जनतेला विश्‍वासात घेऊनच नद्यांचे राष्ट्रीयीकरण

0
194

वास्को येथील कोळसा प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता दिलथी जाणार नाही. राज्यातील सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा सामंजस्य करार करताना नागरिकांना विश्‍वासात घेण्यात येणार असून सामंजस्य करार नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

वास्को येथे कोळसा प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता देऊ नये अशा आशयाचे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला मागील ऑगस्ट २०१७ मध्ये पाठविण्यात आले आहे. कोळसा प्रकल्पाचा विस्तार न करता सध्या सुरू असलेल्या कोळसा वाहतुकीत सुसूत्रता आणि प्रदूषण कमी करण्यासाठी प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे. कोळसा वाहतुकीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. विदेशात कोळसा हाताळणीसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान वापरण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपासून
विधानसभेचे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन साधारण १३ डिसेंबरपासून घेतले जाणार आहे. या अधिवेशनासाठी कामकाज निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प फेब्रुवारी २०१८ मध्ये विधानसभेत सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

अग्निशामक दलातील
नोकरभरती रद्द होणार नाही
भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत नोकर भरती विषयावर चर्चा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या काळातील अग्निशामक दलातील नोकरभरती प्रक्रिया रद्द करण्याचा विषय उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर अग्निशामक दलातील १२९ नोकर्‍यांसाठीची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोअर समितीच्या बैठकीत नेहमीच्या विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत भाष्य करण्याचे नेत्यांनी टाळले. या बैठकीला मुख्यमंत्री पर्रीकर, माजी मुख्यमंत्री पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर, संजीव देसाई, दामू नाईक व इतरांनी सहभाग घेतला.