जितूने साधले सुवर्णलक्ष्य

0
125
Gold medallist India's Jitu Rai (L) and bronze medallist India's Om Mitharval pose on the podium following the men's 10m air pistol shooting final during the 2018 Gold Coast Commonwealth Games at the Belmont Shooting Complex in Brisbane on April 9, 2018. / AFP PHOTO / Patrick HAMILTON

भारताचा अनुभवी नेमबाज जितू राय याने काल सोमवारी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. बेलमॉंट नेमबाजी केंद्रावर झालेल्या या स्पर्धेत भारताच्याच ओम मिथरवाल याने कांस्यपदकाची कमाई केली. चार वर्षांपूर्वी ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रायने ५० मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळविलेल्या जितूने अंतिम फेरीत २३५.१ गुणांचा वेध घेतला.

ऑस्ट्रेलियाच्या केरी बेल याने २३३.५ गुणांसह रौप्य तर मिथरवाल याने २१४.३ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीच्या पहिल्या टप्प्यानंतर जितूचे १००.४ तर ओमचे ९८.१ गुण झाले होते. बाद फेरीच्या दुसर्‍या टप्प्यात जितूने पहिल्या दोन प्रयत्नांत १०.३, १०.३ गुण घेत आघाडी वाढवली. ओमने दोनवेळा १०.१ गुण मिळवत बेलला तिसर्‍या स्थानी ढकलले. जितूने यानंतर १०.२ गुण घेत आपली प्रगती कायम ठेवली. परंतु, यानंतर पुढील दोन प्रयत्नांमुळे त्याचे सुवर्ण धोक्यात आले होते. ८.४ व यानंतर ९.२ गुणांमुळे ओमला जितूच्या जवळ जाता आले. यानंतर जितूने १८व्या प्रयत्नात ८.८ तर ओमने १०.० गुण प्राप्त करत आपले व जितूमधील अंतर कमी केले. १८व्या प्रयत्नानंतर जितूचे १७७.७ तर ओमचे १७६.६ गुण झाले होते. मिथरवालची यानंतर घसरण झाली तर रायने १०.० गुण घेत आपली आघाडी वाढवली.

रायने आपली आघाडी ऐवढी वाढवली की शेवटच्या दोन प्रयत्नांत ९.२ गुण घेऊनही प्रतिस्पर्धी त्याला मागे टाकू शकले नाहीत. पात्रता फेरीत मिथरवालने ९६, ९६, ९८, ९९, ९६, ९९ असे गुण घेतले तर जितूने ९८,९२,९४, ९६, ९५, ९५ असे गुण घेतले होते.