छत्तीसगडचे वर्चस्व

0
76

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘ड’ गटातील गोवा व छत्तीसगड यांच्यात पर्वरी येथे सुरू असलेला सामन्यात छत्तीसगडला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. छत्तीसगडच्या पहिल्या डावातील ४५८ धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळताना गोव्याने तिसर्‍या दिवसअखेर ४ बाद २२३ धावा केल्या आहेत. सुमिरन आमोणकर (७९) याने स्वप्निल अस्नोडकर (२०) याच्यासह ७३ धावांची सलामी दिली. स्वप्निल बाद झाल्यानंतर सुमिरनने कर्णधार सगुण कामत (४७) याला मदतीला घेऊन दुसर्‍या गड्यासाठी ७४ धावा जोडल्या. शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेला सुमिरन डावाच्या ७८व्या षटकात बाद झाला. रिगन पिंटो (नाबाद २५) व दर्शन मिसाळ (२३) यांच्यात ३१ धावांची झालेली भागीदारी फुलत असताना दिवसाच्या अखेरच्या अर्ध्या तासात दर्शन बाद झाल्याने गोव्याला दिवसाच्या खेळावर पकड राखता आली नाही. यजमान संघ अजून २३५ धावांनी पिछाडीवर असून चौथ्या दिवशी टिच्चून फलंदाजी केल्यास गोव्याला आघाडी मिळू शकते. सामना अनिर्णीत राहणार हे नक्की असल्याने पहिल्या डावातील आघाडीच्या ३ गुणांसाठी उभय संघांमध्ये अंतिम दिवशी चुरस अपेक्षित आहे. गोव्याचे सर्वगडी बाद करण्यात छत्तीसगडला अपयश आल्यास उभय संघांना प्रत्येकी १ गुण मिळणार आहे.