जपानला नमवित भारत अंतिम फेरीत दाखल

0
117

>> एफआयएच सीरिज फायन्सल्स

>> सात गोलांची केली बरसात

टीम हॉकी इंडियाने काल आशियाई जेत्या जपानचा ७-२ असा एकतर्फी पराभव करीत पराभव करीत आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आयोजित केलेल्या एफआयएच सीरिज फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक दिली. आता अंतिम फेरीत भारत भारताची गाठ दक्षिण आफ्रिकन संघाशी पडणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकताना काल झालेल्या उपांत्य लढतीत आशियाई जेत्या जपानवर भारतीय संघाने पूर्ण सामन्यात वर्चस्व राखले होते. मध्यंतरापर्यंत भारतीय संघाने ४-२ अशी आघाडी घेतली होती व दुसर्‍या मध्यात आणखी ३ गोल नोंदवित अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. जपानने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या क्वॉर्टरमध्ये २र्‍याच मिनिटाला आपले खाते खोलले. तानाका केंताकडून मिळालेल्या पासवर किताझातो केंजीने गोल नोंदवित जपानला आघाडीवर नेले. भारतीय संघाने ८व्या मिनिटाला बरोबरी साधण्यात यश मिळविले. ८व्या मिनिटाला मिळालेल्या सलग दुसर्‍या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगने भारताला हा १-१ अशा बरोबरीवर नेणारा गोल नोंदविला. ११व्या मिनिटाला भारताने आघाडीची सोपी संधी गमावली. अखेर १४व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नवर वरुण कुमारने जपानचा गोलरक्षक ताकानो युसुकेला चकवित भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.दुसर्‍या क्वॉर्टरमध्ये जपानने शानदार पुनरागमन करताना १९व्या मिनिटाला २-२ अशी बरोबरी साधली. वतानाबे कोताने हा गोल नोंदविला. रोबरीनंतर भारतीय संघाने खेळात काहीशी आक्रमकता आणली आणि त्याचा फायदा त्यांना झाला. २३व्या मिनिटाला रमणदीप सिंगने गुरिंदर सिंगच्या पासवर भारताला पुन्हा ३-२ अशी आघाडी मिळवून देणारा गोल नोंदविला. २५व्या मिनिटाला हार्दिक सिंहने भारताला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या क्वॉर्टरच्या समाप्तीपर्यंत भारताने ही आघाडी राखली.

तिसर्‍या क्वॉर्टरमध्ये भारतीय संघाने आणखी दोन गोल नोंदवित आपली आघाडी मजबूत केली. ३७व्या मिनिटाला रमणदीप सिंगने भारताला ५-२ अशा आघाडीवर नेले. तर ४३व्या मिनिटाला नीळकंठ शर्माकडून मिळालेल्या अचूक पासवर गुरुसाहिबजीत सिंगने भारताचा सहावा गोल नोंदविला. अखेर चौथ्या क्वॉर्टरमध्ये ४७व्या मिनिटाला विवेक प्रसादने गोल नोंदवित आशियाची जेतेपद मिळवित टोकियो ऑलिम्पिकसाठी यापूर्वीच पात्रता मिळविलेल्या जपानी संघाला ७-२ असे नमवित भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.