जशास तसे!

0
129

कॉंग्रेसमधून दहा जणांचा भाजप प्रवेश घडून येताच मंत्रिमंडळातून गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांची हकालपट्टी झाली. यामुळे पर्रीकरांचा वारसा संपल्याचे कितीही अकांडतांडव विजय सरदेसाई यांनी जरी चालवलेले असले, तरी जनतेची त्यांना सहानुभूती दिसत नाही. दहा कॉंग्रेसजनांच्या घाऊक पक्षांतराबद्दल जनता प्रचंड नाखुश असली, तरी गोवा फॉरवर्डला सरकारमधून घालवल्याचे तिला काही दुःख नाही. उलट सरकारमधील एक ब्याद गेली अशीच आज जनभावना आहे, त्यामुळे उगाच पर्रीकरांच्या ‘लेगसी’ च्या बाता गोवा फॉरवर्डने करू नयेत! खरे तर गोवा फॉरवर्डचे एकंदर अस्तित्वच आज पणाला लागलेले आहे. सरकारचा पाठिंबा काढून घेऊन जरी ते आता विरोधात बसणार असले, तरी २७ चे भरभक्कम संख्याबळ झालेल्या भाजपला आता त्याची फिकीर नसेल. गोवा फॉरवर्डच्या संगतीचा फटका अपक्ष रोहन खंवटेंना बसला आहे. खरे म्हणजे सरकारमधील ते एक अत्यंत कार्यक्षम मंत्री होते. परंतु सतत गोवा फॉरवर्डच्या गटबाजीला साथ देत आल्याने त्यांच्या प्रती भाजप नेतृत्वात नाराजी साठत गेली होती. रोहन जरी अपक्ष असले तरी गोवा फॉरवर्डच्या आंदोलनांमध्ये देखील त्यांची उपस्थिती असायची. त्याचे परिणाम आता भोगावे लागले आहेत. गोवा फॉरवर्डचा हा उदयास्त केवळ स्वार्थाच्या पायावर उभ्या राहणार्‍या राजकीय घटकांची शेरास सव्वाशेर मिळाल्यावर काय गत होऊ शकते हे दाखवतो आहे. खरे म्हणजे २०१७ ची निवडणूक या पक्षाने केवळ भाजपविरोध या मुद्द्यावर लढवलेली होती. फातोर्डा, वेळ्ळी, साळगाव व शिवोली या चार जागा त्यांनी लढवल्या व वेळ्ळी वगळता तिन्ही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. गोवा फॉरवर्डचे हे यश राष्ट्रीय पातळीवर नजरेत भरले. पण एका रात्रीत विजय सरदेसाईला मनोहर पर्रीकरांबद्दल प्रेम उफाळून आले आणि स्वतःच्या पक्ष पदाधिकार्‍यांनाही विश्वासात न घेता पर्रीकरांच्या सरकारमध्ये त्यांनी पक्षाला सामील करून टाकले. पक्ष पदाधिकार्‍यांनी शेवटी पक्षाला रामराम ठोकला. आज कॉंग्रेसच्या १० आमदारांना ‘माकड’ म्हणत असताना आपली तेव्हाची उडी कसली होती याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. सरकारमध्ये सामील होत असतानाच तिन्ही आमदारांना मंत्रिपदाची सौदेबाजीही पक्षाने केली. ‘गोंय, गोंयकार, गोंयकारपण’ ची बात करीत व किमान समान कार्यक्रमाच्या आधारे गोवा फॉरवर्डने सरकारला साथ जरूर दिली, परंतु त्याच बरोबर स्वतःचे उपद्रवमूल्य टिकवण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला. मगो प्रमाणे भाजपाला उघडपणे शिंगावर घेण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला नाही, तरी सरकारवर सतत दबाव, दडपणे आणणारे त्यांचे हे उपद्रवमूल्य कायम होते. अपक्षांना आपल्या सोबत घेऊन त्यांनी ‘व्ही – ६’ हा आपला दबावगट निर्माण केला होता. वारंवार ते दिसत होते. पर्रीकरांच्या मृत्यूनंतर देखील हा दबावगट सक्रिय होता. आता चौघांच्या हकालपट्टीनंतर उर्वरित दोन अपक्ष आमदार उघड्यावर पडले आहेत. पर्रीकरांच्या मृत्यूनंतर जेव्हा डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांना गरज होती ती सरकारवरील आपली मांड पक्की करण्याची. त्यामुळे त्यात जेव्हा गोवा फॉरवर्डचा काटा सलत राहिला, तेव्हा तो दूर सारण्याच्या संधीच्या ते व भाजपा नेतृत्व प्रतीक्षेत होते. अखेर ती संधी आली आणि हे जड झालेले ओझे मुख्यमंत्र्यांनी फेकून दिले. आता प्रश्न आहे गोवा फॉरवर्डच्या यापुढील वाटचालीचा. गेल्या निवडणुकीत या पक्षाला काही दिशा असेल तर ती होती भाजपला विरोध करीत निष्प्रभ कॉंग्रेसची मतपेढी बळकावण्याची. कॉंग्रेसच्याच मतपेढीला कुरतडून गोवा फॉरवर्डने ती ताब्यात घेण्याचा त्या निवडणुकीत प्रयत्न केला आणि त्यात ते बर्‍याच अंशी यशस्वीही झाले. परंतु जेव्हा अगदी यू टर्न घेत भाजपाच्या कनवटीला पक्ष जाऊन बसला, तेव्हा पक्षाचे मतदार आपल्याला दुरावतील या भीतीने मग विजय सरदेसाई सातत्याने गोमंतकीय अस्मितेचा मुद्दा तापवत राहिले. कधी त्यांनी जॅक सिक्वेरांना डोक्यावर घेतले, कधी जनमत कौलाचा विषय उकरून काढायचा प्रयत्न केला. युवकांच्या सशस्त्रीकरणाची भाषा केली. या सार्‍या धडपडीतून आपणच कसे गोव्याचे तारणहार आहोत हे विशेषतः ख्रिस्ती मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा आटापिटा त्यांनी केला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात, बालाकोट होण्यापूर्वी जेव्हा कॉंग्रेस पुन्हा उभारी घेण्याची शक्यता दिसत होती, तेव्हा भाजपाचा मित्रपक्ष असूनही विजय सरदेसाईंच्या तोंडची भाषा पालटली होती. आज गोवा फॉरवर्डची हकालपट्टी करताना गोंयकारपण वाचवण्यासाठीच सरकारने त्यांना हाकलले असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रमोद सावंत यांच्यासारखा तरुण मुख्यमंत्री होत असल्याने त्यांचा आपण बाहुल्यासारखा वापर करून घेऊ असे गोवा फॉरवर्डला वाटले असावे. सरकारला अस्थिर करण्याचे चित्र निर्माण करून स्वार्थ साधत राहिलेल्या गोवा फॉरवर्डला सावंतांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे!