जपा आरोग्य लहानग्यांचे!

0
724

– सौ. मोहिनी सप्रे

 

* मूल जन्माला आले की त्याला शुद्ध सोने मधात उगाळून चाटवावे.
* लहान बाळाला शुद्ध खोबरेल तेलाने हलक्या हाताने नियमित मसाज करावा.
* तान्ह्या बालकाला कोणत्याही साबणाऐवजी दुधात बेसन घालून लावावे.
* रोज आंघोळीनंतर किमान २ महिने तरी धूप-ओवा घालून धुरी द्यावी.
* पहिले सहा महिने ते एक वर्षापर्यंत मातेचे दूध द्यावे. दात यायला लागले की पूरक आहार द्यावा.
* बालकाला सहा ते आठ महिन्यांपर्यंत घुटी उगाळून द्यावी. ही दुधातून द्यावी. घुटीतील द्रव्यातून सोन्याचे एक वेढे उगाळून द्यावे.
* बालकाला ओवा, बडी शोप, वावडिंग टाकून उकळलेले पाणी गार करून द्यावे.
* मुलांना सर्दी होऊ नये म्हणून वेखंडाचे चूर्ण डोक्यावर लावावे.
* मुलांना शांत झोप लागत नसेल तर जायफळ तुपात उगाळून कपाळावर लेप द्यावा.
* मुलांचे पोषण योग्य प्रमाणात होण्यासाठी एक-एक कप दूध व पाणी सम प्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा बडी शेप, १ चमचा खारीक पूड, चिमुटभर सुंठपूड टाकून मंद आचेवर निम्मे होईपर्यंत उकळावे व गार झाले की गाळून रोज मुलांना पाजावे.
* मुलांना एक चमचा ताजे घरचे लोणी साखरेबरोबर द्यावे. यामुळे भूक व्यवस्थित लागते व पोषणही होते.
* मुले सहा-सात महिन्याची झाली की खसखशीची दुधात शिजवलेली खीर द्यावी. यामुले दात येतानाच्या वेळी त्रास होत नाही व पोषणही चांगले होते.
* दात येताना ‘डिकेमाली’ची पूड हिरड्यांना लावावी, त्रास होत नाही.
* काही मुलांना दात निघायच्या वेळी जुलाब होतात. अशा वेळी पाण्यात खारीक उगाळून द्यावी.
* लहान मुलाचे पोट फुगून दुखत असल्यास हिंगाचा खडा किंचित गरम करून बेंबीवर ठेवावा किंवा ओव्याच्या गरम पुरचुंडीने पोट हळुवार शेकावे. याने पोटातील वात सरून पोटदुखी थांबते.
* काहीवेळा संडास न झाल्याने पोटात दुखते. अशा वेळी सुके अंजीर गरम पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून मग हाताने कुस्करून गाळून पाणी पाजावे. तसेच पोटाला खोबरेल तेल लावून गरम कापडाने हळुवार शेकावे.
* लहान मुलांना जुलाब होत असल्यास तर उकळलेल्या ग्लासभर पाण्यात १ चमचा साखर व १ चमूटभर मीठ घालून चमचा-चमचा पाजावे.
* उलट्या होत असतील तर धने-जिरे-सुंठ पूड समभाग घेऊन एकत्र करून मधातून चाटवावे. द्राक्षाचा रस चमचा-चमचा द्यावा. लिंबू सरबतही चमचा चमचा द्यावे.
* सर्दी-खोकला वारंवार होत असेल तर केशराच्या दोन काड्या दुधात उगाळून नियमित द्याव्या.
* मूल तोतरं अथवा बोबडं बोलत असेल तर चिमुटभर अक्कलकरा जिभेवर चोळावा तसेच पिंपळाच्या पानावर गरम भात घेऊन त्यात थोडं तूप-मीठ घालून भरवावे.