जरा जरब बसवा!

0
98

वास्कोतील सासू – सुनेची हत्या व जबरी जोरीच्या घटनेने संपूर्ण गोवा हादरला आहे. अशा प्रकारची अत्यंत निर्दय गुन्हेगारी अत्यंत निर्ढावलेल्या गुन्हेगारांकडूनच घडू शकते. या प्रकरणी तपास सुरू आहे आणि लवकरच गुन्हेगारांचा छडा लागेल अशी आशा आहे, परंतु अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय करता येईल याचा अधिक गांभीर्याने विचार होण्याची गरज भासू लागली आहे, कारण सातत्याने अशा गुन्हेगारी घटना घडत आहेत. अनेक परप्रांतीय गुन्हेगारांच्या टोळ्या विशिष्ट हंगामात गोव्यात येतात, लुटालूट करतात आणि पळून जातात. एखाद्याने प्रतिकार केला तर जीव घ्यायलाही हे कमी करीत नाहीत. अशा पक्क्या, निर्ढावलेल्या गुन्हेगारांचा सुळसुळाट गोव्यासारख्या शांत, निवांत प्रदेशात वाढण्यास गोमंतकीयांचा भाबडेपणाही तेवढाच कारणीभूत आहे. प्रस्तुत घटनेत गॅस दुरूस्त करण्याच्या बहाण्याने या चोरट्यांनी सदनिकेत प्रवेश मिळविला होता असे सांगण्यात येते. गॅस दुरूस्त करायचा आहे, सर्वेक्षण करायचे आहे, विकायला काही आणले आहे अशा नाना बहाण्यांनी, नाही तर रद्दीवाला, कुरियरवाला वगैरे बनून किंवा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, पाणी मागण्याच्या बहाण्याने अशा टोळ्यांतील महाभाग पाहणी करतात, सावजे शोधतात आणि संधी मिळताच डल्ला मारतात. प्रत्येक नागरिकाने थोडा चौकसपणा दाखवला, थोडी खबरदारी घेतली, तरी अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा छडा लागू शकतो. पण समोरच्यावर सहज विश्वास ठेवण्याचा भाबडेपणाच गोमंतकीयांना महाग पडू लागला आहे. आपल्या गोव्यात येणे, गुन्हा करणे आणि पळून जाणे फार सोपे बनलेले आहे. गुन्हेेगारीचे वाढते प्रमाण आणि तिचे स्वरूप पाहाता पोलिसी खबरे आणि गुप्तचर हे अस्तित्वात आहेत तरी का हा प्रश्न अलीकडच्या काळात पडू लागला आहे. असे गुन्हे रोखण्यात आपली पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे.
कोकण रेल्वेतून येणारे गुन्हेगार अलीकडे स्वतःच्या गाडीनेही गोव्यात केवळ गुन्हे करण्यासाठी येऊ लागलेले आहेत. त्यांचे हस्तक गोव्याच्या रस्त्यांची, परिसराची माहिती करून घेण्यासाठी येथेच येऊन स्थायिकही झालेले असतात. त्यांना त्यांची कोणतीही पार्श्वभूमी न तापसात गोमंतकीय घरमालकच थारा देत असतात. भाडे मिळते आहे ना, मग आपली जबाबदारी संपली असे मानून कायद्याने आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तताही केली जात नाही. आपण एवढ्या बेजबाबदारपणे थारा देत असलेले भस्मासुर शेवटी आपल्यावरच उलटतील हे त्यांच्या गावीही नसते. राजकारण्यांनी स्वतःच्या सोयीसाठी या उपर्‍यांना रेशनकार्डे, मतदारकार्डेही देऊन नागरिक बनवून टाकले आहे. दुुर्दैवाने गोव्यातील बहुतेक पारंपरिक व्यवसाय आता परप्रांतियांच्या हाती गेले आहेत, बाजारपेठाही त्यांच्या हाती गेल्या आहेत. राजधानी पणजीसारख्या ठिकाणी तर गोमंतकीयांची दुकाने हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच राहिली आहेत. सर्वत्र हिंदीतून संवाद साधावा लागतो, कारण परप्रांतीयांच्या हाती बाजारपेठेचा ताबा गेला आहे. गोमंतकीय मात्र अस्मितेच्या फुकाच्या बाता मारत आणि ‘निज गोंयकार’ म्हणत स्वस्थ निजलेले आहेत. या परिस्थितीत परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे गोव्याकडे येतच आहेत. बिहारींना गोव्यात येता यावे यासाठी थेट रेलसेवा सुरू झाली. त्यातून यूपी, बिहारची मंडळी बाडबिस्तर्‍यासह गोव्याकडे निघाली. नुकतेच गुवाहाटी – गोवा थेट विमान सुरू झाले आहे. आता आसाममधून बांगलादेशी घुसखोरांचे लोंढे गोव्याकडे येऊ लागतील. कुटुंबवत्सल लोकांच्या येण्याला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण हे जे एकटा जीव सदाशिव गोव्यात येतात, ते येथे काय करतात त्यावर लक्ष ठेवणार कोण? बलात्काराच्या घटना, घरफोडीच्या घटना वाढतच चालल्या आहेत, परंतु या प्रश्नाच्या मुळाशी हात घालण्याची कोणत्याही राजकारण्याची इच्छा नाही आणि धमक तर नाहीच नाही. सातत्याने घडणार्‍या एकाहून एक भीषण गुन्ह्यांनी गोव्याचे समाजजीवन हादरवून टाकलेले आहे. आता तरी या प्रश्नाच्या मुळाशी जावे लागेल. रस्तोरस्ती दिसणारे भिकारी, किडूकमिडूक वस्तू विकायला येणारे फेरीवाले, भंगारवाले, रद्दीवाले, नंदीबैलवाले आणि तत्सम नाना बहाणे करून रस्तोरस्ती भटकणार्‍यांना पायबंद घालण्याचे किमान पाऊल तरी सरकारने उचलावे. परप्रांतीय बांधकाम मजुरांना ओळखपत्रे सक्तीची करावीत. भाडेकरूची माहिती न देणार्‍या घरमालकांना कायद्याचा इंगा दाखवावा. निर्घृण गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी थोडे कडक व्हावेच लागेल!