जमिनीच्या वादावरून कुर्टीत भाडेकरूवर जीवघेणा हल्ला

0
146

>> कोल्हापूरच्या पाच जणांना अटक

दीपनगर कुर्टी येथे भाड्याच्या खोलीत राहणार्‍या नितीन मालेशी घोरले (४२, कोंडीगिरी-कोल्हापूर) यांच्यावर ब्लेडच्या साहाय्याने हल्ला चढवून पळून गेलेल्या ५ मल्लांना (कुस्तीपटूंना) फोंडा पोलिसांनी कुळे पोलिसांच्या साहाय्याने मोले चेकनाक्यावर वाहनासह पकडले. संतोष श्रीकांत लवाटे (२६, इचलकरंजी-कोल्हापूर), स्वप्निल सुरेश कोरावी (२५, शिरडवाड-कोल्हापूर), बाळू तुकाराम कोली (४८, तारदाळ-कोल्हापूर), विजय दिलीप घनावर (२५, इस्लामपूर-सांगली) व विक्रम आंबेराव पाटील (२३, सांगली) या ५ मल्लांचा अटक केलेल्यांत समावेश असून गुन्ह्यासाठी वापरलेली कार जप्त केली आहे. कोल्हापूर येथील जमिनीच्या वादातून हल्ला केल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली आहे.

दीपनगर कुर्टी येथे नितीन घोरले यांच्या घराचा दरवाजा काल सकाळी ७.३० वा. ठोठावल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला असता हल्लेखोरांनी त्यांच्याशी वाद घातला. त्या आवाजाने खोलीत झोपलेली त्यांची पत्नी व ३ मुले जागे झाल्याचे कळताच हल्लेखोरांनी खोलीत घुसून ब्लेडच्या साहाय्याने नितीन घोरलेंवर हल्ला केला. यावेळी पत्नी व मुलांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. परिसरातील लोक जमा होत असल्याचे कळताच हल्लेखोरांनी अल्टो कार घेऊन तेथून पळ काढला. यावेळी स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक हरीश मडकईकर यांना स्थानिकांनी वाहनाचा क्रमांक देताच सर्व चेकनाक्यावर सतर्कतेची सूचना देण्यात आली. फोंडा पोलीस स्थानकाचे एक पथक मोलेच्या दिशेने गेले असता मोले चेक नाक्यावर पोलिसांनी एमएच १० सीएक्स ५९९९ ही अल्टो कार रोखून ठेवल्याचे दिसून आले. त्यावेळी कारमधील सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेऊन फोंडा पोलीस स्थानकात आणले.
उपअधीक्षक गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन घोरले यांनी ५ वर्षांपूवी कोल्हापूर येथील ५०० चौरस मीटर जमीन एका व्यक्तीला विकली होती. ती जमीन पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून नितीन घोरले करीत होते. मात्र त्यांचेच मित्र संतोष लवाटे हे ही जमीन खरेेदी करण्यास इच्छुक होते. त्यातूनच हा हल्ला करण्यात आला. जखमींवर उपजिल्हा इस्पितळात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिरावत आहे.