जायबंदी नदाल स्पर्धेबाहेर

0
87

अव्वल मानांकित राफेल नदाल याचे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे. उजव्या पायाच्या जांघेचा स्नायू दुखावल्यामुळे नदालला क्रोएशियाच्या मरिन चिलिच याच्याविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्ध्यावरच सोडावा लागला. नदालने सामना सोडला त्यावेळी ३-६, ६-३, ६-७ (५), ६-२, २-० अशी स्थिती होती.

पहिला व तिसरा सेट जिंकलेल्या नदालला दुसरा व चौथा सेट गमवावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या खेळाडूने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या सामन्यातून निवृत्त होण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. २०१० साली नदालवर अँडी मरेविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत माघार घेण्याची पाळी आली होती. नदालला आत्तापर्यंत सातवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराजित व्हावे लागले आहे. यातील पाचवेळा ऑस्ट्रेलियन ओपनमधील मेलबर्न पार्कवरील निळ्या हार्डकोर्टवर त्याचा पराभव झाला आहे.

सहाव्या मानांकित चिलिचने सामना पाच सेटपर्यंत खेचत नदालच्या तंदुरुस्तीची परीक्षा पाहिली. तब्बल ८३ विजयी फटके लगावताना चिलिचने उपांत्य फेरीत इंग्लंडच्या काईल एडमंड याच्याशी गाठ पक्की केली. पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य सामन्यात काईल एडमंड या जागतिक क्रमवारीत ४९व्या स्थानावरील खेळाडूने तिसर्‍या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव याला ६-४, ३-६, ६-३, ६-४ असे हरविले.

महिला एकेरीत तिसर्‍या मानांकित इलिना स्वितोलिनाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. तिला बेल्जियमच्या इलिस मार्टेन्सने ६-४, ६-० असे सहज हरविले. तीन सेटच्या कडव्या संघर्षानंतर द्वितीय मानांकित कॅरोलिन वॉझनियाकीने बिगरमानांकित कार्ला सुआरेझ नवारोला ६-०, ६-७, ६-२ असे नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत आज २१वी मानांकित अँजेलिक कर्बर व १७वी मानांकित मॅडिसन कीज यांच्यात तसेच अव्वल मानांकित सिमोना हालेप व सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णाने टिमिया बाबोससह ‘अंतिम ८’मध्ये प्रवेश करताना चौथ्या फेरीत वानिया किंग व फ्रांको स्कूगर यांना ६-४, ६-४ असे हरविले.