जपा आपले डोळे… नेत्रदानासाठी!

0
753

– डॉ. मनाली म. पवार
गणेशपुरी-म्हापसा

तुमच्या निरोगी डोळ्यांनी तुमच्या मरणोपरांतदेखील नेत्रदानाने एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी देण्याचे महान पुण्याचे कार्य घडू शकते. मरणानंतर शरीराची नुसतीच राख होण्यापेक्षा, नेत्रदानाचा अर्ज भरावा. नेत्रदानासारखे दुसरे दान नाही.

संधिवातासारखे वातविकार असो वा त्वचाविकार वा लठ्ठपणा अशा प्रकारचे काही आजारपण आल्यास रुग्ण आयुर्वेदिक चिकित्सेकडे वळताना दिसतो. पण नेत्रविकार म्हणजेच डोळ्यांच्या आजारासाठी रुग्ण फक्त आणि फक्त ऍलोपॅथिक डॉक्टरकडेच जातो, कारण मुळात आयुर्वेद शास्त्रात डोळ्यांच्या रोगांविषयीही अभ्यास झालेला आहे किंवा काही उपचारपद्धती प्राचीन ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल्या आहेत, याचे ज्ञानच सामान्य जनतेला नाही. आयुर्वेदामध्ये आय ड्रॉप्स कुठे आहेत?… असे सर्रास ऐकायला मिळते. शिरप्रदेशावर उपचार सांगितलेले आहेत. आयुर्वेदातील सुश्रुत संहितेच्या उत्तर तंत्रात शालाक्यतंत्राबाबत विवेचन आहे. त्यातही विशेषत्वाने काही भाग नेत्ररोगनिदान व चिकित्सेवर आहे.
पंचेंद्रियांपैकी डोळा हे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. दृष्टीज्ञान नसणे, म्हणजेच आपण हे सुंदर जग पाहू न शकणे याचे दुःख दृष्टी नसलेली व्यक्तीचे सांगू शकते. आपल्यालाही जर आपले डोळे निरोगी रहायला हवे असे वाटत असेल तर डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नेत्ररोग झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा डोळे निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने नेत्रांची काळजी घेण्यासाठी, डोळ्यांच्या स्वास्थ्यरक्षणासाठी विशेष उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत.

डोळ्यांची रचना व कार्ये

डोळा म्हणजे शरीराचा कॅमेराच होय. चेहर्‍यावरच्या गोलाकार खोबणीत, चोहोबाजूंच्या आवरणांमध्ये स्थित डोळा असतो. डोळ्याच्या संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूला ‘स्न्लेरा’- श्‍वेतमंडल असते. त्याच्या आतल्या बाजूला रक्तवाहिन्यांचे अधिक्य असणारा ‘कोरॉईड’ हा थर असतो, तर सर्वांत आतील बाजूला ‘रेटिना’ किंवा दृष्टीपटल. स्न्लेरा संरक्षणाचे, कोरॉईड पोषणाचे आणि रेटिना दृष्टीसंवेदनाचे महत्त्वाचे काम करतात.
डोळ्याच्या गोलाकार पोकळीच्या समोरील बाजूस पारदर्शक उलट्या बशीच्या आकाराचा एक अवयव असतो. त्यालाच ‘कॉर्निया’ म्हणतात. काही कारणाने याचा पारदर्शकपणा कमी झाला किंवा नाहीसा झाला तर दृष्टीदोष उद्भवतात. याच्या पारदर्शकपणात कमतरता आली किंवा डाग पडले तर यालाच बोली भाषेत ‘डोळ्यात फूल पडणे’ म्हणतात.
ज्याप्रमाणे कॅमेरामधील भोक बारीक-मोठे करण्यासाठी पडदे असतात, तसेच डोळ्यात ते कार्य ‘आयरीस’ करते. हे भोक म्हणजेच डोळ्यातील ‘बाहुली’ किंवा ‘प्युपिल’. त्याच्यामागे असते ते भिंगं. त्याच्या साहाय्याने प्रकाशकिरणांचे वक्रीभवन घडून येते व वस्तूची प्रतिमा रेटिनावर पडते. प्रकाश संवेदनांचे रुपांतर रासायनिक संवेदनांमध्ये होते आणि मग दृष्टिचेतातंतूमार्फत ती संवेदना मेंदूपर्यंत पोहचते. आपल्याला दृष्टिज्ञान होते, म्हणजेच दिसू लागते.
डोळ्यांमध्ये भिंगाच्या पुढील भागात एक पाण्यासारखा द्रव सतत तयार होत असतो. त्याला ‘तनुजल’ म्हणतात. तो डोळ्याच्या आतील दाब वाढवतो. यालाच ‘ग्लुकोमा’ वा ‘काचबिंदु’ म्हणतात. यावर योग्य उपचार तात्काळ न केल्यास दृष्टीची हानी होऊ शकते. मात्र योग्य उपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो.
डोळ्यांच्या आतील भिंगं जोवर पारदर्शक असते तोपर्यंतच प्रकाशकिरण त्यातून आत येऊ शकतात. जेव्हा ते भिंगं वय वाढल्याने, मेद संचयाने पांढरे किंवा अपारदर्शक होते, तेव्हा त्यास ‘कॅटरॅक्ट’ किंवा ‘मोतीबिंदु’ म्हणतात.
क्वचितप्रसंगी पडद्याला इजा होऊन पडदा खराब होणे, उच्चरक्तदाब किंवा मधुमेह यामुळे पडदा खराब होणे अशासारखे आजार उद्भवतात पण मुळातच हे आजार होऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घ्यावी.

नेत्ररोगांची कारणे ः

नेत्ररोग होण्याची आयुर्वेदात काही कारणे सांगितलेली आहेत व ज्या कारणांनी रोग होतो ती कारणेच वर्ज्य करावीत, असे सुश्रुताचार्यांनी सांगितलेले आहे.
‘‘उष्णभितप्तस्य जलप्रवेशात्
दुरेक्षाणात् स्वप्नविपर्ययात् च|
प्रसक्त संरोदन कोप शोक
क्लेशाभिघातात् अतिमैथुनात् च॥
शुक्त आरनाल अम्ल कुलत्थमाष
निषेवणात् वेगविनिग्रहात् च|
स्वेदाद अयो धूमनिषेवणात् च
धर्पेः विघातात् वमनातियोगात्‌॥
बाष्पग्रहात् सूक्ष्मनिरिक्षणात् च
नेत्रे विकारान् जनयान्ति दोषः॥

* उन्हातून आल्यावर लगेच शॉवर घेणे किंवा उष्ण हवामानातून लगेच शीत वातावरणात किंवा एअरकंडिशन असलेल्या खोलीत जाणे. शरीरातील सूक्ष्मतम वाहिन्यांचे एकदम आकुंचन घडते, ते त्रासदायक आहे.
* अतिदूरचे सतत पाहण्याचे काम करणार्‍यांना डोळ्यावर ताण पडून नेत्रविकार होतात.
* रात्रीऐवजी दिवसा झोपणे. कायम रात्रपाळी करणार्‍या कर्मचार्‍यांना हा त्रास विशेषकरून होतो. तसेच अलीकडे बरीच मुले रात्री उशिरापर्यंत जागतात व नंतर दिवसा झोपतात.
* सतत रडणे, शोक, क्रोध, क्लेश करणे.
* पचायला अतिशय जड, आंबट, अतिमसालेदार, अतितिखट, अतिखारट व अतिउष्ण पदार्थांचे सेवन, कुळीथ, मांस, मसूर, कांजी यांचा समावेश असलेला आहार यामुळे पित्तदोषाचा प्रकोप होतो आणि अन्य दोषांना बिघडवून तो नेत्रदोष घडवून आणतो.
* मूलभूत वेगांचे धारण करणे.
* प्रदूषित वातावरणात (धूर, धुळ इ.)
* अतिप्रमाणात उलट्या होणे.
* डोळ्याला वाफा लागणे.
* अतिसूक्ष्म वस्तूंचे अत्यधिक निरीक्षण करणे. इत्यादी गोष्टींचा डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात सतत टीव्हीसमोर बसून एकटक टीव्ही पाहणे आणि कॉम्प्युटर स्क्रीनसमोर सतत बसून काम करणे.

प्रकृतीनुसार डोळ्यांच्या विकारांची लक्षणे ः

वात प्रकृतीचे डोळे चंचल, रुक्ष, निस्तेज व आकाराने लहान! पित्त प्रकृतीचे डोळे तीक्ष्ण, किंचित पिवळसर व जराशा उष्णतेने लाल होणारे लाल होणारे! आणि कफ प्रकृतीचे डोळे प्रसन्न, तेजस्वी, प्रेमळ, सुंदर, स्वच्छ व मोठे असतात. वात दोषामुळे डोळे दुखणे, पित्त दोषामुळे डोळ्यांची आग होणे तर कफ दोषामुळे डोळे चिकट होऊन डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणे दिसतात. अशा त्रासामुळेच पुढे डोळ्यांचे मोठे विकार उद्भवू शकतात.

आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार ः

* आयुर्वेदात नेत्रचिकित्सेसाठी नेत्रबिंदू (आयड्रॉप्स), पुटपाक कर्म, अंजन कर्म (काजळ घालणे), तर्पण (नेत्रबस्ती), शिरोधारा, नस्य असे अनेक प्रतिबंधक उपाय सांगितलेले आहे.
* सारखा वाढणारा चष्म्याचा नंबर किंवा रेटिनावर आलेले डाग यावर आयुर्वेदिय योग्य चिकित्सा केल्यास लक्षणांमध्ये घट दिसून येते. पण काकडीचा रस, तुळशीचा रस, कोथिंबिरीचा रस, गाजराचा रस डोळ्यात घालणे यासारखे उपचार मात्र कुठेतरी वाचून स्वतः करू नये. तसेच मोतीबिंदू, काचबिंदूसारख्या रोगात आधुनिक शास्त्राचाच आधार घेऊन शस्त्रकर्म करवून घ्यावे.
* एक चमचा त्रिफळा चूर्ण, एक चमचा मध व अर्धा चमचा तुपाबरोबर घेतल्यास डोळ्यांनी कमी दिसणे, रात्री नीट न दिसणे अशा तक्रारी कमी होतात.
* रात्री नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब साजूक तूप टाकल्यास डोळ्यांना ताकद मिळून दृष्टी सुधारते.
* आठवड्यातून एकदा त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळे निरोगी राहतात.
* डोळ्यांची आग किंवा जळजळ होत असल्यास गुलाबपाण्याने भिजवलेल्या कापडाच्या घड्या किंवा कोथिंबिरीच्या रसात भिजवलेल्या घड्या किंवा काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावे.
* डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाल फुगवून तोंडात पाण्याची गुळणी काही काळ धरून ठेवावी व मिटलेल्या डोळ्यांवर पाण्याचे हबके मारावेत.
* पायाला नित्य तूप, तेल लावून काशाच्या वाटीने पाय घासल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
‘अ’ जीवनसत्व जास्त आहे अशा आहाराचा समावेश जेवणात ठेवावा. हिरव्या पालेभाज्या, कच्चे गाजर, आवळा, द्राक्षे, डाळिंब, त्रिफळा, सैंधव, खडीसाखर, जुने तांदूळ, गहू, मूग इत्यादीचे सेवन करावे.
थोड्या कामानंतर, अभ्यासानंतर डोळे मिटून घ्यावेत व मिटलेल्या डोळ्यांच्या आत बुब्बुळांची उजवीकडून डावीकडे, वर-खाली अशी हालचाल करावी. मध्येच जवळ तर काही काळ दूर पहावे. आपण शक्यतो एकटक पाहतो. पापण्यांची उघडझाप करीत नाही. हे शक्यतो टाळावे.
दृष्टी नीट रहावी व नेत्ररोग होऊ नयेत म्हणून ज्या काही गोष्टी, उपाय आयुर्वेदाने सांगितलेले आहेत त्यांचे योग्य पालन करून डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवावे. कारण तुमच्या निरोगी डोळ्यांनी तुमच्या मरणोपरांतदेखील नेत्रदानाने एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी देण्याचे महान पुण्याचे कार्य घडू शकते. मरणानंतर शरीराची नुसतीच राख होण्यापेक्षा, नेत्रदानाचा अर्ज भरावा. नेत्रदानासारखे दुसरे दान नाही.