जागतिक मूत्रपिंड दिवस

0
572

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
जागतिक मूत्रपिंड (रिनल) दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारी जगभर साजरा केला जातो. २००६ पासून हा दिवस साजरा करायचे ठरवले गेले. या दिवशी जगभर मूत्रपिंडाचे महत्त्व, त्यांचा आपल्या आरोग्याशी संबंध व मूत्रपिंडाच्या आरोग्यासंबंधी माहिती दिली जाते.
पूर्वी जगभर संसर्गजन्य रोगांचे वर्चस्व होते व त्या रोगांनी मरणार्‍यांचे प्रमाणही जास्त होते. आज ते प्रमाण कमी झालेले आहे व असंक्रमिक रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. रक्तदाब, मधुमेह या रोगांनी जगाला ग्रासले आहे. विकास पावलेल्या राष्ट्रात हे रोग जास्त आढळतात व या रोगांनी मूत्रपिंडावर व्यापक परिणाम होऊन ते निकामी होऊन माणसे दगावतात.
हा दिवस साजरा करण्यामागची कारणं व ध्येय ः
१) वाढलेला रक्तदाब नि मधुमेह – या रोगांनी ग्रस्त झालेल्या रुग्णांना पुढे जुनाट मूत्रपिंडाचे रोग होतात ज्याचा मूत्रपिंडावर व्यापक परिणाम होतो, त्याविषयी जागृती.२) रक्तदाब व मधुमेहाकरिता सर्वांची तपासणी करणे व ते होऊ नयेत म्हणून काळजी घेणे.
३) या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सर्वसामान्यांना त्याविषयी माहिती देणे व ज्यांना हा रोग होण्याची शक्यता वाटते त्या लोकांना वेगळे करणे.
४) सर्व राष्ट्रांना यात भाग घेण्यास प्रवृत्त करणे.
५) मूत्रपिंड रोपणाविषयीचे कार्यक्रम करणे.
६) त्यांत सक्रिय सहभाग असणे. लोकांमध्ये जागृती निर्माण करणे.
या वर्षाचे ब्रीद वाक्य- ज्ञळवपशू हशरश्रींह षेी रश्रश्र – मुत्रपिंडाचे आरोग्य सर्वांसाठी!
प्रत्येक मूत्रपिंडात लाखो छोटे छोटे नेफ्रॉन्स असतात. जर त्यांना बाधा झाली तर त्यांचे काम बंद पडते. मग राहिलेले नेफ्रॉन्स काम करू लागतात. त्यांचे काम असते रक्तातील वाईट पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे फेकणे. केव्हा केव्हा मूत्रपिंडावर दबाव वाढतो व हे बाकी राहिलेले नेफ्रॉन्स ते काम यशस्वीरीत्या करू शकत नाहीत. याला ‘सीकेडी’- क्रॉनिक किडनी डिसीज असे म्हणतात.
सीकेडीविषयीच्या कोणत्याच गोष्टीचा आम्हाला विसर पडता कामा नये.
१. सीकेडीला लक्षणे नाहीत.
२. स्वतःहून हा रोग बरा होत नाही.
३. मूत्रपिंडविषयक कोणताही रोग बरा होऊ शकतो. जेवढ्या लवकर तो रोग आपल्याला समजेल तेवढ्या लवकर औषधाने त्या रोगाचे निवारण होऊ शकते.
४. रक्त व मुत्रतपासणी केल्यावर या रोगाचे निदान होते.
मुत्रपिंडाचा रोग हा सामान्य असतो पण बाधक व घातकही बनू शकतो.
आपल्या लोकसंख्येच्या ८ ते १० टक्के ज्येष्ठांमध्ये मूत्रपिंड बाधा झालेली असते. दरवर्षी लाखो माणसे सीकेडीच्या दुष्परिणामांमुळे मरण पावतात.
याचे घातक परिणाम ः
* या रोगाचे निदान लवकर झाले नाही तर रुग्णाचे मूत्रपिंड निकामी होते व हा शेवट ठरतो. यावर फक्त डायलिसिस किंवा मूत्रपिंडाचे रोपण हाच पर्याय बाकी राहतो.
* या रोगामुळे रुग्णाला हृदयविकार होऊ शकतो. जर मूत्रपिंडाच्या रोगाचे निदान लवकरात लवकर झाले तर त्यावर इलाज होऊन मूत्रपिंड निरोगी बनते.
* रक्तदाब व मधुमेह हे दोन रोग जगभर सध्या थैमान घालत आहेत. दर चार माणसांमध्ये रक्तदाब वाढलेला आपल्याला दिसतो तर दर तीन माणसांत मधुमेहाचा रोगी सापडतो. हे सीकेडीचे पहिले कारण होय.
* मूत्रपिंडाला आलेली सूज किंवा संसर्ग हे कारण होऊ शकते.
* केव्हा केव्हा सीकेडी आनुवंशिकही असू शकते-
* सीकेडी- मूत्रमार्गात अडथळा आल्यामुळे म्हणजेच मूत्र न झाल्यामुळेही होऊ शकतो – मूत्रपिंडातील खडे, वाढलेली प्रोस्टेट ग्रंथी.
* वेदनाशामक गोळ्या घेतल्याने सीकेडी होऊ शकते. तेव्हा स्वतःच्या मनाने गोळ्या घेणे बंद करणे योग्य ठरेल.
क्रॉनिक किडणी रोेगावर उपाय ः
१) योग्य आहार
२) नियमित औषधे
३) डायलिसिस
४) मूत्रपिंड रोपण
दर दहा माणसांत एक सीकेडीचा रोगी असतो. सर्व वयोगटात हा रोग आढळतो. आफ्रिकन, अमेरिकन, अमेरिकन इंडियन, बांगलादेशी, लंका, पाकिस्तान या देशातील लोकांना या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. याचे प्रमुख कारण म्हणजे या देशांमध्ये वाढलेले रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण.
वाढत्या वयाबरोबर मूत्रपिंड थकल्याने हा रोग होतो. स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. पंचाहत्तरी ओलांडलेल्या माणसांमध्ये अर्ध्यांना हा रोग असतो.
– सीकेडीमुळे खर्चाचा बोजा प्रत्येक राष्ट्रावर पडलेला आहे. आरोग्यविषयक खर्चाचा जास्त भाग या रोगावर खर्च केला जातो.
– हा खर्च अविकसनशील राष्ट्रात शक्य नसतो.
– इंग्लंडमध्ये स्तन, फुप्फुस, आतडे व कातडीच्या कँसरचा मिळून जो खर्च होतो तो सीकेडीच्या खर्चापेक्षा कमी असतो.
– ऑस्ट्रेलियात २०२०मध्ये हा खर्च १२ बिलियन असणार.
– अमेरिका ४८ बिलियन दरवर्षी खर्च करते.
बर्‍याच लोकांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे अधिकाधिक लोक यामुळे दरवर्षी मरण पावतात.
मुत्रपिंडाची काळजी घेणार?… संभाव्य धोके…
१. वाढलेला रक्तदाब व मधुमेह
२. आनुवंशिक
३. वाढलेले वजन
४. आपण धूम्रपान करता का?
५. ५० च्या वर वय.
६. आपण ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन आहात का?
ऍडव्हान्स्ड सीकेडीची लक्षणे –
— सुजलेले पाय… अशक्तपणा… कमी झालेली भूक… लघवीत रक्त… फेसाळ लघवी…
रक्त व लघवी तपासणी – यात किडनी फन्क्शन टेस्ट व सीरम क्रिएटिनीन तसेच युरीन अल्ब्युमिन बघायला पाहिजे.
हा रोग दूर ठेवण्यासाठी काय कराल…?
* स्वतःला तंदुरुस्त व सतत कामात ठेवणे.
* रक्त शर्करेची योग्य तपासणी
* रक्तदाबाची चाचणी
* स्वतःचे वजन योग्य पातळीवर ठेवणे.
* भरपूर पाणी पिणे.
* धूम्रपान करू नये.
* आपल्या मनाने गोळ्या घेऊ नयेत.
* किडनी फन्क्शन टेस्ट करून घेणे.
मुत्रपिंड निरोगी ठेवण्यास किती पाणी प्यावे?- हा प्रश्‍न नेहमीच रोगी विचारीत असतो.
पाणी पिणे कोण ठरवतो?
– लिंग (पुरुष आहे की स्त्री), व्यायाम, हवामान, गरोदरपणा, स्तनपान करत असताना, उद्योगी किंवा ऍक्टिव्ह.
सीकेडी झालेल्यांना शेवटचा उपाय म्हणजे ‘‘किडनी रोपण’’. हा विषय जगभर चर्चिला जात आहे. लाखो लोकांना मूत्रपिंड रोपणाची गरज आहे. पण मूत्रपिंड मिळत नाहीत. मूत्रपिंड रोपण करायला निरोगी मुत्रपिंडाची गरज भासते. मूत्रपिंड कुठे मिळतात!
– मूत्रपिंड सापडण्याचे ठिकाण म्हणजे दुकान नाही. जिवंत माणसाकडून ते दान केले जाते. आपल्याच रक्ताच्या नातेवाइकासाठी आपण ते योग्य वेळी, योग्य स्थळी दान करू शकतो. ते मूत्रपिंड रोग्यात रोपण करून रोगी वाचू शकतो.
– मयत माणसाचे मूत्रपिंडही रोपण होऊ शकते. त्याप्रमाणे त्या माणसाने ते दान करावे लागते.
– हजारो माणसे ऍक्सीडेंटनी मरण पावतात. जर का त्यांच्या नातेवाइकांनी सहमती दर्शवली तर एक शव दोन माणसांना वाचवू शकते.
– मेंदू नष्ट झालेले (ब्रेन डेड)चे कितीतरी रुग्ण हॉस्पिटलात कॉटवर वर्षानुवर्षे पडलेले असतात. ते वैद्यकीय दृष्ट्या मृतच असतात. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचे अवयव दान करावेत.
देहाच्या अवयवांचे दान करण्याविषयीची जागरूकता लोकांमध्ये उत्पन्न करण्याची आज गरज आहे. एका माणसाचे निरोगी शरीर कितीतरी रुग्णांना जीवन देऊ शकते-
कोणते अवयव – दोन डोळे, १ हृदय, १ लिव्हर, २ मूत्रपिंडं, १ स्वादुपिंड. कितीतरी रोगी त्याने वाचू शकतात. हे काम तुम्ही-आम्ही-सर्वजण करू शकतो. पण करणार कोण?
रक्तदानाला घाबरणारी माणसे आम्ही, आपल्या बापाला, आईला मूत्रपिंडाची गरज भासली तर पळणारी माणसे आम्ही!
लोकहो, विचार करा! कुणाचा तरी प्राण वाचवायचा आहे. आजच्या या दिवशी तरी आम्ही संकल्प करू… किडनी दान करू… शरीर दान करू!!