जगा आयुष्य सहलीसारखं!

0
216
  • गौरी भालचंद्र

प्रत्येकाशी संवाद साधताना सहलीप्रमाणे आनंदाने साधला तर.. आनंद पसरत जाईल.. जीवनाचा आनंद घेत जगण्याची कला शिकल्यामुळे आनंदात भर पडत जाईल दिवसेंदिवस.! स्वतःच्या आणि इतरांच्याही… त्यातून समाधान मिळेल…

किती निरागस मनमोकळा आनंद मिळतो मनाला पर्यटनातून… वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन तिथलं निसर्गसौंदर्य न्याहाळणं म्हणजे एक पर्वणीच ठरत असते. खाण्याचे साठवणीतले पदार्थ, नवनवीन कपडे, कॅमेरा, बॅगा… छे ..! लगबग असते नुसती..! घरातल्या माणसांची एकमेकांसोबत होणारी सामानाची मांडणी.. त्यावेळच्या प्रवासाच्यापूर्वीच्या चर्चा, सहलीच्या वेळी करायच्या प्रत्येक क्षणाची सुंदर नियोजनबद्ध योजना.. हुरूपच हुरूप साठलेला असतो सारं करताना. मन एकदम निरभ्र असतं आकाशासारखं.! पुलपाखरासारखं मनसोक्त बागडत असतं. ती गम्मतच काय और असते.

ते साठवण्यापूर्वीचे सहलीचे सुंदर क्षण.. सहलीच्या चर्चेत रमणारे ते मनोहारी दिवस आणि नंतर सहल संपून पुन्हा घरी परतल्यावरही त्याच नादात बराच काळ तरंगत राहणं, किती छान असतं हे सगळं, नाही का? खूप खूप बरं वाटत असतं आपल्याला. बर्‍याच काळाचे राग लोभ सारं कसं विरून जातं त्या काळात. एक निर्भेळ आनंद मात्र साठत असतो, खुपसा!
सहलीचे प्रकार ते किती! साध्या वनभोजनापासून ते चांदणी भोजनापर्यंत.. एकदिवशीय सहलीपासून ते आठवड्याच्या, महिन्याच्या सहलीपर्यंत.. चालत वनभोजनाला जाताना रम्य, आल्हाददायक वाटत असतं शाळेतल्या मुलांना.. बर्‍याचदा मोठी माणसेही असा आनंद घेतात वनभोजनाचा.. तोही एक आनंदी प्रवास असतो. निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होऊन चालताना फारच समाधान वाटत असतं मनाला.
सहलींना जाताना कधी आपण स्वतःच्या वाहनाने जातो तर कधी रेल्वेने, बसने आणि कधी विमानाने सुद्धा.. वाहन कोणतेही असो.. आपल्या मनाला वाटणारं सुख हे फार महत्वाचं.
‘‘आजोबा, सहली किती छान असतात नाही का हो? मनाला आल्हाददायक वाटणार्‍या, सुखावणार्‍या..’’, मी उद्गारले.
‘‘होय बेटा! सहलींमुळे मन रमतं, बरं वाटतं. वातावरणात चांगला बदल होतो. आणि एक सांगू.. ! आपलं सारं आयुष्यही सहलीसारखं जगता येतं, उपभोगता येतं आपल्याला. याचा विचारच कधी कोणी केला असेल की नाही देव जाणे’’, आजोबा मनापासून बोलत होते.

आता आपण काही दिवसांपूर्वी ट्रीपला गेलेल्या रामोजी फिल्म सिटीचंच उदाहरण घे ना.. किती छान वसवली आहे त्यांनी . फारच उत्तम..! तिथली निरनिराळ्या प्रकारची घरे, गावं, शहरं, तिथले विविधरंगी पक्षी, प्राणी, फुलपाखरं यांचे पार्क, विविध बागा, मंदिरे मशीद, चर्च, कृत्रिम विमानतळ, हॉस्पिटल, रेल्वेस्टेशन, आकर्षक इमारती, आकर्षक रंगसंगती साधून निर्माण केलेल्या डोळ्यांना सुखावणार्‍या विविध फुलबागा, वृंदावन गार्डनसारख्या इतरही काही महत्वाच्या स्थळांच्या हुबेहूब कृत्रिम प्रतिकृती, अनेक प्रकारचे ऐतिहासिक सेट, सुंदर उद्यानांचे विविध प्रकार त्यामध्ये मुघल गार्डन, जापनीज गार्डन, अभयारण्य, प्रिन्सेस स्ट्रीट, स्टुडिओ टूर्स, लाइव्ह शोज, कलिंग, मगध आणि ‘बोधिसत्व’ची ऐतिहासिकता दर्शवणार्‍या गुहा, फिल्म सिटी टूर्स…अशी हजारो उदाहरणे देता येतील. हे सारं पाहताना मनाला विसरच पडतो क्षणभर स्वतःचा .. खूप समाधान वाटत असतं एका निराळ्याच जादूमयी जगात वावरण्याचं .. त्या विश्वात रमताना.

निरनिराळी शहरं, गावं सहलीच्या निमित्ताने पाहताना आपल्या ज्ञानात बरीचशी भर पडत असते. विचारांनाही चालना मिळत असते. आजोबा बराच वेळ बोलत होते. माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही याचा मागोवा घेत होते..
मी त्यांच्या बोलण्यात रमून गेले होते. ‘‘हा सांगा ना आजोबा.. तुम्ही किती छान बोलता.. खूप भर पडते माझ्या ज्ञानात..’’, मी आपल्याच नादात उद्गारले. मघाशी म्हटलं तसं सारं आयुष्य म्हणजे एक सहल असते. ती हसत खेळत जगलं तर..!
आपणही कामानिमित्ताने अनेक ठिकाणी जात असतो. जीवनातल्या प्रत्येक क्षणाला जगताना सहलीप्रमाणे जगले तर किती मजा येईल जीवन जगताना.. एक सोहळाच वाटेल जीवन म्हणजे.. नाही का..? प्रत्येकाशी संवाद साधताना सहलीप्रमाणे आनंदाने साधला तर.. आनंद पसरत जाईल.. जीवनाचा आनंद घेत जगण्याची कला शिकल्यामुळे आनंदात भर पडत जाईल दिवसेंदिवस.! स्वतःच्या आणि इतरांच्याही… त्यातून समाधान मिळेल.. आणि या जीवनाच्या सहलीचा आस्वाद घ्यावासा वाटेल.. मनमोकळा..!!