जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तीन दिवसांत केवळ ९ अर्ज

0
115

>> आजपासून अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता

राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारपासून उमेदवारांची रीघ लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसात केवळ ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात उतर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा पंचायतीसाठी येत्या २२ मार्च २०२० रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतीसाठी ५० जागा असून निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जात आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामाला सुरू होऊन चार दिवस उलटले तरी भाजप, कॉंग्रेस, मगोप या प्रमुख पक्षांना आपल्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास यश प्राप्त झालेले नाही. भाजपने जिल्हा पंचायतीसाठी आत्तापर्यंत ३१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कॉंग्रेस, मगोप, आम आदमी पक्ष यांनी उमेदवारांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही.

जिल्हा पंचायतीसाठी ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी तीन, दुसर्‍या दिवशी दोन आणि तिसर्‍या दिवशी चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍याची संख्या वाढणार आहे.

कॉंग्रेस पक्षाने चाळीस जागांवर निवडणूक लढविण्याचा घोषणा केलेली आहे. परंतु, उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अनेकांनी संपर्क साधलेला आहे. कॉंग्रेस आणि मगोप निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

भाजपमध्ये काही मतदारसंघात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवार निवडीच्या प्रश्‍नावर आव्हान दिलेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी अडचण होत आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे.

खास नियंत्रण कक्ष
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात खास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून निवडणुकीसाठी संबंधी तक्रार या नियंत्रण कक्षाकडे केल्या जाऊ शकतात. या उत्तर गोवा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक – २२२५०८३ असा आहे.