जिल्ह्यातील दहशतवाद पूर्णतः मोडीत

0
91
सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या दीपक केसरकर यांची सावंतवाडी शहरात कार्यकर्त्यांनी काढलेली मिरवणूक. (छाया : हरिश्‍चंद्र पवार)

विजयानंतर दीपक केसरकरांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनच्या दीपक केसरकर यांनी तब्बल ७० हजार ५३२ मते मिळवीत मोठा विजय मिळविला. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या भाजपचे राजन तेली व कॉंग्रेसचे बाळा गावडे या दोन उमेद्वारांव्यतिरिक्त केसरकर यांच्यासमोर टिकाव धरू शकला नाही. या मोठ्या विजयानंतर केसरकर यांनी आजपासून जिल्ह्यातील दहशतवाद पूर्णतः मोडीत निघाला असून माझा विजय हा कोकणी जनतेचा स्वाभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आपण या पुढे कोणावरही टीका करणार नाही. मतदारसंघाचा विकास हेच आपले प्रमुख ध्येय राहील, अशी ग्वाही पत्रकारांसमोर बोलताना श्री. केसरकर यांनी दिली आहे.या मतदारसंघात भाजपचे राजन तेली यांना २९ हजार ६६४ तर कॉंग्रेसच्या बाळा गावडे यांना २५ हजार ३३४, राष्ट्रवादीचे सुरेश दळवी ८ हजार ९८५, मनसेचे परशुराम उपरकर ६ हजार ११३, अखिल भारतीय हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे ८८२, बसपाचे वासुदेव जाधव ७८८, अपक्ष संजय देसाई ६९५, अपक्ष उदय पास्ते, ४४७, किशोर लोंढे ३९७ व नोटा १५११ अशाप्रकारे मतदान झाले आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी १२ वाजता पूर्ण झाली. पहिल्या ङ्गेरीपासूनच आघाडी घेतलेल्या केसरकर यांनी शेवटच्या २२ व्या ङ्गेरीपर्यंत आघाडी कायम ठेवत, अनेकांचे डिपॉझीट जप्त करत तब्बल ४० हजार ८६८ इतक्या मोठ्या ङ्गरकाने विजय मिळविला. श्री. केसरकर यांच्या या मोठ्या विजयानंतर सावंतवाडी शहरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.
दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेचा जल्लोष
शिवसेनेच्या उमेदवारीवर दीपक केसरकर हे प्रचंड मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अनेक गावात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या केसरकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी सेना-भाजप युती नसल्यामुळे ही निवडणूक केसरकर यांनी स्वबळावर लढवत जिंकली. यावेळी येथील जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. केसरकर यांना पाडण्यासाठी नारायण राणे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यश आले नाही उलट कॉंग्रेसचे उमेदवार बाळा गावडे तिसर्‍या क्रमांकावर तर राष्ट्रवादीचे सुरेश दळवी चौथ्या क्रमांकावर गेले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश दळवी हे मतदारसंघात चौथ्या क्रमांकावर गेले. त्यांना शिवसेना सोडू नका अशी अनेक कार्यकर्त्यांनी विनंती केली होती. मात्र उमेदवारी मिळणार असल्याचे पक्के झाल्यानंतर राष्ट्रवादी सोडून आठ दिवसांत केसरकरांपाठोपाठ शिवसेनेत दाखल झालेल्या दळवी यांनी परत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यापूर्वी केसरकर, पल्लवी केसरकर, शंकर कांबळी यांनीही त्यांना शिवसेना न सोडण्याची विनंती केली होती. मात्र ती दळवी यांनी धुडकावून लावली होती. ते अपक्ष म्हणून उभे राहिल्यामुळे जेवढी मते त्यांना मिळाली होती तेवढीही मते त्यांना राष्ट्रवादीतर्फे यावेळी मिळू शकली नाहीत.
दोडामार्ग येथे केसरकरांचे स्वागत
दरम्यान, दीपक केसरकर यांचे दोडामार्ग गांधी चौक येथे शेकडो शिवसैनिकांतर्फे पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी सायंकाळी केसरकर हे दोडामार्ग येथे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील अनेक गावांतून आलेले शेकडो शिवसैनिकांनी प्रचंड फटाक्यांची आतषबाजी करत केसरकरांचे स्वागत केले. स्वागत स्वीकारून केसरकर हे दोडामार्ग येथून गोवामार्गे मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले.