जमशेदपूरमधील सामन्यात एटीकेच्या कॉपेलची कसोटी

0
135

जमशेदपूर
इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी एटीकेची येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. गेल्या मोसमात स्टीव कॉपेल यांनी जमशेदपूरला मार्गदर्शन केले होते. आता ते एटीकेकडे वळले आहेत. त्यांची या लढतीत कसोटी लागेल. दुसरीकडे खाते उघडल्यामुळे ताजेतवाना झालेल्या एटीकेसमोर जमशेदपूरला घरच्या मैदानावर प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.
गेल्या मोसमात कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरचे बाद फेरीतील स्थान थोडक्यात हुकले, पण घरच्या मैदानावर त्यांना नऊ पैकी तीनच सामने जिंकता आले होते. जमशेदपूरची सूत्रे यंदा सीझार फर्नांडो यांच्याकडे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दोन सामन्यांत संघाने प्रभावी खेळ केला आहे, पण हे दोन्ही सामने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर (अवे) झाले. जमशेदूपरने आधी मुंबई सिटी एफसीला २-० असे हरविले. त्यानंतर संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीला २-२ असे बरोबरीत रोखले. जमशेदपूरने करारबद्ध केलेले नवे खेळाडू आतापर्यंत चमकले आहेत. मारीओ आर्क्वेस हा नवा खेळाडू मोसमाचे वैशिष्ट्‌य ठरण्याची अपेक्षा आताच निर्माण झाली आहे, तर मेमो याच्यासारख्या परिचीत खेळाडूने मध्य क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे. सर्जिओ सिदोंचा आणि पाब्लो मोर्गाडो यांनीही मैदानावर ठसा उमटविला आहे.
मुख्य म्हणजे यंदा सर्वाधिक गोल केलेल्या खेळाडूंचा मान जमशेदपूरकडे आहे. त्यांच्या चार जणांनी गोल केले आहेत. सर्वाधिक चार जणांनी पदार्पण करण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. दिल्लीवरील विजयामुळे त्यांच्या आघाडी फळीचा आत्मविश्वास मात्र उंचावला आहे. बलवंत सिंग आणि अल मैमौनी नौसैर यांनी मागील सामन्यात गोल केले. मॅन्यूएल लँझरॉत याला सर्वोत्तम फॉर्म गवसण्याची चिन्हे आहेत. चाली रचण्यात कालू उचे यानेही योगदान दिले आहे.