जप्त दारूच्या प्रकरणांची खात्याकडून सुनावणी सुरू

0
123

>> एकूण ६० ते ७० प्रकरण

 

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात जी लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली. त्याबाबत अबकारी खात्यात नोंद ६० ते ७० प्रकरणांची सुनावणी चालू झाली असल्याचे अबकारी खात्याचे आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी काल सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली होती. मतदारांना देण्यासाठी ही दारू आणल्याच्या संशयावरून ती जप्त करण्यात आली होती. ज्या कुणाची ही दारू होती त्याविषयी सुनावणी आता अबकारी खात्याच्या कार्यालयात सुरू आहे. सध्या ६० ते ७० जणांची सुनावणी चालू आहे. जर ह्या लोकांना आपल्या मालाची बिले सादर करता आली व हा कायदेशीर माल कुठे पाठवण्यात आला होता हे अबकारी खात्याला सांगता आले तर त्यांचा जप्त केलेला माल त्यांच्या हवाली करण्यात येणार असल्याचे डिसोझा म्हणाले.
मात्र, ज्या लोकांकडे मालाची बिले नाही व दारू नेमकी कुठे पाठवण्यात येत होती हे त्यांना सांगता आले नाही तर त्यांचा जप्त केलेला माल त्यांना परत न करता त्या मालाचा लिलाव करण्यात येणार असल्याचे डिसोझा यांनी स्पष्ट केले. पुढील दोन तीन महिने ही सुनावणी प्रक्रिया चालू राहणार असल्याचे डिसोझा यांनी स्पष्ट
केले.