जम्मू-काश्मीरात ईद शांततेत

0
118

काही किरकोळ घटना सोडल्यास जम्मू-काश्मीरमध्ये काल ईद उत्सव शांततेत पार पडला अशी माहिती या नव्या संघ प्रदेशाचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांचे प्रधान सचिव रोहित कान्सल यांनी दिली. तथापि बहुतेक प्रदेशात संचारबंदीची स्थिती असल्याने ईद सणाचा उत्साह दिसून येत नव्हता.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार विविध माशिदींमध्ये प्रार्थनांसाठी भाविकांनी चांगल्या संख्येने उपस्थिती लावली होती. ईद निमित्त प्रार्थना सभांमध्ये उपस्थित राहण्यासाठी लोकांना मुभा दिली जाईल असे अधिकार्‍यांनी रविवारी सूचित केले होते.
राज्यपालांचे प्रधान सचिव कान्सल यांनी सांगितले की काल तीन ठिकाणी निषेधाच्या घटना घडल्या. मात्र कोणीही त्या दरम्यान जखमी झालेले नाही. ईद सणासाठी विभागीय आणि जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था केली होती असे ते म्हणाले. कुर्बानी विधीसाठी बाजारपेठांमध्ये योग्य प्रमाणात मेंढ्यांचा पुरवठा प्रदेशाच्या विविध भागांमध्ये करण्यात आला होता असे त्यांनी सांगितले.

अनंत नाग, बारामुल्ला, बुदगाम, बंदिपोर येथील मशिदींमध्ये कोणत्याही अनुचित प्रकारांविना प्रार्थना सभा पार पडल्या. बारामुल्लातील जमिया मशिदीत सुमारे दहा हजार भाविकांनी प्रार्थनांमध्ये सहभाग घेतला असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवकत्याने ट्विटरवरून म्हटले आहे. जम्मूतील इदगाहमध्ये ४५०० लोकांची उपस्थिती होती असे सांगण्यात आले. जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी सांगितले की तेथील प्रार्थनानंतर अनेक हिंदूंनी मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

संवेदनशील जिल्ह्यांतही
प्रार्थना शांततेत
संवेदनशील मानल्या जाणार्‍या किश्तवार, दोडा, रामबन, पूंछ व राजौरी या जिल्ह्यांमध्येही ईदच्या प्रार्थना शांततेत पार पडल्याचे सांगण्यात आले.

सर्वसामान्य जनजीवन ठप्प
जम्मू-काश्मीरात सर्वत्र शांततेचे वातावरण असले व ईद उत्सवही शांततेत पार पडला असला तरी प्रदेशातील सर्वसामान्य जनजीवन ठप्प असल्याचे दिसत आहे. प्रचंड प्रमाणात सर्वत्र सुरक्षा दलांचा बंदोबस्त व प्रामुख्याने संपर्क माध्यमे बंद झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता दिसून आल्याचे वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे.
३७० कलमाचे काहीही होवो, आम्हाला आमच्या निकटवर्तियांशी संपर्क साधणे शक्य होत नसल्याने मोठी गैरसोय व प्रियजनांविषयी चिंता वाटत असल्याचे नागरिकांनी वृत्तसंस्थांशी बोलून दाखवले.

राहुलना विमान पाठविणार
राज्यपाल मलिक यांची राहुल गांधींवर टीका

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीरमधील स्थितीवर केलेल्या वक्तव्यांबद्दल जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घणाघाती टीका केली आहे. जम्मू-काश्मीरात हिंसाचार झाल्याचे वक्तव्य करणार्‍या राहुल गांधी यांच्यासाठी आपण विमान पाठवतो. त्यांनी (राहुल) या विमानाने येथे येऊन प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करावी आणि नंतर बोलावे असे मलिक यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे एक नेते मूर्खासारखे संसदेत बोलत होते याची राहुल गांधी यांना लाज वाटायला हवी असे उद्गारही मलिक यांनी एका प्रश्‍नावर बोलताना काढले. त्यामुळे जम्मू-काश्मीरात येऊन पाहणी करण्यासाठी आपण राहुल गांधींना निमंत्रित करतो. त्यांना त्यासाठी विमान पाठवतो असे ते म्हणाले.