चेन्नई सुपरकिंग्सचा ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश

0
127

>> वॉटसनची ९६ धावांची दमदार खेळी

>> सनरायझर्स हैदराबादवर ६ गड्यांनी मात

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत काल मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी व १ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४१वा सामना एम.ए. चिदंबमरम स्टेडियमवर खेळविण्यात आला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेेले १७६ धावांचे किचकट लक्ष्य चेन्नईने १९.५ षटकांत गाठले.

सलग अपयशी ठरूनही कर्णधार धोनीने दाखवलेला विश्‍वास शेन वॉटसन याने काल सार्थ ठरवला. फाफ ड्युप्लेसी दुर्देविरित्या धावबाद झाल्यानंतर वॉटसनने स्वतः जबाबदारी उचलली. सुरुवात संथ केल्यानंतर त्याने २५ चेंडूंत आपले १७वे आयपीएल अर्धशतक साजरे केले. रैनाने त्याला सुरेख साथ दिली. संघ १ बाद ३ अशा स्थितीत असताना रैना मैदानात उतरला होता. त्याने राशिद खानच्या गोलंदाजीवर यष्टिचीत होण्यापूर्वी वॉटसनसह दुसर्‍या गड्यासाठी ७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. चौथ्या स्थानावर आलेल्या अंबाती रायडूने कुर्मगती फलंदाजी करत २५ चेंडूंत केवळ २१ धावा जमवताना दबाव वाढवण्याचे काम केले. परंतु, दुसर्‍या टोकाने वॉटसनने आपली फटकेबाजी सुरुच ठेवल्याने हा दबाव फारसा जाणवला नाही. चेन्नईचा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना भुवनेश्‍वरने वॉटसनचा महत्त्वाचा बळी टिपला. यावेळी चेन्नईला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. भुवनेश्‍वरने अचूक टप्पा व दिशा राखत चेन्नईवरील दबाव वाढवला. परंतु, डावातील शेवटच्या षटकात संदीप शर्माला षटकार ठोकून केदार जाधवने दबाव झुगारण्याचे काम केले. यानंतर पुढील चेंडूवर एक धाव घेत केदारने संघाचा आठवा विजय साकार केला.

तत्पूर्वी, मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नरने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या हैदराबादने चेन्नईच्या गोलंदाजांचा व्यवस्थित समाचार घेतला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने ५७ तर मनीष पांडेने नाबाद ८३ धावा केल्या. चेन्नईकडून हरभजन सिंगने २ तर दीपक चहरने १ बळी घेतला. याव्यतिरिक्त चेन्नईच्या एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. हैदराबादच्या डावाची सुरुवात खराब झाली. यंदाच्या मोसमातील आपला शेवटता सामना खेळणारा त्यांचा सलामीवीर जॉनी बॅअरस्टोव शून्यावर परतल्याने हैदराबादला या स्पर्धेत प्रथमच चांगल्या सलामीपासून वंचित रहावे लागले. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर धोनीने बॅअरस्टोवचा झेल घेतला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडेने दुसर्‍या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. डेव्हिड वॉर्नर माघारी परतल्यानंतर, विजय शंकरने मनीष पांडेला साथ दिली. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना शंकरही माघारी परतला. दीपक चहरने त्याचा बळी घेतला. अखेरीस, मनीष पांडेने युसूफ पठाणच्या मदतीने संघाला १७५ धावांचा टप्पा गाठून दिला.

चेन्नईने या सामन्यासाठी आपल्या संघात एक बदल करताना शार्दुल ठाकूरच्या जागी हरभजन सिंगला उतरवले तर केन विल्यमसनच्या जागी सनरायझर्स संघात शाकिब अल हसननची वर्णी लागली. शहाबाज नदीमच्या जागी मनीष पांडे देखील हैदराबाद संघात परतला. केन विल्यमसनच्या आजीचे निधन झाल्यामुळे तो मायदेशी रवाना झाला आहे. मात्र २७ तारखेला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार्‍या सामन्यात तो संघात परतणार असल्याचे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर यष्टिचीत धोनी गो. हरभजन ५७ (४५ चेंडू, ३ चौकार, २ षटकार), जॉनी बॅअरस्टोव झे. धोनी गो. हरभजन ०, मनीष पांडे नाबाद ८३ (४९ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार), विजय शंकर झे. जडेजा गो. चहर २६, युसूफ पठाण नाबाद ५, अवांतर ५, एकूण २० षटकांत ३ बाद १७५
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-३०-१, हरभजन सिंग ४-०-३९-२, रवींद्र जडेजा ४-०-३३-०, ड्वेन ब्राव्हो ४-०-३५-०, इम्रान ताहीर ४-०-३८-०
चेन्नई सुपर किंग्स ः शेन वॉटसन झे. बॅअरस्टोव गो. भुवनेश्‍वर ९६ (५३ चेंडू, ९ चौकार, ६ षटकार), फाफ ड्युप्लेसी धावबाद १, सुरेश रैना यष्टिचीत बॅअरस्टोव गो. राशिद ३८, अंबाती रायडू झे. शंकर गो. संदीप २१, केदार जाधव नाबाद ११, ड्वेन ब्राव्हो नाबाद ०, अवांतर ९, एकूण १९.५ षटकांत ४ बाद १७६
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-१-१८-१, खलिल अहमद ४-०-२६-०, शाकिब अल हसन ४-०-२७-०, संदीप शर्मा ३.५-०-५४-१, राशिद खान ४-०-४४-१

वॉर्नरचे चेन्नईविरुद्ध
सलग पाचवे अर्धशतक
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने चेेन्नई सुपर किंग्सविरुद्धचे आपले सलग पाचवे अर्धशतक झळकावले. २०१४ साली वॉर्नरने चेन्नईविरुद्धचे आपले पहिले अर्धशतक झळकावले होते. यानंतर चेन्नईविरुद्ध खेळलेल्या प्रत्येक सामन्यात वॉर्नरने अर्धशतक लगावले आहे. वॉर्नरने २०१४-२०१६ या कालावधीत आरसीबीविरुद्ध लागोपाठ सात तर २०१५ पासून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सलग सात अर्धशतके नोंदविली आहेत. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिन्ही फलंदाजांनी चेन्नईविरुद्ध ६ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. याचसोबत सातत्याने अर्धशतकी खेळी करणार्‍या फलंदाजांच्या यादीत वॉर्नरने वीरेंद्र सेहवाग आणि जोस बटलरशी बरोबरी केली आहे. बाराव्या हंगामात वॉर्नरने सलग ५ वेळा अर्धशतके झळकावली आहेत.