जावईबापू

0
459

> लाडोजी परब

 
‘कारभारी दमानं…’ हे गाणं ऐकलंय ना तुम्ही? उभ्या आयुष्यात त्याला दमानच घ्यावं लागतं. कुटुंब व्यवस्थेत जावयबापूला महत्त्व फार! मुली सासरी जाताना आई बाबांचा कंठ दाटतो. माप ओलांडल्यावर मात्र मुलीला कंठ सुटतो. एक जावई असा निघाला, मुलीच्या घराकडून मिळतं म्हणून घेत राहिला. आणि एवढा आळशी बनला की आपसूकच घरजावई बनला. आता फावल्या वेळात सासरी शेतीची कामे, नाही तर फावल्या वेळात नारळ सोलून दे, भाजी निवड अशी कामे करतो. नवराच कसा सुखी राहील ही मुलीला काळजी! शेवटी काय, कपाळाचं कुंकू टिकवायला पाहिजे!
बर्‍याचदा मुलीचे आई बाबा म्हणतात, ‘लाडात वाढलीय माझी पोर, तिचे हट्ट पुरवा’ हे वाक्य सांगण्याची काय गरजच पडत नाही. उभ्या संसारात हट्टच हट्ट! एक गाणं आहे,‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर!’ आता चटके नक्की कुणाला बसतील याचा नेम नाही. एक कुटुंब असं बघितलं, पाच वर्षे सुखानं नांदत होती नवरा बायको. दोन मुलं झाली. नवर्‍याची नोकरी सुटली अन् त्याची छोकरी उडाली! मुलांना टाकून एका बिल्डरबरोबर पळाली. मुलं विचारतात, ‘बाबा, आई खयं गेली?’ बाबा काय सांगणार? ‘मशनात!’ सासू सासर्‍याला खूश ठेवले तर तुम्ही खूश रहाल, हा सुखी संसाराचा मूलमंत्र आहे. कधी कधी तर सासूच मुलीचे कान भरते. ‘आम्ही भोगला ता मुलीच्या पदरात पडाक नको’ आपल्या परिस्थितीपेक्षा त्यांच्या जास्त अपेक्षा असतात, जावयबापूंकडून. आजकाल नवी नवरी आल्यावर मुलाच्या आई बाबांना धडकी भरते. त्यामुळे लाडीगोडीने वागण्याशिवाय पर्याय उरत नाही.
एका मुलीच्या मनाविरुद्ध घडलेल्या लग्नाची ही गोष्ट. मुलीच्या चेहर्‍यावर ना हसू ना रडू. थोबाड वाकडं करून होणार्‍या नवर्‍याकडे पाहत होती. कधी एकदा भटजीबुवा बडबड संपवतात, असं झालेलं. त्यातच बॅायफ्रेंडचे अधूनमधून मिस कॉल. तयार झाल्यावर मागच्या दाराने बाहेर पड, असं बजावलं होतं त्याने. पण मुलीला एवढी ‘झेड प्लस’ सुरक्षा होती की तिला बाहेर पडता आलं नाही. शेवटी काय अक्षता पडल्या. माप ओलांडण्या अगोदर उखाणा घ्यायला लावला तर म्हणते कशी, ‘गोव्याहून आणले काजू, विश्‍वासरावांच्या थोबाडीत द्यायला मी कशी लाजू?’ धडकन घरात घुसली. सकाळी नवरा उठून बघतो, तर मुलगी गायब! आता जावयाने काय करायचं सांगा!
आईवडिलांचे छत्र, संस्कार, शिकवणी आणि त्यांचे आचार विचार सगळ्याच मुलींना पटतात असं नाही. प्रेमापोटी नात्याला झुगारणारी तरुण पिढी पारंपरिक संस्कारांना कितपत अंगीकारतील ही शंकाच! एका जोडप्याला पाच वर्ष मूलबाळ नव्हतं. जावयाला सासरी जायलाही लाज वाटायची. सासूचा फक्त एकच प्रश्‍न असायचा ‘जावईबापू, आता तरी गोड बातमी आसा मां?’ जावई काय सांगणार? बर्‍याच वर्षांनी मुलगी झाली. अन् त्याने गावभर पेढे वाटले. आपल्या लाडक्या पत्नीला म्हणतो, ‘अरेरे, मुलगी झाली मुलगो झालो असतो तर…’ ‘ओ, जरा गप्प रवा, तुमच्या भरवशार रवलय आसतय तर ती मुलगी सुद्धा झाली नसती…’आता काय बोलणार? एकवेळ मुलीची बाजू आर्थिक दृष्ट्या भक्कम असेल आणि जावई अन्नाला महाग असेल तर पुढे काय वाढून ठेवलंय सांगायला नको, जावयाचा छळ सुरू! मग बायकांचे प्रश्‍न ठरलेलेच असतात. ‘मेल्या तुका काम नको, आयता गिळाक व्हया, जास्त उडू नको, माका शिकव नाकात, मिया तुमका पुरां ओळखतंय, खिशात नाय आणो आनी फुसके बार सोडता, रात्री बघतंय तुमका…वगैरे वगैरे. नवरे हे गणितासारखे असतात, समजायला कठीण पण सोडवायला अवघड. पण एक सल्ला द्यावासा वाटतो. बायको बरोबर भांडण झालंच तर ‘मौन’ हा त्यावर प्रभावी उपाय आहे. आजकाल नाती तोलामोलाची लागतात. जावयाकडून काय आणि मुलीकडून काय मिळणार याकडेच जास्त डोळा! त्यामुळे संसाराचा तराजू नेहमी दोलायमान असतो. आणि याच गोष्टी बायका भांडणात उकरून काढतात. सासू सुनेचं जर भांडण चाललं असेल तर जरा डोकावून पहा, ‘काय, तुझ्या माहेरसून दिवक नाय’, ‘मेला फुटक्या हाताचा, माहेरसून येताना रिकाम्याच इलय’, पांढर्‍या पायाचा तू’, मग सुनेची ढाल, मी म्हनान लग्न केलंय तुझ्या मुलाबरोबर, दुसरीशी असता तर कधीच घर सोडून जाता, इतकी इस्टेट आसा, म्हनान सांगल्यानी आणि बघतय तर काय, ह्यांका गिळाक अन्न नाय.. वगैरे वगैरे. सुसंस्कृत कुटुंबे तर पैशानेच तोलामोलाचं नातं ठरवितात. एका कुटुंबात आई, वडील दोघेही नोकरीला. त्यांना एक मुलगी होती. मुलीची काळजी सासूबाई घ्यायच्या. त्यांना अधून मधून विडी ओढण्याची सवय, झाले असे, मुलीलाही ही सवय जडली. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची कधीही भीती नसते. कारण त्याचा त्याच्या पंखावर विश्‍वास असतो. तसेच या नात्याचे आहे. स्वत:वर जर विश्‍वास असेल तर स्वकर्तृत्वाने सुखी संसाराची फळे चाखायला मिळतील. घरोघरी मातीच्या चुली! भांडणं होतच राहणार, पण त्यातून सावरणार्‍या जोडप्याला मला वाटतं संसाराचा खरा अर्थ कळला असेल.
परवा एक जोडपं भेटलं. प्रॉपर्टीसाठी बापाविरोधात न्यायालयात दावा दाखल करून बापालाही कट्टर वैरी बनवलेलं. एकेकाळी हसत खेळत वावरणारं हे कुटुंब आज एकमेकांच्या विरोधात उभं! त्यांना सासरच्यांची फूस! न्यायालयात दावा आपल्यासारखा झाला म्हणून ते जाम खूष होते. म्हणाले, ‘चल तुका पार्टी देतय, आज आम्ही जाम खूष आहोत.’ चेहर्‍यावर आनंद होता. पण तो चिरकाल न टिकणारा! मी म्हटलं, ‘तुम्ही दावा जिंकलात पण लाखमोलाचं नातं तोडलात. त्यात कसला आलाय आनंद? आज सासरचे जावईबापू बहाद्दर म्हणतील. प्रॉपर्टी, पैसा, जमीन इथंच राहणार आहे. ते कुणी मृत्यूनंतर घेऊन जाणार नाहीत. पण या वेड्यांना कोण सांगणार? उद्या तुमच्यावर ही वेळ आली तर? तो निरुत्तर बनला. पण केलेल्या कर्माचा पश्‍चात्ताप मात्र चेहर्‍यावर नव्हता.