जर्मनीचे आव्हान कायम

0
110

शनिवारी रात्री खेळल्या विश्‍वचषक स्पर्धेतील थरारक सामन्यात स्वीडनवर थरारक विजय मिळवत जर्मनीने आपले आव्हान जिवंत ठेवले. भरपाई वेळेमध्ये शेवटच्या ३० सेकंदात गोल करणारा टोनी क्रुस जर्मनीच्या विजयाचा नायक ठरला.
पहिल्या सामन्यात मेक्सिकोकडून धक्कादायक पराभव सहन करावा लागणार्‍या जर्मनीला स्वीडनविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक होता. जर्मनीने स्वीडनविरुद्ध अत्यंत आक्रमक सुरुवात केली. पहिल्या १५ मिनिटात जर्मनीने स्वीडनच्या गोलक्षेत्रात तुफान हल्ले चढवले, परंतु स्वीडनचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. जर्मनीच्या आक्रमणाची धार थोडी बोथट झाल्यानंतर स्वीडनने संधीचा फायदा उठवत ओला टोइव्होनेने याने ३२व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि जगज्जेत्या जर्मनीला धक्का दिला. मध्यंतरापर्यंत स्वीडनने ही आघाडी कायम राखली.

मध्यंतरानंतर जर्मनीच्या संघाने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला. चेंडूवर अधिकवेळ ताबा राखण्याचे तंत्र अवलंबतानाच पहिल्या सत्रातील चुका त्यांनी टाळण्यावर भर दिला. याचे चांगले फळ त्यांना मिळाले. मार्को रियूसने ४८व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर जर्मनीला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या पण त्यात गोल करण्यात ते अपयशी ठरले. सामना संपण्यास १० मिनिटाचा अवधी असताना जर्मनीचा बचावपटू बोएटेंगला धसमुसळ्या खेळाबद्दल रेफ्रींनी लाल कार्ड दाखविले. त्यामुळे जर्मनीला शेवटी दहा खेळाडूंसह खेळावे लागले. खेळाडूंची संख्या कमी असली तरी विश्‍वविजेत्यांनी धीर सोडला नाही. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर पाच मिनिटांचा इंज्युरी टाईम रेफ्रींनी दिला. यातील चार मिनिटांचा खेळ झाल्यामुळे जर्मनीचे पाठिराखे रडकुंडीला आले होते. पण खेळ अजून शिल्लक होता.

शेवटच्या मिनिटाला जर्मनीला मोक्याच्या ठिकाणावरून फ्री किक मिळाली. या शेवटच्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत क्रुसने डोळ्यांचे पारणे फेडणार गोल केला आणि जर्मन खेळाडू, प्रशिक्षक, चाहत्यांनी मैदानात एकच जल्लोष केला. या विजयामुळे जर्मनीचे विश्वचषकातील आव्हान कायम राहिले असून त्यांचा शेवटचा सामना दुबळ्या दक्षिण कोरियाशी होणार आहे. विश्‍वचषकातील सामन्यातील पिछाडीवरून विजयी होण्याची १९७४ नंतरची जर्मनीची ही पहिलीच वेळ ठरली. त्यावेळीसुद्धा स्वीडन हाच प्रतिस्पर्धी होता. मध्यंतरापर्यंत ०-१ अशा पिछाडीनंतर जर्मनीने तो सामना ४-२ असा जिंकला होता.