोव्यात होत असली तरी देशपातळीवरील विषयावर चर्चेसाठी घेतली जात आहे. त्यात गोव्यातील हॉटेल, बेकरी उत्पादनांच्या जीएसटीवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती व्यावसायिक कर आयुक्त दीपक बांदेकर यांनी दिली.