जमीन रूपांतरण चौकशीसाठी समिती स्थापन

0
202

>> मंत्री विजय सरदेसाईंची घोषणा

>> महिनाभरात समिती देणार अहवाल

राज्यातील राजकीय नेते व चर्च संस्थेकडून बेकायदा जमीन रूपांतरे झाल्याचे जे आरोप मडगाव येथील लोहिया मैदानावर झालेल्या सभेतून करण्यात आले होते त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एका महिन्याच्या आत म्हणजेच १ जून रोजी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला असल्याचे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी काल सांगितले.

या समितीवरील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. वेनांसियो फर्नांडिस (विभाग प्रमुख, आर्किटेक्चरल इंजिनियरिंग, सरकारी तंत्रनिकेतन, पणजी – सदस्य, आय्‌टीपीआय्), एरनेस्टो मोनिझ (सदस्य आय्‌ईआय्), मंगेश प्रभुगांवकर (चेअरमन, इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट्‌स, सदस्य, आय्‌आय्‌ए), परेश गायतोंडे (मेंबर ऑफ इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियर्स), राजेश जे. नाईक (मुख्य नगर नियोजक – नियोजन) यांची निमंत्रक म्हणून ह्या समितीवर निवड करण्यात आली आहे.

जे-जे कोण नेते अथवा संस्था ह्या जमीन घोटाळ्यात असतील त्या सर्वांची अहवाल हाती आल्यानंतर चौकशी करण्यात येणार असून आपण स्वत:ही चौकशीस सामोरा जाण्यास तयार असल्याचे विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ‘गोंयचो आवाज’ या संघटनेने दि. २७ रोजी मडगावातील लोहिया मैदानावर घेतलेल्या सभेत नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्यासह १४ राजकारण्यांनी बेकायदा जमिनीचे रूपांतर केल्याचा आरोप केला होता.

वरील सभेत सत्ताधारी मंत्री, विरोधी पक्षाच्या आमदारांनी २०२१च्या प्रादेशिक आराखड्याच्या आधारे जमिनीच्या रूपांतराचा लाभ उठवल्याचा जाहीर आरोप झाला होता. त्यावेळी बेकायदा जमीन रूपांतरण केलेल्या राजकारण्यांची नावे सभेत जाहीर करण्यात आली होती. त्यात मंत्री विजय सरदेसाई यांच्यासह वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, कॉंग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो, दिगंबर कामत, विल्फ्रेड डिसा, फ्रान्सिस सिल्वेरा, कॉंग्रेस नेते जितेंद्र देशप्रभू, भाजपाच्या आमदार एलिना साल्ढाणा, नीलेश काब्राल यांचा समावेश होता.