जल्लोष काणकोणच्या पारंपरिक शिगमोत्सवाचा

0
273

– अजित पैंगीणकर
फाल्गुन महिना सुरू झाला की शिगम्याचे वेध सुरू होतात. या शिगम्याला कधी सुरुवात झाली याचा अंदाज नाही. ज्या काळात समाज एकत्रित राहायला लागला, अन्न शिजवून खायची कला त्याला अवगत झाली आणि अन्न तयार करण्याचे ज्ञान त्याने संपादन केले. समूहमनाची स्पंदने ज्यावेळी जाणवायला लागली. देव ही संकल्पनाच ज्यावेळी निर्माण झाली नव्हती त्याच काळात मानवाला मनोरंजनाची जाणीव व्हायला लागली. समाजाबरोबर राहतानाच हा आपला, हा परका हा फरक जेव्हा जाणवायला लागला त्या काळात अनेक सण, व्रत-वैकल्यांना प्रारंभ झाला. भाषा आणि लिपी म्हणजे काय याचे ज्ञान आणि अभ्यास नसलेल्या काळात मानव समूहाने जी गीते रचली, ती गीते आज लोकगीते म्हणवून घेत आहेत. नाच का आणि कशासाठी करायचा? अमुकच पदन्यास ठेवायला हवा. त्यासाठी अमुकच वेष परिधान करायला हवा, साज-शृंगार अमुकच पद्धतीचा हवा याचे ज्ञान आणि अभ्यास नसलेला तो काळ! सांतेरी आणि खुटये मायेला प्रमाण मानतातच. ‘खुटये माये गे नमन करू…’ असे आर्त स्वर गात लोकदेवतेला नमन करतानाच ही देवताच आपली रक्षणकर्ती आहे असे मानणारा हा आपला पारंपरिक समाज या विधीला प्रमाण मानून लोकवेदाला प्रारंभ झाला आणि आज पंचमवेदाचे स्थान घेऊन भल्याभल्यांनाही समजणार नाही अशा उच्च स्थानी जाऊन बसला आहे. काणकोण तालुक्यातील शिगमा हादेखील असाच एका वैशिष्ट्यपूर्ण जीवनाचे अंग होऊन बसला आहे. या तालुक्यात शिगम्याला प्रारंभ होतो नवमीला. गोव्याच्या सांंस्कृतिक इतिहासाचे मूर्त स्वरूप राजकीय साम्राज्याच्या मुळाशी जाऊन बसते. आजवर ज्या ज्या म्हणून राजवटी गोव्यात आल्या त्या सर्व राजवटींचे एकत्रित स्वरूप काणकोण तालुक्यातील प्रत्येक सण आणि उत्सवात प्रकर्षाने जाणवते. इथला शंखासुर काला, रात काला, पेरणी, जागर कदंब काळाकडे घेऊन जातो. तर तोणयामेळ तालगडी, गोफ बहामनी, आदिलशहाच्या राजवटीची झलक दाखवितात. काणकोणच्या शिगम्याला धरित्रीचा साज आहे, इथल्या शिगम्याला सागराचा गाज आहे, सृष्टिसौंदर्याचा उन्माद, नाद आहे. मातीशी एकरूप होऊन नाते सांगणारा इथला शिगमा, कष्टकरी, कामकरी लोकांच्या धर्मबिंदुचा सुवास त्याच्यात जसा आहे त्याचप्रमाणे पहाटे उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत काबाडकष्ट करतानाच आपल्या परिवाराचे, आपल्या मुलाबाळांचे सौख्य जपणार्‍या गृहिणींच्या, सुवासिनीच्या श्रमांची, त्यागाची, निष्ठेची लकेर त्याच्यात आहे. काणकोणचा शिगमा हा अस्सल आहे. त्याच्यात कोठेच कृत्रिमपणा आढळणार नाही. कोणत्याच व्यक्तीचा मानभावीपणा त्या ठिकाणी दिसणार नाही. आहे ते निर्मळ सत्य, सुंदर आणि मांगल्य. इथल्या शिगम्याला परंपरा आहेत, विधी आहेत आणि रूढी आहेत. इथल्या शिगम्यात निसर्गाची ठेवण आहे. जाणत्यांचा, वडीलधार्‍यांचा आशीर्वाद आहे. आपल्या पूर्वजांनी जरी एक मनोरंजनाचे साधन म्हणून शिगमा अंगीकारलेला असता तरी आज जे त्याला स्वरूप प्राप्त झालेले आहे त्याकडे पाहता पूर्वजांचा ठेवा जतन करण्याचे फार मोठे ऋण आजची पिढी अत्यंत जबाबदारीने पेलत असल्याचे प्रत्येक ठिकाणच्या मेळांच्या पंगडाकडे पाहिल्यास दिसते.
काणकोणच्या शिगम्याला मांड आहेत. मांड म्हणजे या मेळकरी लोकांचे आराध्य दैवत. मांडाचा प्रमुख तो मांडेली. वर्षातून एकदाच का असेना परंतु त्या मांडावर दिवा वात लावण्याचे, मांडाची सफाई करण्याचे काम मांडेलीचे. या ठिकाणच्या शिगम्याला गाणेली आहे. गाणेली म्हणजे गायक. ‘गणेशा देवा गा नमन करू’ ते ‘आयच्यान शिगमो सोपलो गा देवा, वाचून उरल्यावर फुडे गा देवा’ असे म्हणत शिगम्याची समाप्ती करणारा प्रमुख गायक. नंतर बाकीच्या खेळगड्यांनी या गाणेलीला साथ द्यायची असते. काणकोणच्या शिगम्याला घुमटेली लागतो. घुमटेली म्हणजे वादक कलाकार. घुमट, शमेळ, झांज ही पारंपरिक वाद्ये शिगम्याला लागतात. पूर्वी ही वाद्ये वाजविणार्‍या मूळ व्यक्तींकडेच शिगम्याच्या नमनाच्या दिवशी मांडेली सोपवीत असतो. या शिगम्याला तोणेली आहे. तोणी म्हणजे लाकडी टिपरी तयार करून देणारा. सर्वांत प्रथम त्या तोणेलीने तोणी किंवा टिपरी हातात घ्यायची असते आणि मांड मोडताना सर्वांत प्रथम ही तोणी देवाला अर्पण करायची असते. अशी ही प्रथा, अशी परंपरा आणि विधीने भरलेला काणकोणचा शिगमा. काणकोणचा शिगमा फाल्गुन वद्य नवमीला सुरू होतो आणि पौर्णिमेला त्याची समाप्ती होते. मांडावर नमन घालताना परिसरातील देव-देवतांबरोबरच वेताळ, ग्राम पुरुष, सांतेर, खुंटी या सर्वांची नावे एका सुरात गुंफली जातात.
काणकोण तालुक्यात प्रत्येक पंचायतीमध्ये आणि वाड्यावर स्वतंत्र असे मेळ आहेत. लोलये पंचायतीपासून सुरुवात केल्यास एकट्या लोलये पंचायतीमध्ये सात मेळ आहेत. पोळेकार, पेडेकार, आगसकार, शेळीकार, तामणेकार, कारयकार, देवाचा मेळ अशी या मेळ पथकांची नावे आहेत. प्रत्येकाने अजूनपर्यंत परंपरा जपली आहे. या ठिकाणी असलेल्या विविध समाजाचे स्वतंत्र असे अस्तित्व या मेळ पंगडातून जाणवते. पोळे येथून सुटलेले आणि अन्य सर्व मेळ तामणे बोरूसपर्यंत येतात. पैंगीणला असलेला मांडपकारांचा मेळ हा सर्व समावेशक असा मेळ आहे. या ठिकाणी प्रत्येक समाजाला स्वतंत्र मान आहे. पैंगीण येथून आलेला मेळ पर्तगाळपर्यंतच्या भागाला भेट देऊन तळपण, गालजीबागपर्यंत जात असतात. पैंगीणच्या मांडपकाराच्या मेळाचे खास वैशिष्ट्य असे की यात बारा बलुतेदारांचा जसा समावेश आहे त्याचप्रमाणे या मेळाला पैंगीणच्या श्री बेताळ, श्री परशुराम, श्री नवदुर्गा, ग्रामदेवता, श्री लक्ष्मीनारायण, पर्तगाळचा श्री रामदेव, मारुती, शांतादुर्गा यांची साथ आहे. शिवाय वेळीप समाज, तळपण येथील पागी समाज, मुठाळ, सादोळशे येथील मेळ हे स्वतंत्र असे मेळ पंगड आहेत. या भागातील वीरांचा किंवा देवाचा मेळ हा प्रमुख मेळ असून पैंगीण परिसरात ज्या ज्या ठिकाणी मांडपकारांचा मेळ जातो त्या प्रत्येक ठिकाणी पहिला मान हा वीरांच्या मेळाला असतो. वीरांचा मेळ अंगणात आल्याशिवाय अन्य कोणत्याही मेळाच्या पंगडाला अंगणात प्रवेश दिला जात नाही. इतकी या ठिकाणची सासाय आहे. काणकोण नगरपालिका क्षेत्रात कोमरपंत समाजाचा मुख्य असा मेळ आहे. या मेळात कळसाचा आणि बुधवंताचा असे दोन मेळ आहेत. बुधवंताचा मेळ देवाबाग येथे नमन घालून संचाराला बाहेर पडतो तर कळसाचा मेळ पाटणे येथील देवगी पुरुष मंदिराजवळ नमन घालून वाड्यावर खेळायला बाहेर पडतो. दोन्ही मेळ स्वतंत्र आणि एकमेकांशी त्यांची गाठ पडत नाही. त्याचबरोबर पालिका क्षेत्रातील प्रत्येक कोमरपंत समाजाच्या घरातील अंंगणात हा मेळ जातो. त्या क्षेत्रातील प्रत्येक कोमरपंत समाजाच्या अंगणात पाय लावून तळी आणि आरत घेऊनच मेळकरी जातात. प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था त्याठिकाणी केली जाते. मात्र ज्या व्यक्तीने देवाचा नारळ हातात घेतलेला आहे ती व्यक्ती शाकाहारी असते. शिगमा संपेपर्यंत पायात चप्पल घालत नाही. अत्यंत आकर्षक आणि तेजस्वी असा नृत्यप्रकार कोमरपंत समाजाकडून सादर केला जातो. आणि विशेष म्हणजे आजची युवापिढीदेखील तेवढ्याच जबाबदारीने शिगम्यात सहभागी होताना दिसत आहे. त्या खालोखाल नगर्से, भगतवाडा येथील देसाईसमाज, पाळोळे येथील नाईक समाज, पाटणे, किंदळे, पणसुले येथील देसाई समाज, राजबाग, पाळोळे येथील पागी समाजाचे स्वतंत्र असे मेळ आहेत. आजचा युवक वर्गदेखील पारंपरिक पद्धतीने या वार्षिक मेळात सहभागी होतात. एक प्रकारचा उल्हास आणि जोष त्यांच्या मेळातून या ठिकाणी पहायला मिळतो. पागी समाजाचे मेळ राजबाग, तारीर, मणगण, कोळंब या भागातील पागी समाजाच्या घराच्या अंगणातच खेळतात. या सर्व मेळांना मांड आहेत आणि या सर्वांनी अजूनही आपली परंपरा सांभाळली आहे. माणूस कितीही शिकला आणि उच्चपदी पोचला तरी चप्पल घालून अंगणात जाणार नाही आणि उघड्या डोक्याने सुवासिनीने अत्यंत आदरपूर्वक दिलेली आरत स्वीकारणार नाही. वर्षातून एकदाच अंगणात येणार्‍या मेळाच्या स्वागतासाठी अत्यंत आतुरतेने घरातील सर्व मंडळी वाट पाहात असतात. खेळून झाल्यानंतर आरत घेणार्‍या गड्याचे पाय पाण्याने धुणे, कपाळाला कुंकुमतिलक लावून पंचारती हातात देण्याची शिकवण ही परंपरेनेच आलेली आहे. याचे मूर्तिमंत दृश्य याठिकाणी पहायला मिळते. मग तो मेळ क्षत्रिय मराठा समाजाचा असो. कोमरपंत समाजाचा किंवा पागी आणि नाईक समाजाचा असो. वर्षातून एकदा आपल्या अंगणाचा पदस्पर्श करणार्‍या मेळातील खेळातील गड्यांना जेवण द्यायची रीत याठिकाणी आहे. आरत झाल्याशिवाय कोणीही पंगतीचा लाभ घेणार नाहीत. या भागात शिगमा म्हणजे पर्वणी. ‘खा, प्या, मजा करा’ हा संदेश देतानाच पुढच्या वर्षीदेखील असेच या आणि शिगम्याची मजा लुटा असाच संदेश याठिकाणी दिला जातो. या शिगम्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न करून दिलेल्या मुलीदेखील आपल्या मूळ घरात या शिमग्याच्या दिवसात येत असतात. कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले ग्रामस्थ शिमग्याला आपल्या घराला पाय लावावा, घरातील गृहिणींनी केलेल्या सुग्रास अन्नाचा स्वाद घ्यावा एवढाच प्रामाणिक हेतू याठिकाणी असतो. येथे श्रीमंतीचा डौल दाखविला जात नाही किंवा कोणाच्या घरी किती लोक आले आणि जेवले याचा हिशेब ठेवला जात नाही. नगरपालिका क्षेत्रातील विशेषतः क्षत्रिय मराठा समाजातील काही घरी गणेश चतुर्थी साजरी केली जात नाही. मात्र शिगमा हाच या लोकांचा प्रमुख उत्सव आहे. शिगम्याला आपल्या घरी आर्जवाने बोलाविणारे जसे आहेत त्याचप्रमाणे काहींच्या घरात जेवणाचा आस्वाद घ्यायला वेळ काढून जाणारी मंडळी याठिकाणी पहायला मिळतात. याउलट परिस्थिती पैंगीण आणि लोलये येथील शिगम्याची आहे. नवमी ते पुनवेपर्यंत पूर्णपणे शाकाहारी जेवण, पायात वाहाणा नाहीत, हळदीचा नारळ घेतलेली व्यक्ती निराहार अशी अवस्था. बर्‍याच ठिकाणी जेवणाची सोय स्थानिक लोकांकडून केली जाते. पूर्वापार हे सर्व चालत आलेले आहे. काणकोणच्या शिगम्याला विधीचा संकेत आहे. अमुक ठिकाणी पानाचा विडा ठेवणे, अमुकच ठिकाणी थांबावे, न बोलता जावे, वाद्याचा आवाजदेखील न करता जावे, नमनाला घरातून बाहेर पडलेल्या खेळगड्याने आपल्या स्वतःच्या घरी न येणे आणि घरात अन्न न घेणे, अमुकच एका देवतेचे दर्शन न घेणे असे संकेत पाळले जातात.
शिगम्याचा एक भाग म्हणून गडे पाडले जातात. गडे पाडणे म्हणजे अंगात अवसर येणे. हे गडे काही ठिकाणी केवळ मांडावर नमन आणि पुनवेच्या दिवशी तर काही ठिकाणी कोणाच्या अंगणात पाडले जातात. अवसर आलेल्या गड्यांना खूपच संरक्षण दिले जाते. मांडाच्या किंवा ठरावीक अंगणाच्या सीमेबाहेर त्यांना जाऊ दिले जात नाही. चुकून मांडाच्या बाहेर गडे गेले तर अपशकून मानला जातो. ही प्रथा फक्त पैंगीण आणि लोलये पंचायतीमधील मेळातच आहे. पालिका क्षेत्रातील मेळात गडे पडण्याची पद्धत नाही.
काणकोण तालुक्यात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा असलेला मेळ म्हणजे वेळीप समाजाचे मेळ. काणकोणच्या गावडोंगरी, खोतीगाव आणि खोला येथील वेळीप समाजाचे एकेका वाड्यावर चार ते पाच मेळ आहेत. डोक्याला भेंडाच्या फुलांचे मुंडास, धोतर, सदरा किंवा शर्ट, गळ्यात गळाभर फुलांच्या माळा, हातात तोणी असा पेहराव करून वेळीप समाजाचे गडे नाचायला लागतात तेव्हा देहभान विसरून ते नाचतात. शिगम्याची चाहूल लागल्याबरोबर वेळीप समाज उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या दांड्यावर जातात. त्या ठिकाणी त्यांची स्वतंत्र घरवई असते. देवकार्ये करण्यासाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था त्याठिकाणी केलेली आहे. अंगण सारवणे, देवाची पूजा करणे, शिगम्याच्या काही दिवस अगोदर खेळण्याचा सराव करण्याचे काम तेथे चालू असते. नमन ते पुनवेनंतरचे काही दिवस मिळून कमीत कमी पंधरा दिवस या भागातील पुरुष आणि महिला दांड्यावरच राहतात. नमनानंतर आपापल्या वाड्यावर खेळतात. कोणतेही वाद्य न घेता खेळला जाणारा तोणयांचा खेळ या समाजाचा आकर्षक, चित्तथरारक आणि देखणा असा खेळ प्रकार आहे. खरे म्हणजे या खेळाला एव्हाना राजमान्यता मिळतानाच नव्या पिढीने तो आत्मसात करण्याच्या दृष्टीने सरकार दरबारी प्रयत्न व्हायला हवे होते. परंतु आजवर त्यांच्या कलेचा लाभ इतरांनीच घेतला आणि सरकार दरबारी मानसन्मान आणि पुरस्कार मिळवून मोकळेही झाले. याची जाणीव आता कोठे या समाजातील शिक्षित युवकांना व्हायला लागली आहे. आज हा समाज शिकून पुढे येत असतानाच त्यांना स्वत्वाची जाणीव व्हायला लागली आहे. त्यामुळे या समाजातील युवकांसमोर फार मोठे आव्हान आहे. ही पूर्वजांची कला टिकवून ठेवण्याबरोबरच या कलेला राजमान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनाच आता पुढाकार घ्यायचा आहे. काणकोणचे मांड टिकायला हवेत. येथील पारंपरिक कलेचे जतन आणि संवर्धन व्हायला हवे. त्यासाठी इतर लोक येतील, हा समज आता बाजूला ठेवून त्या त्या समाजातील शिक्षित युवकांनी आता हा वसा पुढे नेण्यासाठी सिमोल्लंघन करण्याची तयारी ठेवायला हवी. काणकोण तालुक्यात धनगर समाजाच्या महिलादेखील शिगमोत्सवात वाड्यावाड्यावर खेळायला जातात. त्यांच्या नृत्याला पारंपरिकता जशी आहे त्याचप्रमाणे कलात्मकता दिसून येते. या शिगमोत्सवाच्या काळातच या ठिकाणच्या जत्रोत्सवाना आणि दिवजांच्या उत्सवाला प्रारंभ होत असतो. काणकोण तालुक्यातील खोतीगाव, गावडोंगरी आणि श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवालय, पैंगीण येथील परशुराम देवालय, नमस, कारय, मोखर्ड, कुळटी या ठिकाणच्या स्थानिक देवालयाजवळ दिवजांचा उत्सव खास महिलांचा उत्सव म्हणून शिमगोत्सवात साजरा केला जातो. असा आहे काणकोणचा शिगमा- उल्हास, आनंद, मजा, पारंपरिकता, जल्लोष यांनी भरलेला. कृत्रिमपणाचा लवलेशही नसलेला. पूर्वजांची पूर्वपीठिका आणि वारशाने जतन करणारा. असा आहे काणकोणचा शिगमा- संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारा.