जपानवरील विजयासह इंग्लंड ‘ड’ गटात अव्वल

0
116

जपानवर २-० अशी मात करीत इंग्लंडने ९ गुणांसह ‘ड’ गटात अव्वल स्थान मिळवित फ्रान्समध्ये सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सोळा संघात प्रवेश केला आहे. जपाननेही ४ गुणांसह अंतिम सोळातील आपले स्थान निश्‍चित केले आहे.

इंग्लंडने खेळावर वर्चस्व राखले होते. जपानी महिलांनी काही धोकायादक चढाया केल्या होत्या. परंतु त्यांना इंग्लंडच्या गोलरक्षकाला भेदता आले नाही. इंग्लंडचे दोन्ही गोल एलेन व्हाईटने नोंदविले. पहिल्या सत्रात १४व्या मिनिटाला तिने इंग्लंडचे खाते खोलले होते. तर दुसर्‍या सत्रात ८४व्या मिनिटाला एलिनने संघाला पूर्ण गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवून दिले.

दरम्यान, ड गटातील स्कॉटलंड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेली अन्य एक लढत ३-३ अशी बरोबरीत संपली. बरोबरीमुळे अर्जेंटिनाच्या महिलांचे ३ सामन्यांतू २ गुण झाले असून त्या तिसर्‍या स्थानी आहेत. आता अंतिम सोहळातील स्थानासाठी आता प्रतीक्षा करावी लागली आहे. स्कॉटलंडच्या महिला १ गुणांसह चौथ्या स्थानी राहिल्या. स्कॉटलंडकडून किम लिटल (१९वे मिनिट), जेनिफर बीएटी (४९वे मिनिट) व इरिन कुथबर्थ (६९वे मिनिट) यांनी गोल नोंदवित ३-० अशी आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन करीत मिलाग्रोस मिनेझिस (७४वे मिनिट), ली आलेक्झेंडर (स्वयंगोल, ७९वे मिनिट) आणि फ्लोरेंसिया बोंसेगुंडो (पेनल्टी, ९०+४) यांनी नोंदविलेल्या गोलांमुळे ३-३ अशी बरोबरी साधली.
दरम्यान, ‘इ’ गटातून नेदरलँड्‌स आणि कॅनडा संघांनी अंतिम सोळात आले स्थान निश्‍चित केले आहे. तर तिसर्‍या स्थानावरील कॅमेरून संघालाही अंतिम सोळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.