जम्मू-काश्मीर आणि लडाख आजपासून केंद्रशासित प्रदेश

0
135

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आज गुरूवार दि. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येणार आहेत. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी हे नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येत आहेत.

ऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार आहे. या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आहे.

सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुरमू आणि आर. के. माथुर यांची अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे राष्ट्रपती भवनातून जाहीर करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असणार आहे. त्यामुळे दिल्लीप्रमाणेच विधानसभा, नायब राज्यपाल यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मिरचा कारभार चालणार आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा असणार नाही. या प्रदेशाचा कारभार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नायब राज्यपालांच्या माध्यमातून पाहिला जाईल.