जाळे

0
214

– वासुदेव नरहरी कारंजकर
त्या घाणेरड्या चाळीच्या वरच्या मजल्याच्या वर्‍हांड्यात उभी असलेली सरस्वती कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या लहानशा पिवळ्या फुलपाखरासारखी दिसत होती. तिने लिंबू रंगाचा चुडीदार घातला होता. मुंबईची हवा तिला बिलकुल मानवली नव्हती. सगळीकडे घाण, घाण आणि घाण! इथून, या वर्‍हांड्यातून तरी काय वेगळे दिसत होते? समोर माहीमची अथांग झोपडपट्टी पसरली होती. खाडीचा कुबट वास; मलमुत्राचा, कचर्‍याचा वास यामुळे सगळ्यांने डोके भयंकर उठले होते. त्यातच समोरच्या झोपडीतल्या सज्जाद खाटकाच्या झोपडीत नेहमीसारखी त्याच्या दोन बायकांची कचाकचा भांडणे चालली होती. घट्ट काळा खातेरा भरलेले गटार रस्त्यालगत होते. त्याच्या वरच्या सर्व फरशा झोपडीवाल्यांनी काढून आपल्या झोपड्यांना आधार द्यायला उचकटून नेल्या होत्या. माणसांची गर्दी असलेल्या खोलीत थांबून जीव घुसमटून घेण्यापेक्षा निदान हे बरे होते. काय करून घेतले आपण हे? पायावर धोंडा मारून घेतला स्वत:च्या! सरस्वतीच्या मनात येत होते.
स्वच्छंदी पाखरासारखे तिचे गोव्यातल्या आडसवली नावाच्या खेड्यात लहानपण गेले. हिरवीकंच झाडी. गावामागे सगळे डोंगरच डोंगर! मैत्रिणींबरोबर भटकायला, हुंदडायला काय मज्जा यायची. असोळी, जांभळे, तोरं खायची. खेळ खेळायचे. गावातल्या लहानशा देवळातील गार गार फरशीवर सागरगोटे, काचाकवड्या खेळायची. सणासुदीची धम्माल सरस्वतीला आठवली. गणपती आठवले. पावसाळ्यानंतरचा झुडपांना, पानांना येणारा ताजा ताजा वास आठवला. आडसवलीतल्या तिच्या घरापुढच्या जाया-जुईचा वेल, शब्दुलीची नाजुक रंगीबेरंगी फुले सगळे सगळे आठवले आणि जीव कासावीस झाला.
पण आता सुटका नव्हती. या मुंबईच्या जाळ्यात ती अलगद अडकली होती. कितीही हातपाय मारले तरी यातून आता सुटका नाही हे तिला कळून चुकले होते. तिची आक्रस्ताळी, कजाग सासू आतल्या खोलीत एखादा कोळी त्याच्या जाळ्याच्या मध्यभागी टपून बसावा तशी बसली होती. तिला माहीत होते, आपली नवी सून जाऊन जाऊन कुठे जाईल तर वर्‍हांड्यात! येईल वठणीवर महिन्या दोन महिन्यांत. गावाकडून आलेली नवी पोर आहे. बावरली असेल मुंबईला बघून. पण होईल सवय हळूहळू… मग सुतासारखी सरळ होईल.
सरस्वतीचे सगळेच बिनसले होते. यापूर्वी ती कधीच मुंबईला आली नव्हती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा नवरा महेश आडसवलीला त्याच्या मावशीकडे आला होता. तो सरस्वतीच्या मनात भरला. त्याचे पॉश वागणे, परफ्युमचा वास, त्याचे स्टायलिश कडक कपडे सगळ्यांची सरस्वतीवर छाप पडली. आडसवलीच्या गणू नावाच्या तिच्या लांबच्या नात्यातल्या मुलाचे तिच्यावर लक्ष आहे हे तिला जाणवले होते. लग्नासाठी त्याने आडवळणाने विचारणाही केली होती. त्याची स्वत:ची टॅक्सी होती. फोंड्याच्या स्टॅण्डवर तो गाडी लावून दिवसभर भाडी मारायचा. पण हा मुंबईहून आलेला महेश बँकेत कामाला होता. त्याचे वागणे, बोलणे कसे सिनेमातल्या हिरोसारखे गोड वाटत होते. नाहीतर गावंढळ गणू! शीऽऽ कसले नाव? मग ती महेशच्या प्रेमातच पडली. नंतर तिची सासू रीतसर लग्नाची बोलणी करायला आडसवलीला आली आणि तिने प्रेमाने सरस्वतीचे गाल कुरवाळले. सरस्वती रंगारूपाने शंभरजणीत उठून दिसेल अशी. अशी सुंदर सून आणि तीही गावाकडची हे पाहून ती हरकून गेली होती. सासूच्या प्रेमळ वागण्याने भोळी सरस्वती फसली. तिला आपली होणारी सासू मायाळू वाटली. आईपेक्षाही जवळची वाटायला लागली.
सरस्वतीच्या आईला आपल्या पोरीची आवड-निवड माहीत होती. तिने परोपरीने समजवायचा प्रयत्न केला की ‘बाय, तुला मुंबई आवडणार नाय. तुला तिथं काही सुख मिळणार नाय, तुझी घुसमट होईल.’ पण महेश तिला सलमानखान वाटत होता. आणखीन दुसरे तिला काहीच दिसत नव्हते. मग आई तरी बिचारी काय करणार? सरस्वतीचा बापही म्हणाला, ‘तीचं नशीब आणि ती! आपण किती पुरे पडणार?’ मग आडसवलीलाच लग्न पार पडले. महेश होंडा सिटी घेऊन लग्नासाठी आला होता. तो, त्याचे आईबाप, एक धाकटा भाऊ हे सगळे गाडीतून आले. बाकी दोनचार शेजारी, पाचसहा मित्र असे फक्त वीस-बावीस जणच त्यांच्याकडून लग्नाला होते. सगळ्यांची सोय फोंड्याच्या लॉजवर केली. लग्नानंतर सरस्वतीला घेऊन सगळे मुंबईला आले. दोन दिवस चौपाटी, राणीची बाग, भेळ, गजरा असली कौतुके झाली. आणि मग नवलाईचे नवे रंग ओसरले. महेश बँकेत कामाला होता, पण शिपाई होता. त्याच्या लग्नापूर्वी दोनतीन भानगडीही होत्या. अधूनमधून त्याला दारूपण लागायची. त्याने होंडा सिटी मित्राकडून भाड्याने आणली होती. सासू दिवसभर वटवट करायची. म्हातार्‍या सासर्‍याला दर अर्ध्या तासांने चहा लागायचा. त्याची लोचट नजर सारखी सरस्वतीला न्याहाळायची. तिला त्या एवढ्याशा खोलीत कपडे बदलायची पण सोय नव्हती. नवर्‍याकडे तक्रार केली तर तो म्हणाला, ‘ही मुंबई आहे, इथं हे चालायचंच! आपण दुर्लक्ष करायचं. अंगाला काय भोकं पडतात का पाहिलं तर?’ आता तोच जर असं म्हणाला तर आता काय करायचे?
दिवसभर खाडीचा घाण वास. कपड्यांचा कुबट वास. गटारातल्या खातेर्‍याचा वास. फॅक्टरीच्या भोंग्याचा आवाज, हॉर्नचा आवाज, भांडणाचा आवाज, सायरनचा आवाज, रेल्वेचा आवाज, आगीच्या बंबाचा आवाज. कुणाकडे बोलायचे असले तरी ओरडून बोलावे लागायचे. अंग चोरून जेवायचे, अंग चोरून अंधारात आवाज न करता आंघोळ करायची. नवर्‍याच्या घामट शरीराला चोरट्यासारखे, आवाज न करता बळी जायचे, हुं नाही की चूं नाही! सगळे मांजरासारखे निमूटपणे सहन करायचे. लहान लहान दोनच खोल्या. आतल्या गॅसच्या ओट्याजवळ रात्रभर उष्ट्याखरकट्याचा वास घेत, झुरळांच्या संगतीत झोपायचे. पायही नीट सरळ करता यायचे नाहीत. वर रात्रभर म्हातारा खोकायचा. आडसवलीला यापेक्षा मोठी आंघोळीची मोरी होती. सरस्वती आता तीन-चार महिन्यांतच निराशेने मोडून गेली होती.
लहानपणापासून तिला टीव्ही पाहायला आवडायचा. आडसवलीला तिच्या घरी ब्लॅक अँण्ड व्हाईट का होईना पण टीव्ही होता. त्यावर घरातले सगळे निवांत सिरीअल पाहायचे, गाणी पाहायचे. आणि इथं…? रंगीत टीव्ही असूनही लग्न झाल्यापासून एकदाही नीट पाहिल्याचे आठवत नाही. दिवसभरच्या गोंगाटात काही ऐकूही येत नाही. कुठली गाणी अन् कुठली सिरीयल आता आयुष्यात? आता पश्चात्ताप करून काहीही उपयोग नव्हता. नशिबी आलेय ते भोगावेच लागणार होते.
आता आपण या जाळ्यात अडकलो आहोतच. आपल्याला कुरतडून खाणारा कोळी- आपली सासू- आत आपली वाट पाहत बसली आहेच. सरस्वतीच्या मनात विचार येत होते, ही मुंबई म्हणजे एक कोळ्याचे जाळे आहे, ही वस्ती, ही चाळ म्हणजे एक जाळे आहे आणि आता त्यात आपण पक्के अडकलो आहोत. यातून सुटका नाही.
आपण सासूला कोळी समजतो, पण कदाचित पंचवीस-तीस वर्षांपूर्वी तीही आपल्यासारखीच या जाळ्यात अडकलेली असेल आणि आणखी तीस-पस्तीस वर्षांनंतर आपणही अशीच गावाकडून एखादी सून आपल्या जाळ्यात ओढून आणणार आणि आपणही तशीच तिला या जाळ्यात ओढून घेणार… निराश झालेली सरस्वती सासूची हाक ऐकून आत जाळ्यात जाता जाता विचार करू लागली….