जमीन रूपांतरण न झाल्याने चर्च संस्थेकडून दबावतंत्र

0
163

>> भाजपचा पत्रकार परिषदेत आरोप

चर्च संस्थेने स्वत:च ५.५० लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला होता. मात्र, त्यांतील केवळ १.३० लाख चौ. मीटर जमिनीचे रूपांतरण झाले. शेष जमिनीचे रूपांतरण न केल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी चर्च संस्थेने ‘गोंयचो आवाज’ या संघटनेला पुढे केले नसावे ना असा संशय भाजपाचे प्रवक्ते शर्मद पै रायतुरकर यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

गोंयचो आवाज संघटनेने भाजपा आमदारांवर जमिनीचे रूपांतरण केल्याचे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा त्यांनी केला. कोणतेच कागदोपत्री पुरावे नसताना आरोप करून आमदारांची प्रतीमा मलिन करण्याचे प्रयत्न गोंयचो आवाज संघटनेने केले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपा निषेध करीत असून त्यांच्यावर अब्रुनुकसानाची आरोप दाखल करणार असे पै रायतुरकर यांनी सांगितले.
संघटनेतील काही नेते भाजपावर बेकायदेशीर जमीन रूपांतर करण्याचे आरोप करून अल्प संख्याकांना भाजपापासून दूर नेण्याचा व समाजात धर्म व जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी चर्च संस्थेने कोठे जमीन रूपांतर केली त्याची माहिती दिली.