चेन्नईची दिल्लीशी बरोबरी

0
76

चेन्नईन एफसीने इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमात बाद फेरीचे आव्हान कायम राखताना दिल्ली डायनामोज एफसीविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. दुसर्‍या सत्रात पेनल्टीवर गोलचा धक्का बसल्यानंतरही चेन्नईने एक गुण खेचून आणला.
नेहरू स्टेडिमवरील लढतीत दोन्ही गोल कर्णधारांनी केले. दिल्लीच्या कालू उचेने ५९व्या मिनिटास पेनल्टी सत्कारणी लावली. मग नऊ मिनिटे बाकी असताना मैल्सन आल्वेस याने चेन्नईला बरोबरी साधून दिली. हेन्रीक सेरेनो कार्डमुळे निलंबित असल्याने आल्वेसवर नेतृत्वाची जबाबदारी आली. त्याने रेने मिहेलीच याच्या अप्रतिम फटक्यानंतर सरस उडीवर प्रेक्षणीय हेडिंग करीत चेंडूला नेटची दिशा दिली. त्यावेळी दिल्लीचा गोलरक्षक झेबियर इरुतागुएना चकला. चेन्नईने १४ सामन्यांत तिसरी बरोबरी साधली. सात विजय व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. २४ गुणांसह त्यांचे चौथे स्थान कायम राहिले. दिल्लीने दुसरीच बरोबरी साधली. १३ सामन्यांतून आठ गुणांसह त्यांचे तळातील दहावे स्थान कायम राहिले.